अंबानींचं घर हे वक्फच्या जमिनीवर; आमदार जितेंद्र आव्हाडांचा दावा, मंदिरांमधील सोन्याबाबतही स्पष्टच बोलले
आता माझा सरकारला सवाल आहे की, हिंदू मंदिरात अब्जो रुपयांचे सोन आहे, आता हे सोनं तुम्ही ताब्यात घेणार का? मला सरकारने उत्तर द्यावं, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

मुंबई : देशाच्या संसदेत वक्फ बोर्ड विधेयकावर चर्चा सुरू असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या विधेयकावरुन खडाजंगी होत असल्याचं दिसून येत आहे. राज्यातही महायुती सरकारमधील भाजप आणि महाविकास आघाडीतील शिवसेना या विधेयकातील चर्चेवरुन, पाठिंब्यावरुन आमने-सामने आली आहे. शिवसेना ठाकरे गटाने आपलं हिंदुत्त्व सिद्ध करत वक्फ बोर्ड विधेयकाला समर्थन करावं, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं आहे. तर, ठाकरेंच्यावतीने शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही फडणवीसांना जशास तसे उत्तर दिलंय. आता, या विधेयकावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी वक्फ बोर्ड विधेयकास स्पष्टपणे विरोध दर्शवला आहे. तसेच, अंबानींचं (Ambani) घर हे वक्फ बोर्डाच्या जमिनीवर आहे, मुस्लिम समाजातील काही नेत्यांनी कायद्याचा दुरुपयोग केलाय, असा दावाच आमदार आव्हाड यांनी केला आहे.
आता माझा सरकारला सवाल आहे की, हिंदू मंदिरात अब्जो रुपयांचे सोन आहे, आता हे सोनं तुम्ही ताब्यात घेणार का? मला सरकारने उत्तर द्यावं, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. लोकांच्या धार्मिक विषयात जायची काय गरज आहे. संविधानाच उल्लंघन करण्याचं काम सुरू आहे, आता आपल्याकडे दक्षिणेतील मंदिराकडे भारताला श्रीमंत करतील असं दुप्पट सोनं आहे. मग, आपण वक्फ बोर्डला विरोध कशाला करायचा? एकदा जमीन वक्फ करण्यात आली म्हणजेच समाजासाठी दान करण्यात आली, परत ती हस्तांतरित करण्यात येणार नाही. आता कायदा करायचा असेल तर असा करा की या जमिनीकडे कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही, त्यांच्या वाड वडिलांनी वक्फला दान केलेल्या जमिनी आहेत, असेही आव्हाड यांनी म्हटले. अंबानींच घर हे वक्फच्या जमिनीवर आहे, मुस्लिम समाजातील काही नेत्यांनी कायद्याचा दुरुपयोग केला. आता दिल्लीच्या मध्यवर्ती भागातील जमिनी देखील मोकळ्या बाजारात येणार आहेत, असा दावाही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
किरण रिजजू यांच्या वक्तव्यासंदर्भात आव्हाड यांना विचारले असता, मी केवळ यावर हसेल. कारण ते म्हणतात की संसद वक्फच्या जागेवर आहे. अरे इंग्रजांच्या काळापासून संसद त्याठिकाणी आहे. उगाच चुकीची माहिती पसरवू नका, असे आव्हाड यांनी म्हटले. किरण रिजीजूसारखा माणूस म्हणतो की उद्या हे संसदेच्या जमिनीवर हक्क सांगतील. किरण रिजीजू आम्ही काय वेडे आहोत का? सरकारचा एक जबाबदार मंत्री सभागृहात ऑन रेकॉर्ड चुकीची वक्तव्य करतो आणि हे वक्तव्य जगभर जात आहे. आता यावर काय बोलायचं? अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
अजित पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया
आई-वडिलांच्या आणि चुलत्याच्या कृपेनं बरं चाललंय, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्यावर, अजित पवार काय म्हणाले माहिती नाही, पण दोन्ही राष्ट्रवादी कामाने आणि विचाराने वेगळ्या आहेत. आम्ही शरद पवारांच्या विचाराने पुढे चाललो आहोत, गांधी नेहरू यांच्या विचाराने जात आहोत, असे आव्हाड म्हटले.
हेही वाचा
कर्जमाफी करत राहणे हा शेतीवरचा उपाय नाही; सदाभाऊ खोत स्पष्टच म्हणाले, मला राज्यपाल करावे
























