Raigad Talai Update : मोठी दुर्घटना! रायगड जिल्ह्यातील तळीये गावावर दरड कोसळून जवळपास 36 जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीती
Raigad mahad talai landslide news Update : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामधील तळीये गावात दरड कोसळून जवळपास 36 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Raigad mahad talai landslide news Update : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामधील तळीये गावात दरड कोसळून जवळपास 36 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला असून कोकणातील काही शहरं आणि गावं पाण्याखाली गेल्यानं नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. सततच्या पावसामुळं सातारा आणि रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. यात सर्वात मोठी दुर्घटना ही तळई गावात घडली असून या घटनेने हाहाकार माजला आहे.
काल रात्रीच्या सुमारास ही दरड कोसळल्याची माहिती आहे. मात्र हा दुर्गम डोंगराळ भाग असल्याने मदत कार्यात अडथळे येत होते. मात्र काही वेळापूर्वी एनडीआरएफची टीम ज्यावेळी इथं पोहोचली त्यावेळी ही भयंकर घटना समोर आली. सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. गेल्या काही तासांपासून इथं रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.
एनडीआरएफसह स्थानिक प्रशासनची टीम देखील या ठिकाणी काम करत आहे. घटनेनंतर या गावालगतच्या सर्व वाड्यांमधील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.
रायगडमधील पोलादपूर सुतारवाडी परिसरात दरड कोसळून चार जणांचा मृत्यू
पोलादपूर सुतारवाडी परिसरात दरड कोसळून चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रूमकडून देण्यात आली आहे. पाच लोक अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे. चार जण या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. या घटनेबाबत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दुजोरा दिला आहे. या गावांना जोडणारे पितळवाडी-उमरठ फाटा पूल तसेच उमरठ फाटा ते साखर पूल देखील वाहून गेल्यामुळे मदत यंत्रणा पोहोचू शकत नसल्याची माहिती आहे.
सातारा जिल्ह्यातील कोंडावळे गावात माळीण सारखी मोठी दुर्घटना
सातारा जिल्ह्यातील कोंडावळे या गावात माळीण सारखी मोठी दुर्घटना काल सायंकाळी घडली. या दुर्घटनेत जवळपास पंचवीस घरं गाडली गेली आहेत. डोंगर तुटल्याचे आणि गावाकडे सरकत येत असल्याचे मोठे आवाज काही ग्रामस्थांना दिसले आणि ही ग्रामस्थ मंडळी घरातून बाहेर पळत सुटली. यामुळं अनेक लोकं या मोठ्या दुर्घटनेतून वाचली. या दुर्घटनेत जवळपास 25 घरं गाडली गेली तर 27 लोक बाहेर काढली. मात्र अद्यापही दोन जण यामध्ये अडकलेले आहेत. यातील एका महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.
पाटण तालुक्यात दरड कोसळून चार घरे ढिगाऱ्याखाली
सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात दरड कोसळून सात ते आठ घरे ढिगाऱ्याखाली गेली आहेत. पाटण तालुक्यातील मिरगाव गावावर डोंगर कोसळला. यात सात ते आठ घरं गाडली गेल्याची माहिती आहे. तर पंधरा ते वीस घर घरांचे नुकसान झाले आहे. मध्यरात्री घडलेल्या घटनेमुळे गावात हाहाकार उडाला. यातून एका कुटुंबाला बाहेर काढण्यात यश आलं आहे. या कुटुंबातील एका बालकाचा मृत्यू झाला आहे. या गावाकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेल्याने मदतकार्यात अडथळा येत आहे.