Delmicron Virus :नवीन स्ट्रेन भारतात अधिक विपरीत प्रभाव दाखविण्याची दाट शक्यता : डॉ. भारेश देढिया
ओमायक्रॉन भलेही भारतासह आशिया खंडात पसरत असला, तरी त्याचा डेलमीक्रॉन हा नवीन व्हेरियंट मात्र जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे.
![Delmicron Virus :नवीन स्ट्रेन भारतात अधिक विपरीत प्रभाव दाखविण्याची दाट शक्यता : डॉ. भारेश देढिया Maharashtra Delmicron Virus New strain likely to have more adverse effects in India says Dr. Bharesh Dedhia Delmicron Virus :नवीन स्ट्रेन भारतात अधिक विपरीत प्रभाव दाखविण्याची दाट शक्यता : डॉ. भारेश देढिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/12/4f3fe0961cf39b6e8c323b703953354d_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : जागतिक पातळीवर युएसए आणि युरोप तसेच अन्य देशांत डेलमीक्रॉन या नवीन व्हरायंटचा मोठा उद्रेक झालेला आहे. डेलमीक्रॉन मध्ये डेल्टा आणि ओमिक्रॉन या दोन्ही व्हेरियंटचा संयोग घडून आलेला आहे. कोविड-19च्या डेल्टा व्हेरियंट आणि अलीकडच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरियंट या दोन्हीमधून डेलमीक्रॉन हे नाव तयार झालेले आहे.
तात्त्विकदृष्ट्या आणि तज्ञांनी आजवर केलेल्या निरीक्षण अभ्यासाच्या आधारावर, असे लक्षात येते आहे की या व्हेरियंट आधीच्या दोन व्हरेयंट्सच्या तुलनेत अधिक वेगाने प्रसार होणारा असेल, परंतु आम्ही पुढील काही आठवडे, काही महिने याची वाटचाल आणि वाढ याकडे अतिशय बारकाईने लक्ष ठेवून राहणार आहोत. ओमायक्रॉन भलेही भारतासह आशिया खंडात पसरत असला, तरी त्याचा डेलमीक्रॉन हा नवीन व्हेरियंट मात्र जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत असून केसेसमध्ये मोठी वाढ घडवून आणत आहे. हा नवीन स्ट्रेन भारतात देखील वरचढ ठरून आपला विपरीत प्रभाव दाखवेल अशी दाट शक्यता दिसून येत आहे. अर्थात डेलमीक्रॉनमुळे भारतात अजून सामाजिक स्तरावर प्रसार सुरु झालेला नसल्यामुळे याबाबत आत्तापासूनच नेमके काही सांगता येणे अवघड आहे, परंतु आम्ही एकूण परिस्थितीकडे आणि विशेषतः परदेशातून येथे येणाऱ्या प्रवाशांवर अतिशय बारकाईने व दक्षतेने लक्ष ठेवून आहोत, असे हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरचे सल्लागार डॉ. भारेश देढिया म्हणाले.
लक्षणे
सर्वाधिक विचारात घेण्याजोगी बाब म्हणजे याची लक्षणे. डेल्टाच्या तुलनेत याची लक्षणे सौम्य असल्याचे आढळून आले आहे. सर्दी, नाक वाहणे, नाक चोंदणे, ताप, सुस्ती येणे, निरुत्साही वाटणे आदी लक्षणे सहसा लोकांच्यात आढळून येत आहेत. या लक्षणांकडे अतिशय काळजीपूर्वक आणि बारकाईने लक्ष देणे आणि लक्षणांमध्ये वाढ होते आहे असे वाटल्यास किंवा आजाराची स्थिती गंभीर होते आहे वाटल्यास, अगदी तातडीने आपल्या नजीकच्या डॉक्टरांना भेटून सर्व सांगणे हे सध्याच्या काळात अत्यंत महत्वाचे आहे.
अजूनपर्यंत तरी मुंबईच्या रूग्णालयांत डेलमीक्रॉनच्या संसर्गामुळे एकाही व्यक्तीला आयसीयुमध्ये भरती करण्याची वेळ आलेली नाही, की डेलमीक्रॉनशी थेट निगडीत एकही मृत्यू घडून आलेला नाही. तथापि, या व्हेरियंटबद्दल आणि मानवी शरीरावर होणाऱ्या त्याच्या दीर्घकालीन परिणामांबाबत आपल्याला अद्याप पुरेशी माहिती नसल्यामुळे हा व्हरायंट एक संभाव्य धोका नक्कीच आहे. त्यामुळे, या नव्या व्हेरियंटच्या बाबतीत आपण सर्वांनी अतिशय दक्ष, सजग राहायलाच हवे.
मुंबईतील काही रूग्णालयांत कोविड पॉझिटिव्ह असणारे आंतरराष्ट्रीय रुग्ण भरती आहेत. असे असले तरी या केसेस डेलमीक्रॉनच्या आहेत की पूर्णपणे केवळ ओमायक्रॉनच्या आहेत, याची खातरजमा करून देणारी विषाणूची पद्धतशीर चाचणी परीक्षा अद्यापपावेतो करण्यात आलेली नाही. नजीकच्या काळात, ओमायक्रॉन किंवा डेलमीक्रॉन एक सर्वसामान्य व्हेरियंट बनून जाण्याची देखील शक्यता आहे.
एवढेच काय, तर अनेक भारतीयांमध्ये हायब्रीड प्रतिकारशक्ती विकसित झालेली आहे. अनेक भारतीय व्यक्ती पहिल्या किंव्या दुसऱ्या लाटेत विषाणूने बाधित होऊन गेल्यानंतर मग त्यांनी लसींचे दोन डोस घेतले असल्या कारणाने अशा प्रकारची हायब्रीड प्रतिकारशक्ती निर्माण झालेली आहे. नवीन व्हेरियंटचा सामना करण्यासाठी ही हायब्रीड प्रतिकारशक्ती अतिशय चांगल्या प्रकारे उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. कारण लसींचे अगदी तीन डोस घेऊन निर्माण झालेल्या प्रतिकारशक्तीपेक्षा देखील ही हायब्रीड प्रतिकारशक्ती अधिक सक्षम, उच्च असल्याचे पुरावे मिळालेले आहेत. तथापि, यामध्ये खरोखर कितपत तथ्य आणि उपयुक्तता आहे, हे येणारा काळच आपल्याला दाखवून देईल.
ओमिक्रॉनच्या जरी तुरळक प्रमाणात गंभीर घटना आढळून आलेल्या असल्या, तरी डेलमीक्रॉनमुळे गंभीर केसेस उद्भवण्याचे प्रमाण अधिक असेल, असाच तर्क सध्या केला जात आहे. जीनोम सिक्वेन्सिंग अत्यंत महत्वपूर्ण असले, तरी आपल्या एकूणच आरोग्यसुरक्षा यंत्रणेचा सक्षम विकास करणे व आणखी एका उद्रेकाचा सामना करण्यासाठी सज्ज राहणे हेच अधिक इष्ट ठरणार आहे. आणि जे सातत्याने सांगितले जात आहे, की मास्कचा वापर सुरुच ठेवला पाहिजे; सार्वजनिक ठिकाणी आपले फेस गार्ड, मास्क खाली करता कामा नये; सामाजिक अंतर पाळले पाहिजे; मोठ्या प्रमाणावर लोकांनी एकत्र येणे टाळले पाहिजे; या सर्व खबरदारीच्या गोष्टी कोणत्याही नवीन व्हरायंटला गंभीर उग्र स्वरूप धरण करण्यापासून रोखण्यासाठी कायमच अतिशय महत्वाच्या राहणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)