130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये PLGA बटालियन-1 व बटालियन-2 चे कमांडर एंड्री कलिथराम उर्फ उइके कल्लू, कोरसा लक्कू तसेच डीके एसझेडसी सदस्य चलसानी नवथा उर्फ चंद्रा यांसारखे वरिष्ठ माओवादी नेतेही आहेत.

हैदराबाद : माओवाद्यांची (Maoist) सर्वात घातक तुकडी मानल्या जाणाऱ्या पीएलजीए (PLGA) बटालियन क्रमांक 1 सह तेलंगाना स्टेट कमिटी आणि दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीच्या तब्बल 130 माओवाद्यांनी तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. या 130 माओवाद्यांनी एके 47, एलएमजी, एसएलआर, इंसास सारख्या 124 घातक शस्त्रांसह तब्बल 5205 जिवंत गोळ्या तसेच अनेक ग्रेनेड आणि यूबीजीएल हे रॉकेट लाँचरसारखे शस्त्र देखील पोलिसांच्या (Police) स्वाधीन केले आहे. त्यामुळे उरल्या सुरल्या शशस्त्र माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला आहे. तेलंगणाचे (Telangana) मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्यासमोर माओवाद्यांनी आत्मसर्पण केले.
आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये PLGA बटालियन-1 व बटालियन-2 चे कमांडर एंड्री कलिथराम उर्फ उइके कल्लू, कोरसा लक्कू तसेच डीके एसझेडसी सदस्य चलसानी नवथा उर्फ चंद्रा यांसारखे वरिष्ठ माओवादी नेतेही आहेत. माओवादी संघटनेच्या तीन प्रमुख घटकांपैकी People’s Liberation Guerilla Army (PLGA) ही महत्त्वाची संघटना होती. मोठ्या संख्येने कॅडरनी शरणागती पत्करल्याने या संघटनेचे अस्तित्व जवळपास संपुष्टात आल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचे आवाहन केल्यानंतर अनेक नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करल्याचे तेलंगणा सरकारने म्हटले आहे. कुटुंबासोबत शांततेत जीवन जगण्यासाठी आणि पुनर्वसन योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
42 माओवादी "PLGA बटालियन क्रमांक 1" चे
आत्मसमर्पण करणाऱ्या 130 माओवाद्यांमध्ये सर्वाधिक 42 माओवादी "PLGA बटालियन क्रमांक 1" चे आहेत. तर 30 माओवादी "तेलंगणा स्टेट कमिटी"चे आहेत, 16 माओवादी "सेंट्रल रीजनल कमांड" चे आहेत. विशेष म्हणजे माओवाद्यांचा विद्यमान जनरल सेक्रेटरी देवजीने काही दिवसांपूर्वीच तेलंगाना पोलिसांसमोर आत्मसर्पण केले होते, त्याच देवजीच्या सुरक्षा तुकडीतील 10 माओवाद्यांनी सुद्धा आज तेलंगणा पोलिसांसमोर शस्त्र खाली ठेवले. या आत्मसमर्पणानंतर तेलंगणा पोलिसांनी प्रेस नोटच्या माध्यमातून मोठा दावा करत आता तेलंगणामधील रहिवाशी असलेले फक्त 7 माओवादी सशस्त्र माओवादात सक्रिय असल्याचे म्हंटले आहे. विशेष म्हणजे या सात पैकी फक्त एकच माओवादी आता तेलंगणामध्ये सक्रीय असून उर्वरित सर्व छत्तीसगड, झारखंड या भागामध्ये सक्रिय असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे एकाप्रकारे तेलंगणा मधून सशस्त्र माओवाद संपुष्टात आल्याचा दावा तेलंगणा पोलिसांनी केला आहे.
मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांचा साठा जप्त
124 शस्त्रे आणि 5205 जिवंत दारुगोळा
31 AK-47 रायफल
21 INSAS रायफल
20 SLR रायफल
18 303 रायफल
LMG, कार्बाईन, पिस्तूल, BGL आणि इतर शस्त्रे
पुनर्वसन व आर्थिक मदत
तेलंगणा सरकारच्या पुनर्वसन धोरणानुसार शरणागती पत्करलेल्या नक्षलवाद्यांच्या वरिष्ठ म्होरक्यांना 20 लाख रुपये, DVCM/CyPCM स्तराला 5 लाख रुपये, ACM/PPCM स्तराला 4 लाख रुपये आणि सामान्य सदस्यांना 1 लाख रुपये अशी आर्थिक मदत दिली जाणार आहे.
हेही वाचा





















