कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
लोकल ट्रेनमधून धूर येत असल्याने प्रवाशांमध्ये भीती पसरली आणि फलाटावरील सर्वच प्रवासी आपला जीव वाचवण्यासाठी रुळावर धावू लागले.

मुंबई : राजधानी मुंबईतील चाकरमान्यांची जीवनवाहिनी असेलल्या मुंबईल लोकलची (Local) सुरक्षा अतिशय महत्त्वाची मानली जाते. कारण, दररोज 40 लाखांपेक्षा जास्त प्रवासी या लोकलने प्रवास करत असतात. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर लाईन अशा तीन लाईनवरुन मुंबईच्या कानाकोपऱ्यातून प्रवासी लोकलने प्रवास करतात. त्यामुळे, या प्रवासांच्या सुरक्षेचीही काळजी रेल्वे प्रशासनाला असते. मात्र, मुंबई (Mumbai) लोकलच्या हर्बल लाईनवरील कुर्ला स्टेशनवर उभा असलेल्या लोकल ट्रेनमध्ये आज सायंकाळी धूर निघत असल्याने गोंधळ उडाला. प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर उभ्या असलेल्या पनवेलकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून धूर येऊ लागल्याने कुर्ला फलाट क्रमांक 7 वर काहीकाळ गोंधळ उडाला होता.
लोकल ट्रेनमधून धूर येत असल्याने प्रवाशांमध्ये भीती पसरली आणि फलाटावरील सर्वच प्रवासी आपला जीव वाचवण्यासाठी रुळावर धावू लागले. याबाबत माहिती मिळताच रेल्वे पोलीस, एएफआर आणि जीआरपी तत्काळ घटनास्थळी हजर झाले होते. मात्र, तोपर्यंत प्रवाशांमध्ये गोंधळ उडाल्याने ब्रिजवरुन बाहेर पडण्यासाठी प्रवाशांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं. सायंकाळी 7 ते 7:15 वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून वडाळा ते चेंबूर प्रवासासाठी प्रवाशांना तब्बल दीड तास लागल्याचे समजते. दरम्यान, या घटनेमुळे हार्बर लाइनवरील लोकल 10 ते 15 मिनिट उशिराने धावल्या असून प्रवाशांचा खोळंबा झाला. तर, धूर निघत असलेल्या लोकलची पाहणी करण्यासाठी रेल्वेतील टेक्निकल स्टाफ व कर्मचारीही फलाटवर आले होते. सध्या, रेल्वे सेवा सुरळीत सुरू झाल्याची माहिती आहे.























