CRY Report : कोरोनाकाळात महाराष्ट्रात बालकामगार संख्येत लक्षणीय वाढ, जालना, नंदुरबार आणि परभणीतील स्थिती गंभीर
ग्रामीण जिल्ह्यात कृषी क्षेत्रात मोठ्या संख्येने मुले काम करत असून, जमा केलेल्या माहितीवरून जालना, नंदुरबार आणि परभणी जिल्ह्यांमध्ये परिस्थिती गंभीर असल्याचे आढळून आले.
मुंबई: कोरोना प्रादुर्भावाच्या गेल्या दोन वर्षांच्या काळामध्ये आर्थिक तसेच सामाजिक बदल मोठ्या प्रमाणामध्ये झाले आहेत. त्यामध्ये राज्याच्या ग्रामीण तसेच शहरी भागातील मुलांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर खोलवर परिणाम झाला आहे. कोरोना काळात राज्यातील बालकामगारांच्या संख्येमध्ये लक्षणीयरित्या वाढ झाली असून जालना, नंदुरबार आणि परभणी या तीन जिल्ह्यामध्ये परिस्थिती अधिक गंभीर असल्याचं क्राय या संस्थेनं आपल्या अहवालात नमूद केलं आहे. ग्रामीण जिल्ह्यात कृषी क्षेत्रात मोठ्या संख्येने मुले काम करत असून, जमा केलेल्या माहितीवरून जालना, नंदुरबार आणि परभणी जिल्ह्यांमध्ये परिस्थिती गंभीर असल्याचे आढळून आलं आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन लागल्यानंतर राज्यातील, प्रामुख्याने जालना, लातूर, वर्धा, अहमदनगर, नंदुरबार आणि परभणी या सहा ग्रामीण जिल्ह्यातील बालमजुरीत असलेल्या किंवा शेतीमध्ये काम करणाऱ्या मुलांची संख्या 2020 पासून वाढली असल्याचे CRYने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले. बालकामगारांचा एकूण आकडा 2020 मध्ये 2556 वरून 2021 मध्ये 3356 वर गेला आहे आणि सध्या 2022 मध्ये हीच आकडेवारी 3309 इतकी आहे
CRY (पश्चिम) चे संचालक क्रियान रबाडी यांनी या वाढीमागील कारणे स्पष्ट करताना सांगितले की, "शाळा बंद होणे, ऑनलाइन वर्गांसाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि मोबाईल फोनचा अभाव, नोकरी गमावल्यामुळे कुटुंबांवर आर्थिक ताण तसेच सरकारी बससेवेच्या प्रदीर्घ संपामुळे ग्रामीण भागातील मुलांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम झाल्याचे दिसून आले. त्याद्वारे त्यांना शेतीत तसेच कौटुंबिक उद्योगांमध्ये काम करण्यास भाग पडले."
बालमजुरी करणाऱ्या मुलांबाबतची काही निरीक्षणे :
- दुर्दैवाने मुलांना आपल्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीचा भार जाणवून त्यांनी शाळेत जाण्याऐवजी काम करणे पसंत केले आहे.
- अशीही काही मुले होती ज्यांनी आपल्या पालकांसह शेतात काम करण्यासाठी दररोज 100 ते 500 रुपयांपर्यंत कमाई केल्याचा दावा केला होता.
- अनेकदा पाठ्यपुस्तके, शालेय गणवेश, फी भरणे तसेच इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी या मिळकतींचा उपयोग होत असला तरीही चिंताजनक बाब म्हणजे, काही मुले त्यांची कमाई तंबाखूजन्य उत्पादनांवर खर्च करतात असे दिसून आले आहे.
- शेतीतील रासायनिक खतांमुळे व औषधांमुळे काही मुलांना त्रास झाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत.
- मुले कामानिमित्त शेजारच्या शहरात स्थलांतरित होतात. मुंबई, पुणे, दौंड, बीड, मनमाड, औरंगाबाद, नाशिक या शहरांमध्ये घरकामगार, भिकारी, मजूर म्हणून ही मुले अनेकदा वाढपी किंवा वीटभट्टी मजुरीचे काम करतात. ऊस तोडणी, सिंचन, शेतजमिनीची मशागत, पेरणी किंवा लागवड, आंतरपीक, मळणी, फवारणी आदी कामांमुळेही अनेकजण स्थलांतर करतात.