नागपुरातील शासकीय रुग्णालयात नवीन विभाग, मशीनही आल्या, पदं मात्र रिक्तच, रुग्णांची गैरसोय
रुग्णालय प्रशासनाला कोणत्याही खरेदीसाठी, निधीसाठी मंत्रालयाकडे पाहत राहावे लागते. GMC, IGGMCच्या स्थितीकडे सरकारने गांभीर्याने लक्ष न दिल्यामुळे दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे.
Nagpur : विविध साथीचे रोग आणि वाढत्या रुग्णांच्या प्रमाणामुळं सध्या दवाखान्यांमध्ये खूप गर्दी पाहायला मिळतेय. नागपुरातही वेगळी परिस्थिती नाही. नागपुरात शासकीय रुग्णालयांवरील भार सातत्याने वाढत आहे. मात्र तिथं कर्मचाऱ्यांची संख्या मात्र दिवसेंदिवस कमी होत चालल्याचं दिसत आहे. या विरोधाभासी स्थितीमुळे तोकडे मनुष्यबळ ही गंभीर समस्या ठरत आहे. त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होताना दिसून येत आहे. त्यामुळे रुग्णांनाही गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
रुग्णांची संख्या वाढल्याने खाटा कमी पडू लागल्या आहेत. यामुळे मेयोमध्ये (Indira Gandhi Government Medical College) 250 आणि मेडिकलमध्ये 500 अशा एकूण 750 खाटांची वाढ करण्यात आली. मात्र 5 वर्षे उलटूनही वाढीव खाटांना मंजुरी मिळू शकली नाही. बेडच्या जुन्याच आकड्यांच्या आधारेच मनुष्यबळ मंजूर आहे. त्यातही निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर नवीन भरतीही केली जात नाही. निवासी डॉक्टरांवर कामाचा ताण वाढल्याची परिस्थिती आहे. त्याचबरोबर अनेक वेळा नातेवाईकांनाच परिचर म्हणून काम करावे लागते. 2017 मध्ये मेयोमध्ये ( IGGMC) सर्जिकल कॉम्प्लेक्स सुरू करण्यात आले. यापूर्वी 590 खाटा होत्या. मात्र नवीन इमारत बांधल्यानंतर 250 खाटांची वाढ करण्यात आली. यामध्ये ऑर्थोपेडिक, ईएनटी, नेत्र, शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यात आले.
नवीन विभाग, यंत्रही आले, पदे मात्र रिक्तच
खाटा वाढवल्यानंतर नियमानुसार मनुष्यबळही वाढवायला हवे होते. मात्र, कर्मचाऱ्यांची वाढ सोडाच रिक्तपदेची (vacant post) पूर्ण क्षमतेने भरली गेली नाहीत. सध्या परिचारिकांची 115 पदे, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची 200 पदे, फार्मासिस्टची 6, तंत्रज्ञांची 5 व इतर पदे रिक्त आहेत. मेयोतील जुन्या व नवीन खाटांचा मिळून एकूण संख्या 833 वर पोहोचली आहे. त्या तुलनेत परिचारिकांची संख्या केवळ 475 आहे. यातील 10 ते 15 टक्के परिचारिका विविध कारणांनी रजेवर आहेत. परिचारिकांवरही कामाचा ताण वाढला आहे. अनेक वॉर्डांमध्ये केवळ 2 परिचारिका आहेत. अशा परिस्थितीत अनेक वेळा कुटुंबातील सदस्यांना परिचर म्हणून काम करावे लागते. तसेच मेडिकलमध्ये 1400 खाटांना मान्यता मिळाली असली तरी रुग्णांची वाढती संख्या पाहता वाढील 500 खाटांसह काही नवीन विभागही सुरू करण्यात आले आहेत. अशा प्रकारे मेडिकलमधील खाटांची संख्या 1900 वर पोहोचलीआहे. खाटा वाढवल्यानंतर नवीन पदे मंजूर झालेली नाहीत. आपल्याला मर्यादित मनुष्यबळानेच काम करायचे आहे.
प्रत्येक वेळी डॉक्टरांनाच दोष
व्हेंटिलेटर, आयसीयू आणि औषधांअभावी रुग्णाचा मृत्यू झाला की, डॉक्टरांना जबाबदार धरले जाते, मात्र वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष केले जाते. कोविड काळात मेडिकल (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय GMC) आणि मेयोला अतिरिक्त व्हेंटिलेटर मिळाले होते पण यापैकी बरेच बंद पडले आहेत. दुरुस्तीसाठी महिनाभर वाट पाहावी लागते. कोणत्याही खरेदीसाठी, निधीसाठी मुंबईत असलेल्या मंत्रालयाकडे पाहत राहावे लागते. वैद्यकीय महाविद्यालयांच्या दुरवस्थेकडे सरकारने गांभीर्याने लक्ष न दिल्याचा परिणाम म्हणजे दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे.
ही बातमी देखील वाचा
Nagpur: अभिमानास्पद...! नागपूर मेट्रोच्या 'डबल डेकर व्हाया-डक्ट'ला गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )