महाराष्ट्रातील अजब घटना, प्राथमिक आरोग्य केंद्र बँकेत गहाण
बँकेत आपण खासगी ऐवज, शेती, जमीन, सोनं-चांदी गहाण ठेवल्याचं ऐकलं असेल. इतकेच काय तर चारचाकी अथवा दुचाकीही गहाण ठेवली जाते. परंतु, प्राथमिक आरोग्य केंद्राचा सातबारा गहाण ठेवल्याचे ऐकले आहे का?
Maharashtra Hingoli Latest News : बँकेत आपण खासगी ऐवज, शेती, जमीन, सोनं-चांदी गहाण ठेवल्याचं ऐकलं असेल. इतकेच काय तर चारचाकी अथवा दुचाकीही गहाण ठेवली जाते. परंतु, प्राथमिक आरोग्य केंद्राचा सातबारा गहाण ठेवल्याचे ऐकले आहे का? होय हे खरे आहे. हिंगोलीत हा प्रकार घडला आहे. 5 लाख रुपये कर्ज घेऊन आरोग्य केंद्राच्या सात बारा सह इमारत गहाण ठेवण्यात आला आहे. पाहूयात नेमका हा काय प्रकार आहे…
हिंगोलीतील डोंगरकडा येथील आरोग्य केंद्राच्या सातबारा सह इमारत गहाण ठेवण्यात आली आहे. हिंगोली जेव्हा परभणी जिल्ह्यात आसताना 1978 साली हे आरोग्य केंद्र उभारण्यात आले होते. तीन एकर शेत जमिनीवर आरोग्य केंद्राची उभारणी करण्यात आली होती. तत्कालीन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री रजनी ताई सातव यांच्या हस्ते या आरोग्य केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले होते. या आरोग्य केंद्रात डोंगरकडा सह अन्य 10 -12 गावातील नागरिकांना आरोग्य सेवा दिली जाते. परंतु आता ह्या आरोग्य केंद्राचा संपूर्ण सातबारा डोंगरकडा येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा येथे गहाण आहे.
या आरोग्य केंद्राची उभारणी करत असताना कागदोपत्री पूर्तता न करता आरोग्य केंद्र उभारण्यात आले होते. आरोग्य केंद्राची जमीन मूळ मालकाच्याच नावावर राहिली. शंकरराव बळवंतराव देशमुख असे संबंधित शेतकऱ्यांचे नाव आहे. सध्या ज्या शेतकऱ्याच्या नावावर आरोग्य केंद्राचा सातबारा आहे त्याने ही जमीन गहाण ठेवली असून पाच लाख रुपये कर्ज घेतले आहे. शेतकऱ्याने हा सातबारा भारतीय स्टेट बॅक शाखा डोंगरकडा येथे गहाण ठेवला आहे.
सातबाराची संकलित सर्व माहिती महसूल प्रशासनाकडे असते. संबंधित सातबाराची नोंद कशा पद्धतीने आहे, परिस्थिती काय? याविषयी आम्ही संबंधित गावचे तलाठी यांची प्रतिक्रिया घ्यायचा प्रयत्न केला. तसेच या विषयी प्रशासनाला विचारणा केली. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या दालनात जाऊन चौकशी केली, आसता त्यांनी या संदर्भात प्रशासनाकडे नोंदच नसल्याचे सांगण्यात आले. संबंधित शेतकऱ्यांशी याबाबत विचाराणा करायचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला.
एरवी शेतकऱ्याला कर्ज घ्यायचे असेल तर बँकेत अनेक खेटे मारावे लागतात. कागदपत्रांची पूर्तता करुनही पडताळणीत कर्ज कशा पद्धतीने नामंजूर करता येईल, यासाठी बँकेकडून प्रयत्न केले जातात. अपवादात एखादा प्रस्ताव मंजूर झाला तरी संबंधित ठिकाणची पाहणी करण्यासाठी बँक अधिकारी त्याठिकाणी भेट देतात. परंतु या प्रकरणात मात्र तसे काही होताना दिसले नाही. या प्रकरणामध्ये बँकेकडून किती निष्काळजीपणा झाले, हे समोर आले आहे. या कर्जाची परतफेड केली नाही तर बँक प्रशासन हे आरोग्य केंद्र जप्त करणार का आणि अशा पद्धतीने या शेत जमिनीवर कर्ज उचलणाऱ्या संबंधित शेतकऱ्यावर कार्यवाही होणार का याकडेच समस्त डोंगरकडा येथील ग्रामस्थांचे लक्ष आहे.