(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सकारात्मक! राज्यात नवीन कोरोना रुग्णसंख्येचा आलेख शुक्रवारी आणखी खाली, रिकव्हरी रेटही 93.24 टक्क्यांवर
Maharashtra Corona update : महाराष्ट्रात आज 31,671 रुग्णांना डिस्चार्ज तर 20,740 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. राज्याचा रिकव्हरी रेट 93.24 टक्क्यांवर पोहचल्याने समाधान व्यक्त करण्यात येतंय.
मुंबई : राज्यात नवीन कोरोना रुग्णसंख्येचा आलेख आज आणखी खाली आला आहे. रिकव्हरी रेट वाढल्याने समाधान व्यक्त केलं जातंय. राज्यात आज 20,740 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 31 हजार 671 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रिकव्हरी रेट 93.24 टक्क्यांवर पोहचला आहे. दरम्यान आज 424 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झालाय.
आजपर्यंत एकूण 53,07,874 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 93.24 टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.64 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,43,50,186 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 56,92,920 (16.57 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 21,54,976 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 16,078 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
पुणे शहरात अत्यावश्यक सेवा शनिवार-रविवारही सुरु राहणार
पुणे मनपा हद्दीत शनिवार आणि रविवारीही अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरु राहणार आहेत. या संदर्भातील मागणी आपण आढावा बैठक केली असता, त्यानुसार निर्णय घेतला आहे. किराणा, भाजी, दूध, बेकरी अशा आस्थापनांचा यात समावेश असेल, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
ज्यांची घरे लहान आहेत त्यांच्यासाठी संस्थात्मक विलगीकरण आवश्यक : आरोग्यमंत्री
कोरोना रुग्ण आढळल्यास त्याने योग्यरित्या गरज लागेल ते सर्व उपचार घेणं गरजेचं आहे. घरी उपचार घेण्यास शक्य असल्यास जरूर घ्यावे. मात्र, त्यामुळे आपण इतरांच्या संपर्कात तर येत नाही ना याची खबरदारी घ्यायला हवी असं आरोग्यमंत्री म्हणाले. गृह विलगीकरणासाठी रुग्णाला घरात पुरेशी जागा असणं गरजेचं आहे. पुण्यात मुख्यत: संस्थात्मक विलगीकरण म्हणजेच इन्स्टिट्यूशनल क्वॉरंटाईन करण्यावर भर दिला जाईल, जेणेकरून रुग्णसंख्या नियंत्रणात येण्यास मदत होईल, असं आरोग्यमंत्री म्हणाले.
सर्वच रुग्णांना सरसकट संस्थात्मक विलगीकरण करणं अनिवार्य नसून केवळ ज्यांची घरं लहान आहेत, कुटुंबियांची संख्या जास्त आहे अशा रुग्णांना घरीच उपचार न घेता संस्थात्मक विलगीकरणात दाखल होणं गरजेचं आहे. ज्यांच्या घरांमध्ये रुग्णाला पूर्णपणे एक खोली वेगळं राहण्यासाठी उपलब्ध आहे अशांसाठी हे लागू होणार नाही, त्यांनी घरी उपचार घेतल्यास कोणतीही अडचण नाही. मात्र ज्यांची घरं लहान आहेत, घरातील कुटुंबियांची संख्या जास्त आहे, घरी राहून विलगीकरण शक्य नाही, अशा नागरिकांनी संस्थात्मक विलगीकरणात सहभागी होणं महत्त्वाचं आहे.