Maharashtra Rain Update : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्र्यांना फोन; कोकणातील पूर परिस्थितीचा घेतला आढावा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्य शासनामार्फत बचाव कार्य कसे सुरू आहे त्याचप्रमाणे कुठल्या उपाययोजना केल्या जात आहेत त्याची माहिती दिली.
मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मात्र कोकणात पावसामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. रत्नागिरी जिह्यातील चिपळूण आणि खेडमध्ये परिस्थिती बिकट आहे. कोकणातील याच परिस्थितीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतला, स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून कोकणातील पूर परीस्थितीची माहिती घेतली. तसेच केंद्र सरकारकडून सर्व मदत करण्याचेही आश्वासन दिले आहे.
पूर परिस्थितीसंदर्भात पंतप्रधान- मुख्यमंत्री यांची चर्चा
राज्यातील पूर परिस्थितीसंदर्भात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना राज्य शासनामार्फत बचाव कार्य कसे सुरू आहे त्याचप्रमाणे कुठल्या उपाययोजना केल्या जात आहेत त्याची माहिती दिली. बचाव आणि मदत कार्यात केंद्र सरकार राज्याला सर्वतोपरी मदत करेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
Spoke to Maharashtra CM Shri Uddhav Thackeray and discussed the situation in parts of Maharashtra in the wake of heavy rainfall and flooding. Assured all possible support from the Centre to mitigate the situation. Praying for everyone’s safety and well-being. @OfficeofUT
— Narendra Modi (@narendramodi) July 22, 2021
रत्नागिरीत जुलै महिन्यात 40 वर्षातला पावसाचा उच्चांक
गेल्या 24 तासांत अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि खेड येथील परिस्थिती अतिबिकट बनली. चिपळूणला महापुराचा विळखा बसला असून संपूर्ण शहर चहुबाजूने पाण्यात आहे. हजारो लोक पुरात अडकले असून एनडीआरफच्या टीम बचावकार्यासाठी दाखल झाल्या आहेत. रत्नागिरीत 1 जुलै ते 22 जुलैपर्यंत 1781.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे आणि हा 40 वर्षातला उच्चांक आहे. मागील 10 दिवसात 1426.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 2011 साली जुलै महिन्यात 1732 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत 183 टक्के पाऊस झाला आहे.
तळकोकणात 25 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट, अत्यंत आवश्यक असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे : जिल्हाधिकारी
जगबुडी, वशिष्टीसह अनेक नद्यांनी धोका पातळी ओलांडली
रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीची धोका पातळी 7 मीटर असून सध्या ती 9 मीटर वरून वाहते आहे. वशिष्टी नदीची धोका पातळी 7 मीटर असून ती 7.8 मीटर वरून वाहते आहे. काजळी नदी धोका पातळीच्या 1.74 मीटर वरून वाहत असून कोदवली, शास्त्री, बावनदी या नद्या धोका पातळीवरून वाहत आहेत. यामुळे खेड, चिपळूण, लांजा, राजापूर, संगमेश्वर या शहरे व परिसरातील गावांमध्ये शासकीय यंत्रणांनी नागरिकांना हलवणे, स्थलांतर करणे व इतर मदत कार्य जोरात सुरु केले आहे.