राज ठाकरे भाजपसोबत आले तरी त्याचा फार फायदा होणार नाही : रामदास आठवले
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भाजपसोबत यायचं असेल तर त्यांना आपल्या पक्षाची भूमिका बदलावी लागेल, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपसोबत येणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. राज ठाकरेंबाबत सुरु असलेल्या चर्चांवर बोलताना केंद्रीय मंत्री रामदास यांनी म्हटलं की, राज ठाकरे आमच्या सोबत येत असतील तर त्याचं स्वागतच आहे. ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलताना रामदास आठवले यांनी दिल्ली हिंसाचार, सामनाच्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची नियुक्ती, मुंबई महापालिका निवडणूक अशा विविध विषयांवर भाष्य केलं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भाजपसोबत यायचं असेल तर त्यांना आपल्या पक्षाची भूमिका बदलावी लागेल. त्यांनी प्रांतवादाची भूमिका सोडली तर त्यांचे स्वागत आहे. परप्रांतियांचा त्यांच्या पक्षाकडून होत असलेल्या विरोध त्यांना थांबवावा लागेल. मात्र तरीही राज ठाकरे भाजप सोबत आल्याने भाजपला त्याचा फार फायदा होईल असं वाटत नाही, असं रामदास आठवले यांनी म्हटलं. एकीकडे राज ठाकरे आणि भाजपने औरंगाबादच्या नामांतरचा मुद्दा हाती घेतलाय तर रामदास आठवलेंनी त्याला विरोध केला आहे. औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलण्यास रिपाइंचा विरोध असून कोणत्याच भागाचे जुने नाव बदलले जाऊ नये, असं पक्षाला वाटतं. मात्र राज्य शासनाने जर ठरवलं तर नावात बदल केला जाऊ शकतो.
राज्यात घडलं ते दुर्देवी, सर्वात मोठा पक्ष विरोधी पक्षात बसलाय : राज ठाकरे
माझा मूळ डीएनए नव्या झेंड्याच्या रंगाचाच : राज ठाकरे
दिल्लीतील दंगलीला काँग्रेस-आप जबाबदार
सीएए-एनआरसीवरुन दिल्लीत जो हिंसाचार उसळला आहेत, यामध्ये 40 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. दिल्लीतील या हिंसाचाराला काँग्रेस आणि आप जबाबदार आहेत, असा आरोप रामदास आठवले यांनी केला. सीएए-एनआरसीबाबत गैरसमज पसरवण्याचं काम काँग्रेसने केलं. काँग्रेस आणि आपने ठरवलं असतं तर दिल्लीतील दंगल थांबवू शकत होते. मात्र त्यांनी तसं केलं नाही म्हणून दिल्लीत हिंसाचार घडला, असा आरोप रामदास आठवले यांनी केला.
संजय राऊतांवर अन्याय झाला
सामनाच्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांनी नियुक्ती करण्यात आली यावर बोलताना रामदास आठवले यांनी म्हटलं की, संजय राऊत यांना डावललं गेलं असं मला वाटत नाही. रश्मी ठाकरे यांची संपादकपदी नियुक्ती झाली ही देखील चांगली बाब आहे. मात्र राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यात संजय राऊत यांचं योगदान मोठं आहे. शिवसेनेची भूमिका त्यांनी योग्यरितीने मांडली. त्यामुळे संजय राऊत यांना सामनाचे संपादकपद तरी द्यायला हवं होतं. संजय राऊत यांच्यावर पक्षाने अन्याय केला आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर परिस्थिती वेगळी असती, असं रामदास आठवले यांनी म्हटलं.
'सामना'च्या संपादकपदी रश्मी ठाकरेंची नियुक्ती, संजय राऊत नाराज असल्याची चर्चा
मुंबईत 2022 नंतर महापौर भाजपचाच असेल, असा विश्वासही रामदास आठवले यांनी व्यक्त केला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत रिपाइंला 5-6 जागा हव्या आहेत. नवी मुंबईतही महायुतीचाच महापौर असेल. तर औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूकही सन्मानाने लढणार असून तेथेही महायुतीची सत्ता येईल, असा दावा रामदास आठवलेंनी केला.