(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hemant Godse : हेमंत गोडसेंचे जोरदार शक्तीप्रदर्शन, शेकडो वाहनांचा ताफा घेऊन ठाण्याकडे रवाना
Hemant Godse : शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. आपल्या समर्थकांचा शेकडो वाहनांचा ताफा घेऊन हेमंत गोडसे ठाण्याकडे रवाना झाले आहेत.
Hemant Godse : नाशिक लोकसभा मतदारसंघाचा (Nashik Lok Sabha Constituency) पेच अद्याप सुटलेला नाही. खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी काही दिवसांपूर्वी नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) हेच नाशिक लोकसभेचे उमेदवार असतील, अशी घोषणा केली होती. यानंतर नाशिकच्या महायुतीच्या इच्छुकांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. श्रीकांत शिंदेंच्या घोषणेला नाशिकच्या नेत्यांनी जोरदार विरोध केला होता.
अलीकडेच केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. देशात एकूण सात टप्प्यात निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका होणार असून नाशिकला 20 मे रोजी मतदान होणार आहे. मात्र अजूनदेखील नाशिकच्या जागेचा तिढा महायुतीत कायम आहे.
खासदार हेमंत गोडसेंचे जोरदार शक्तीप्रदर्शन
या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. आपल्या समर्थकांचा शेकडो वाहनांचा ताफा घेऊन हेमंत गोडसे ठाण्याकडे रवाना झाले आहेत. खासदार गोडसे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत. नाशिक लोकसभेसाठी हेमंत गोडसे हे इच्छुक असून नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळावी, अशी मागणी ते मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत. नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपने दावा केला आहे. त्यामुळे आता हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कोण आहेत हेमंत गोडसे ?
हेमंत गोडसे हे सध्या शिवसेना शिंदे गटात आहेत. ते नाशिकचे विद्यमान खासदार असून त्यांच्या राजकारणाची सुरुवात मनसेतून झाली आहे. हेमंत गोडसे यांनी 2007 ते 2012 या काळात नाशिक जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केले आहे. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत हेमंत गोडसे यांनी 'मनसे'तर्फे प्रथमच खासदारकीची निवडणूक लढवली. त्यावेळी समीर भुजबळ यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2012 साली मनपा निवडणूक लढून ते नगरसेवक बनले. 2014 सालच्या निवडणुकीत छगन भुजबळ यांचा पराभव करून हेमंत गोडसे हे पहिल्यांदा नाशिकचे खासदार झाले. तर 2019 साली खासदार हेमंत गोडसे व राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्यातच सरळ लढत झाली. यावेळी हेमंत गोडसे हे पुन्हा निवडून आले आहेत. आता हेमंत गोडसे हे नाशिक लोकसभेतून विजयी हॅटट्रिक करण्याच्या तयारीत आहेत.
आणखी वाचा
Raj Thackeray : साहेब तुम्हीच नाशिकमधून निवडणूक लढा! राज ठाकरेंना मनसैनिकांकडून गळ