(Source: Poll of Polls)
नेटबँकिंगचा नंबर बदलवून व्यापाऱ्याचे 26 लाख लुटले, पोलिसांच्या मदतीनं रक्कम परत मिळाली!
बँकेशी जोडलेला मोबाईल क्रमांक एका भामट्याने व्यापाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून बदलून घेतला. बँकेनेही काळजी न घेता व्यापाऱ्याच्या नेट बँकिंगचा नंबर बदलून टाकला. त्या भामट्याने एका रात्रीत व्यापाऱ्याच्या बँक खात्यातून 26 लाख 50 हजार रुपये इतर बँक खात्यात वळते करत व्यापाऱ्याला अक्षरश: रस्त्यावर आणले.
नागपूर : नागपुरातील नावाजलेल्या व्यापाऱ्याचा बँकेशी जोडलेला मोबाईल क्रमांक एका भामट्याने व्यापाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून बदलून घेतला. बँकेनेही काळजी न घेता व्यापाऱ्याच्या नेट बँकिंगचा नंबर बदलून टाकला. त्या भामट्याने एका रात्रीत व्यापाऱ्याच्या बँक खात्यातून 26 लाख 50 हजार रुपये इतर बँक खात्यात वळते करत व्यापाऱ्याला अक्षरश: रस्त्यावर आणले. मात्र, नागपूर पोलिसांच्या सायबर सेल ने मेहनत घेत व्यापाऱ्याचा एक न एक रुपया त्याला परत मिळवून दिला आहे.त्यामुळे आर्थिक गुन्ह्यात वेळेत तक्रार नोंदविली आणि पोलिसांनी योग्य पाठपुरावा केला तर संपूर्ण रक्कम मिळू शकते हे अधोरेखित झाले आहे.
नागपूरचे प्रसिद्ध मसाला व्यापारी विनोद हेमनानी यांचे इतवारी परिसरात मोठे व्यापार आहे. ते नेहमीच बँकेच्या माध्यमातून लाखोंचे व्यवहार करतात. मात्र, 23 नोव्हेंबर रोजी त्यांच्याच जुन्या परिचयाच्या एका भामट्याने विनोद हेमनानी यांची बनावट स्वाक्षरी करत हेमनानी यांच्या नावाने त्यांचा बँक खाता असलेल्या आयसीआयसीआय बँकेत अर्ज दिला आणि हेमनानी यांच्या खात्याशी जोडलेला मोबाईल क्रमांक बदलण्याची विनंती केली. बँकेने निष्काळजी करत हेमनानी यांच्याकडे चौकशी न करता अर्ज ग्राह्य धरला आणि नेटबँकिंगचा मोबाईल क्रमांक बदलून दिला.
मग काय त्या भामट्याने एका रात्रीत हेमनानी यांच्या खात्यातून तब्ब्ल 26 लाख 50 हजार रुपये एका इतर बँक खात्यात वळते केले. भामट्याने खेळलेल्या खेळीमुळे हेमनानी यांचा मूळ मोबाईल नंबर आता त्यांच्या नेटबँकिंग व्यवहारांशी जोडलेला नसल्याने त्यांना बँकेतून एवढी मोठी रक्कम काढण्यात आल्याचा कोणताही मॅसेज आला नाही. तीन चार दिवसांनी जेव्हा विनोद हेमनानी एका आरटीजीएस व्यवहारासाठी बँकेत गेले तेव्हा बँक अधिकाऱ्यांनी त्यांच्या खात्यात एक ही रुपया नसल्याची माहिती दिली. विनोद यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी बँकेकडे चौकशी केली असता त्यांच्या नावाने मोबाईल नंबर बदलविण्यासंदर्भात बँकेकडे आलेला अर्ज त्यांना दाखवण्यात आला. असा कोणताही अर्ज आपण केलेला नसल्याचे हेमनानी यांनी सांगितल्यावर बँकेने लगेच काढण्यात आलेल्या रकमेचा शोध सुरु केला.
हेमनानी यांनी आधी स्थानिक पोलीस ठाण्यात आणि नंतर नागपूर पोलिसांच्या सायबर सेल मध्ये तक्रार नोंदविली. सायबर सेलच्या पोलिसांनी तातडीने कारवाई करत रिझर्व्ह बँकेच्या आदेशाची बँक अधिकाऱ्यांना आठवण करून दिली. जर ग्राहकाची कोणतीही चूक नसेल आणि तरी त्याचा आर्थिक नुकसान होत असेल तर त्याला नुकसान झालेली संपू्र्ण रक्कम मिळवण्याचा अधिकार असल्याचे बँकेच्या आठवणीत आणून देण्यात आले. मग काय बँक अधिकाऱ्यांनी ज्या ज्या खात्यात रक्कम पुढे गेली होती ती सर्व गोठवत गायब केलेल्या रकमेचे पुढचे व्यवहार थांबविले.
आता अखेरीस एक महिन्यानंतर हेमनानी यांना त्यांच्या खात्यातून गायब करण्यात आलेली सर्व 26 लाख 50 हजारांची रक्कम परत मिळाली आहे. पोलिसांनी वेळेत केलेल्या मदतीमुळे आणि केलेल्या मार्गदर्शनामुळे गमावलेली रक्कम मिळाल्याची प्रतिक्रिया हेमनानी यांनी एबीपी माझासोबत बोलताना दिली आहे.