कोकण, विदर्भासह मराठवाड्याला पावसानं झोडपलं, मुंबईकरांना मात्र पावसाची प्रतीक्षा
Maharashtra Rain Latest News : पालघरसह ठाण्यात पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली, मुंबईकरांना मात्र अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
मुंबई : राज्यात विविध भागात पावसाची हजेरी (Monsoon) पाहायला मिळत आहे. ठाण्यात (Thane Rain) पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे कामगार वर्गांचे हाल झाले. मुंबईकरांना मात्र, अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मुंबईत तुरळक ठिकाणे वगळता गेल्या चार दिवसांपासून पाऊस दडी मारुन बसला आहे. ठिकठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली. पावसाळ्यामुळे वाहतूक धिम्या गतीने सुरु होती. वंदना डेपो परिसरात पाणी साचायला सुरुवात झाली. शुक्रवारी दिवसभराच्या विश्रांतीनंतर आज पालघरमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू झाला. पहाटेपासूनच पालघर, बोईसर परिसरात मुसळधार पाऊस पाहायला मिळाला. भात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांची शेतीच्या कामाची लगबग सुरू झालीय.
वादळी वारे,विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस
अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर परभणी शहरासह जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. वादळी वारे,विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस परभणीत झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून खोळंबल्या पेरण्यांना आता गती येण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. सर्वसामान्य परभणीकरांनाही उकाड्यापासून काहीशी मुक्ती मिळालीय. जोरदार पाऊस बरसल्याने वातावरणही थंड झालं आहे.
पेरणीचे संकट टळणार, मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम
बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. खामगाव, शेगाव, संग्रामपूर परिसरात दमदार पाऊस तर इतर भागात हलका ते मध्यम पाऊस सुरू आहे. वाशिम जिल्ह्यात काही भागात तीन ते चार दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने जिल्ह्यात काही ठिकाणी रात्री जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला तर, दुबार पेरणीचे संकट टळणार आहे. जिल्ह्यात मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
मान्सून पूर्व विदर्भात दाखल
अखेर मान्सून नागपुरात दाखल झाला आहे. नागपूरसह मान्सून पूर्व विदर्भात दाखल झाल्याची घोषणा हवामान खात्याकडून करण्यात आली आहे. नागपुरात 16 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याच अंदाज होता, मात्र 5 दिवसांच्या विलंबाने मान्सून दाखल झाला आहे. केरळनंतर कोकण किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बहुतेक भागात मान्सून सुमारे यापूर्वीच दाखल झाला होता. मात्र पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीत मान्सून पोहोचला नव्हता. मान्सून अभावी वातावरणात उकाडा जाणवत असून शेतातील पेरण्याही खोळंबल्या. बंगालच्या उपसागरात तसेच अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाल्याने मान्सूनच्या ढगांनी जोर पकडला. शुक्रवारी संध्याकाळी तासभर पडलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांना दिलासा मिळाला. पुढील तीन ते चार दिवस नागपुरात चांगला पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.