मुंबईकरांनो काळजी घ्या! शहरात पसरलीये डोळ्यांची साथ, संसर्ग टाळण्यासाठी काय काळजी घ्याल?
Mumbai News : मुंबईत डोळ्याची साथ आली असून संसर्ग टाळण्यासाठी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे.
Mumbai News : मुंबईकरांनो (Mumbai) लक्ष द्या, ही बातमी तुमच्यासाठीच. मुंबईत डोळे येण्याची साथ (Eye Conjunctivitis in Mumbai) आली आहे. डोळ्यातून पाणी आणि घाण येणे, डोळे लाल होणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणं आहेत. डोळे येण्याचा संसर्ग सामान्यपणे प्रथम एकाच डोळ्याला होतो. मात्र एक डोळा आल्यानंतर (Eye Conjunctivitis) दुसऱ्या डोळ्यालाही संसर्ग होतो. त्यामुळे हा संसर्ग टाळण्यासाठी मुंबईकरांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
आधीच वातावरणातील बदलांमुळे हैराण असलेले मुंबईकर, आता डोळे येण्याच्या साथीनं त्रस्त आहेत. हा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्यानं रुग्णांनी बाहेर जाणं टाळावं, असा सल्ला डॉक्टरांकडून मुंबईकरांना देण्यात येत आहे. तसेच, या साथीचं प्रमाण वाढत असल्यानं रुग्णांनी घरी बसून आराम करावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. गेल्या आठवड्यापासून मुंबईत डोळ्यांची साथ पसरू लागली आहे. या प्रकारात डोळ्यांना सूज येते, अशीच काहीशी लक्षणं मुंबईकरांमध्ये दिसून येत आहेत. डोळ्यांवर घरगुती उपाय करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या, असं आवाहन रुग्णांना तज्ज्ञांकडून केलं जात आहे.
कसा होतो संसर्ग?
डोळे येण्याचा संसर्ग सर्वात आधी एकाच डोळ्याला होतो. पण एक डोळा आल्यानंतर दुसऱ्या डोळ्यालाही त्याचा संसर्ग होतोच. एकदा व्यक्तीचे डोळे येऊन गेले की, पुन्हा त्याच व्यक्तीला याचा संसर्ग होत नाही, असं अनेकांना वाटतं म्हणून अनेकजण निष्काळजी पणा करतात. पण असं नाही, एकदा संसर्ग होऊन गेल्यानंतरही पुन्हा त्याच व्यक्तीला संसर्ग होऊन डोळे येऊ शकतात.
तुम्हाला संसर्ग झालाय कसं ओळखाल?
- डोळ्यांत सतत काहीतरी गेल्यासारखं वाटत असेल, डोळ्यांतून सतत पाणी येत असेल, डोळे सतत लाल होत असतील, तर ही या संसर्गाची सामान्य लक्षणं आहेत. ही लक्षणं आधी एका डोळ्याला आणि
- त्यानंतर दुसऱ्या डोळ्याला दिसून येतात.
- तुमचे डोळे आले तर, डोळ्याच्या आतल्या कोपऱ्यांना आणि पापण्यांच्या आतल्या भागांना सूज येऊन लाल दिसतात.
- डोळ्यांतून चिकट पदार्थ बाहेर येतो.
- डोळ्यांना खाज येणं, डोळे जड वाटणं, तीव्र प्रकाश डोळ्यांना सहन न होणं
- डोळे येण्यासोबतच संसर्गामुळे ताप, सर्दी, खोकला या तक्रारीही जाणवतात.
डोळे आल्यास काय काळजी घ्यावी?
- डोळे आल्यास डोळ्यांना हात लावू नये
- डोळे सतत स्वच्छ पाण्यानं धुवत राहा
- डोळे येणं हा संसर्गजन्य रोग असल्यानं अशावेळी शक्यतो प्रवास टाळावा
- कुटुंबीयांपासून दूर राहावं
- डोळ्यांना हात लावू नये
- वेगळा रुमाल वापरावा
- तेलकट खाणं टाळावं
- काहीही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
(टीप : वर सांगण्यात आलेले उपाय एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.)