मुंबईत शाळेच्या आवाहनाला प्रतिसाद; लोकसहभागातून विद्यार्थ्यांसाठी 40 स्मार्टफोन, टॅब, लॅपटॉप मिळाले!
विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये तसंच ऑनलाईन वर्गांपासून ते वंचित राहू नयेत, यासाठी स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅब किंवा कम्प्युटर दान करण्याचं आवाहन मुंबईतील एका शाळेने केलं होतं. या आवाहनाला समाधानकारक प्रतिसाद मिळाला. लोकसहभागातून विद्यार्थ्यांसाठी 40 स्मार्टफोन, टॅब, लॅपटॉप मिळाले असून अमेरिकास्थित माजी विद्यार्थ्यांनी 20 टॅबची मदत केली.
मुंबई : कोरोना संकट काळाच्या अगदी सुरुवातीपासूनच पहिलीपासून दहावीपर्यंत ऑनलाईन शिक्षणाचा प्रयोग प्रभावीपणे राबवणाऱ्या सायन येथील शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर धारावी, सायन, कुर्ला परिसरातल्या गरजू कुटुंबांतील 60 विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन तसंच टॅब देण्यात आले. सायन रुग्णालयाचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. श्रीकांत खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच सायनस्थित डी. एस. हायस्कूलने सर्व इयत्तांसाठी डिजिटल वर्ग सुरु केले. या उपक्रमाला विद्यार्थी-पालकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला खरा, मात्र कष्टकरी वर्गातील काही पालक आपल्या पाल्यांना मोबाईल फोन उपलब्ध करुन देऊ शकले नाहीत. "कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षणाला पर्याय नाही. दुर्दैवाने आपल्या राज्यातील सुमारे 60 टक्के कुटुंबांकडे आजही स्मार्टफोन नाहीत. आमच्या शाळेतील 35 टक्के विद्यार्थ्यांकडे डिजिटल शिक्षणासाठी कोणतंही साधन उपलब्ध नाही. हे सर्व विद्यार्थी धारावी, प्रतिक्षा नगर, कुर्ला इथल्या कष्टकरी वस्त्यांमध्ये राहतात. पाच-सात हजारांचा स्मार्टफोन विकत घेणेही त्यांच्या पालकांना शक्य नाही", अशी माहिती डी. एस. हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र प्रधानी यांनी दिली. अशा विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये तसंच ऑनलाईन वर्गांपासून ते वंचित राहू नयेत, यासाठी 'स्मार्ट मोबाईल फोन, लॅपटॉप, टॅबलेट् किंवा कम्प्युटर दान करा' असं आवाहन शाळेने केलं होतं.
"शाळेने केलेल्या या आवाहनाला समाधानकारक प्रतिसाद मिळाला. पहिल्या आठवड्यात शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी 35 स्मार्टफोन, चार टॅब आणि दोन लॅपटॉप उपलब्ध झाले. तर, दुसऱ्या आठवड्यात सध्या अमेरिकेत स्थायिक असलेले शाळेचे माजी रोहित मांडगे यांनी 20 नवे कोरे टॅब शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी पाठवले आहेत. या मदतीमुळे शाळेतील 60 विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी स्वत:च्या हक्काचे साधन उपलब्ध झाले आहे. शाळेला आणखी किमान 300 स्मार्टफोन किंवा टॅबची गरज आहे" असं राजेंद्र प्रधान यांनी सांगितलं. विशेष म्हणजे, ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांना कोरोना, आर्थिक मंदीमुळे शाळेची शैक्षणिक फी भरणे शक्य होणार नाही, अशा गरजू पालकांना आर्थिक सहकार्य करण्यासाठी डी. एस. हायस्कूलचे अमेरिकास्थित काही माजी विद्यार्थी शाळेला आर्थिक निधी उभारण्यासाठी सहकार्य करत आहेत, असंही प्रधान यांनी सांगीतलं.
प्रतिक्रिया
राजेंद्र प्रधान, अध्यक्ष- डी. एस. हायस्कूल "आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन, टॅब असणं हे गरजेचं झालं आहे. शैक्षणिक हक्काचा काळ मागे पडून 'डिजिटल शैक्षणिक हक्का'चा कालखंड सुरु झाला आहे. ज्याच्याकडे स्मार्टफोन नाही, तो स्वतंत्र नाही, हे वास्तव आहे. स्वातंत्र्यदिनी 60 विद्यार्थ्यांना स्मार्टफोन-टॅब देऊन डिजिटल शैक्षणिक हक्काच्या दिशेने आम्ही एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे."