'सामना'च्या संपादकपदी रश्मी ठाकरेंची नियुक्ती, संजय राऊत नाराज असल्याची चर्चा
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रश्मी ठाकरे यांच्या नियुक्तीने शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत नाराज असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.
मुंबई : महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेत महत्वाची भूमिका बजवणाऱ्या सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पदरी सातत्यानं निराशा पडताना दिसत आहे. सामनाच्या संपादकपदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊत नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र मी नाराज नसल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. रश्मी ठाकरे यांना संपादक बनवण्याचा निर्णय कौटुंबिक आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी मला कार्यकारी संपादक बनवलं होतं. त्यामुळे माझं काम भक्त प्रल्हादाप्रमाणे आहे. भक्त प्रल्हादाप्रमाणे माझं स्थान मोठं किंवा लहान नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं.
उद्धव ठाकरे याआधी सामनाचे संपादक होते. मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरेंना सामनाच्या संपादकपदी राहणं अडचणीचं ठरत होतं, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता. त्यावेळी संजय राऊत यांची संपादकपदी वर्णी लागेल, असं म्हटलं जात होतं. मात्र रश्मी ठाकरे यांची संपादकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सामनाच्या पहिल्या पानावर रश्मी ठाकरेंना संपादक म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या जागी रश्मी ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे सामनाच्या भूमिकेत काहीही बदल होणार नाहीये. सामना वृत्तपत्राच्या संपादकपदाला बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी मोठी परंपरा आहे. त्यामुळे त्या परंपरेनुसार उद्धव ठाकरे यांच्यानंतर रश्मी ठाकरे यांची सामनाच्या संपादकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्यानंतर या पदावर योग्य व्यक्तीची निवड करणे हा सामूदायिक निर्णय आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं.
23 जानेवारी 1989 मध्ये सामना वृत्तपत्राला सुरुवात झाली. बाळासाहेब ठाकरे सामनाचे संपादक होते. सामनातून शिवसेनेची राजकीय भूमिका आणि विचार मांडले जातात. सामनाचे अग्रलेख नेहमीच चर्चाचा विषय असतात. सध्याचे अग्रलेख कार्यकारी संपादक संजय राऊत स्वत: लिहितात.
इतर बातम्या
ज्यांनी इतिहासातील धडे बदलण्याचा प्रयत्न केला त्या सरकारलाच आम्ही बदललं : संजय राऊत
मी दाऊद इब्राहिमला अनेकदा भेटलोय, त्याला दम भरलाय : संजय राऊत