Raj Thackeray | माझा मूळ डीएनए नव्या झेंड्याच्या रंगाचाच : राज ठाकरे
राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या बदलेल्या झेंड्याच्या रंगाबद्दल आणि राजमुद्रेबद्दल सविस्तर माहिती दिली. माझा मूळचा डीएनए हाच आहे, जो या झेंड्याचा रंगाचा आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.
![Raj Thackeray | माझा मूळ डीएनए नव्या झेंड्याच्या रंगाचाच : राज ठाकरे MNS chief Raj Thackeray Speech At mns adhiveshan Mumbai Raj Thackeray | माझा मूळ डीएनए नव्या झेंड्याच्या रंगाचाच : राज ठाकरे](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/01/24011403/Raj-T.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मनसेचं राज्यव्यापी आंदोलन मुंबईत पार पडलं. मनसेच्या आपला झेंडा बदलला त्यानुसार राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवातीतही बदल केला. "जमलेल्या माझ्या तमाम 'हिंदू' बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो..." असं म्हणत राज ठाकरेंनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. नव्या झेंड्याविषयी बोलताना, हा सर्वसाधारण झेंडा नाही यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. त्यामुळे त्याचा सन्मान राखणं ही आपली जबाबदारी आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.
मनसेचा हा नवा झेंडा आणावा हे माझ्या मनात गेले एक वर्ष घोळत होतं. माझा मूळचा डीएनए हाच आहे, जो या झेंड्याचा रंगाचा आहे. मग ठरवलं अधिवेशनाच्या निमित्ताने हा झेंडा समोर आणायचा. हा सर्वसाधारण झेंडा नाही यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. त्यामुळे त्याचा सन्मान राखणं ही आपली जबाबदारी आहे. निवडणुकीच्या वेळेस राजमुद्रेचा झेंडा वापरायचा नाही, त्याचा आब राखला गेलाच पाहिजे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.
झेंडा बदलणं ही काही नवीन गोष्ट नाही. याआधी जनसंघाने देखील झेंडा आणि नाव बदललं आहे. 1980 साली जनसंघाचं नाव भारतीय जनता पक्ष झालं होतं. मी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे. मी धर्मांतर केलेलं नाही. पण एक सांगतो माझ्या मराठीला नख लावायचा प्रयत्न केला तर मराठी म्हणून त्याच्या अंगावर जाईन आणि माझ्या धर्माला नख लावायचा प्रयत्न झाला तर हिंदू म्हणून त्याच्या अंगावर जाईन, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.
रंग बदलून सरकारमध्ये जाणारा नाही, शिवसेनेला टोला
पक्षाच्या झेंड्याचा रंग बदलला म्हणजे राज ठाकरे बदलला असं होत नाही. मी तोच आहे जो पूर्वी होतो. माझी मतं तीच आहेत, जी पूर्वीपासून आहेत. रंग बदलून सरकारमध्ये जाणारा राज ठाकरे नाही, असा टोलाही राज ठाकरेंनी शिवसेनेला लगावला.
संबंधित बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)