सेनेच्या बंडखोरांसाठी गुवाहाटीतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये 70 रुम बुक, आमदारांच्या बडदास्तीसाठी दिवसाला येतोय इतका खर्च
Maharashtra Political Crisis : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे समर्थक भाजपशासित असलेल्या आसाममधील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत.

मुंबई: राज्यातील शिवसेनेत उभी फुट पाडून एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार सध्या आसाममधील गुवाहाटीतील रॅडिसन ब्लू (Radisson Blu) या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आहेत. या हॉटेलमधील 70 रुम या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसाठी बुक करण्यात आल्या आहेत. बंडखोरांच्या या लवाजम्यासाठी दिवसाला 8 लाखांचा खर्च तर सात दिवसांचा खर्च हा 56 लाख रुपये इतका असल्याचं एनडीटीव्हीने एका वृत्तामध्ये सांगितलं आहे.
एकनाथ शिंदे हे त्यांच्या समर्थक आमदारांसह सुरुवातीला सुरत या ठिकाणी होते. त्या ठिकाणाहून त्यांना एअरलिफ्ट करण्यात आलं आणि गुवाहाटीला नेण्यात आलं. गुजरात आणि आसाम या दोन्ही राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. गुवाहाटी या ठिकाणच्या रॅडिसन ब्लू या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये या सर्व आमदारांची सोय करण्यात आली. सात दिवसांसाठी 70 रुम बुक करण्यात आल्या. या सात दिवसांचे भाडे 56 लाख रुपये असल्याची माहिती आहे. म्हणजे दिवसाला आठ लाख रुपये इतकं भाडं आकारलं जात आहे.
गुवाहाटीतील रॅडिसन ब्लू (Radisson Blu) हे फाईव्ह स्टार हॉटेल असून त्यामध्ये एकूण 196 रुम आहेत. यामधील 70 रुम या सेनेतील बंडखोर आमदार आणि त्यांच्या टीमसाठी बुक करण्यात आल्या आहेत. आता या हॉटेलमध्ये कोणतीही नवीन बुकिंग करण्यात येत नसून कोणत्याही नवीन व्यक्तीला प्रवेश देण्यात येत नाही. या आधी ज्या कॉन्फरन्स आयोजित करण्यात आल्या होत्या, ज्यांचे बुकिंग आधीच करुन ठेवण्यात आलं होतं, ते सर्व बुकिंग रद्द केल्याची माहिती आहे.
सुरतमधील खर्च, या सर्व आमदारांना विशेष विमानाने गुवाहाटीला आणणे, इथे त्यांची ठेवण्यात येणारी बडदास्त या सर्वाचा आतापर्यंतचा खर्च कुणालाही माहिती नाही, आणि हा सर्व खर्च कोण करतंय हेही कुणाला माहिती नाही.
शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी आमदारांची इच्छा असेल तर आमदारांनी 24 तासांत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित राहून चर्चा करावी असे आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
