हातावर पोट असलेल्या फेरीवाल्याचं सामान रस्त्यावर, मीरा-भाईंदर मनपा अधिकाऱ्यांची दादागिरी; 'माझा'च्या बातमीनंतर मदतीचा ओघ सुरु
ABP Majha Impact : एबीपी माझानं मीरा-भाईंदर मनपा अधिकाऱ्यांची दादागिरी सहन करणाऱ्या एका फेरीवाल्याची व्यथा मांडली होती. त्यानंतर या फेरीवाल्याला अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

ABP Majha Impact : मंगळवारी मिरा रोडच्या नया नगर येथे मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अमीन मालवीया या फेरिवाल्याच्या हातगाडीतील माल उलटून, त्याच्या हातगाडीची तोडफोड केली होती. एबीपी माझाने ही बातमी प्रसारित केली होती. या बातमीनंतर अनेक स्तरांतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अशातच एबीपी माझाच्या बातमीची दखल घेतल काल (बुधवारी) मनसेने अमीनला नवीन हातगाडी दिली तर मितेश गुप्ता या सामाजिक कार्यकर्त्याने त्याला सामान आणून दिलं आहे. हातगाडीवर सामान विकून हातावर पोट भरणाऱ्या अमीन आणि त्यांच्या परिवाराने एबीपी माझाचे आभार मानले आहेत. एबीपी माझामुळे आमचं दुःख लोकांसमोर मांडलं गेलं आणि मदत मिळाल्याचं अमीन यानं बोलताना सांगितलं.
मिरा रोड येथे हातगाडीवर सामान विकून व्यवसाय करणाऱ्या अमीन मालवीया याच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य फुलले आहे. सर्व कुटुंबिय खुश आहेत. आपल्या वडिलांना पालिका कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या मारहाणीचा व्हिडीओ पाहिल्यानतर आमीनचा 8 वर्षांचा मुलगा सलमान फारच दुःखी झाला होता. त्याला रडून आवरत नव्हतं. परंतु, एबीपी माझाच्या बातमीनंतर वडिलांना मिळालेल्या मदतीमुळे त्याच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
घरातील कर्त्या माणसाला झालेल्या मारहाणीमुळे मंगळवारची रात्र कुटुंबातील सर्वांनीच उपाशी आणि रडत घालवली होती. आता पुढे काय होणार, काय खाणार, मुलांची शिक्षणाची फी कशी देणार? या विचारांनी अमीनच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. अनेक विचारांनी त्याच्या मनात काहूर माजलं होतं. अमीनच्या मनात तर आत्महत्येचेही विचार घोंघावत होते. मात्र एबीपी माझाने बातमी उचलून धरली आणि आमीनसाठी मदतीचा ओघ सुरु झाला. मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी नवीन हातगाडीच अमीनला दिली. तर मिरा रोडच्या मितेश गुप्ता याने त्याचं नुकसान झालेलं सामान घेण्यास आर्थिक हातभार लावला. त्यामुळे अमीनने एबीपी माझाचे आभार मानले आहेत.
दरम्यान, अमीन नालासोपारा पूर्वेला श्री साई गणेश अपार्टमेंट या चाळीत राहतो. ते घर त्याच्या नातेवाईकांचं आहे. दहा वर्षाची मुलगी फजिला ही चौथीत आहे. तर आठ वर्षाचा मुलगा सलमान हा पहिलीत शिक्षण घेत आहे. अमीनचं हातावर पोट होतं. मुलांच शिक्षण, घराचा आर्थिक खर्च कसा भागवायचा हा प्रश्न अमीनची पत्नी नशिमला सतावत होता. मंगळवारी संपूर्ण रात्र कुटुंबांनी उपाशी पोटी जागून काढली होती. परंतु, एबीपी माझाच्या बातमीनंतर मिळालेल्या मदतीमुळे आमीन आणि त्याच्या कुटुंबाला मदतीचा हातभार लागला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
