राज्यमंत्र्यांच्या दणक्यानंतर डोंबिवलीतील फडके रोड फेरीवाला मुक्त
फेरीवाल्यांना आज भाजप कार्यकर्त्यांनी हुसकावून लावलं. यावेळी डोंबिवलीचे आमदार आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचा रुद्रावतार प्रथमच डोंबिवलीकरांना पाहायला मिळाला.

कल्याण : डोंबिवलीच्या फडके रोडवर फेरीवाल्यांनी बस्तान मांडलं होतं. या फेरीवाल्यांना आज भाजप कार्यकर्त्यांनी हुसकावून लावलं. यावेळी डोंबिवलीचे आमदार आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचा रुद्रावतार प्रथमच डोंबिवलीकरांना पाहायला मिळाला.
डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या दीडशे मीटर परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास मनाई करण्यात आली आहे. याठिकाणी बसल्यानंतर फेरीवाल्यांवर कारवाई होत असल्याने गेल्या काही दिवसांपासून फेरीवाल्यांनी फडके रोडवर आपलं बस्तान हलवलं आहे. मात्र याठिकाणी दुकानदार आणि फेरीवाल्यांमध्ये रोज भांडणं होत असून आजही फेरीवाल्यांनी दुकानदारांवर दादागिरी केल्याची घटना घडली.
या प्रकाराबाबत स्थानिक आमदार आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना समजताच त्यांनी कार्यकर्त्यांसह तिथे धाव घेऊन फेरीवाल्यांना हुसकावून लावायला सुरुवात केली. पोलीस आणि पालिकेचे कर्मचारीही यावेळी उपस्थित होते. मात्र यावेळी एका फेरीवाल्याने चव्हाण यांना उद्देशून आक्षेपार्ह वक्तव्य करत हटण्यास नकार दिला.
त्यावेळी रवींद्र चव्हाण चांगलेच भडकले आणि फेरीवल्याला अक्षरशः शिव्यांची लाखोली वाहिली. सुदैवाने कुठलाही अनुचित प्रकार होण्यापूर्वी पोलिसांनी संबंधित फेरीवल्याला ताब्यात घेतलं. या सगळ्या गोंधळाप्रकरणी पोलिसांनी 70 ते 80 फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल केले असून 18 जणांना अटक केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
