आठवणीतील वारी...वारीच्या आठवणी...| आज बाजीराव विहीर परिसरात रिंगणासाठी वैष्णवांचा मेळा जमला असता!
कोरोनामुळे मागच्या कित्येक वर्षात पहिल्यांदा आषाढी पायीवारी निघाली नाही. यंदा आपण केवळ प्रवासाचे टप्पे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रथेप्रमाणे जर वारी निघाली असती तर आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी बाजीराव विहिरीजवळ उभे आणि गोल रिंगण केले असते.
कोरोनामुळे मागच्या कित्येक वर्षात पहिल्यांदा आषाढी पायीवारी निघाली नाही. तुकोबांच्या पादुका या देहूत तर माऊलींच्या पादुका आळंदीतच आहेत. आपण केवळ प्रवासाचे टप्पे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रथेप्रमाणे जर वारी निघाली असती तर आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी बाजीराव विहिरीजवळ उभे आणि गोल रिंगण केले असते.
शेकडो किलोमीटरचे अंतर चालत जाऊन मुक्काम दर मुक्काम करत वीस ते बावीस दिवसाच्या एकूण प्रवासात वारकऱ्यांसाठी रिंगणाला मोठे महत्त्व आहे. थकल्या भागलेल्या वारकऱ्यांसाठी खेळाच्या माध्यमातून थकवा दूर करण्यासाठी रिंगणाची सुरुवात झाली खरी, मात्र हेच रिंगण सोहळे आज या वारीतील सर्वोच्च आनंद देणारे ठरत आहेत. केवळ वारकऱ्यांसाठीच रिंगणाचे महत्त्व आहे, असं नाही तर हा रिंगण सोहळा अनुभवणाऱ्यांसाठी ही जणू पर्वणीच असते..
माऊली महाराजांच्या एकूण पालखी मार्गामध्ये सात प्रकारचे रिंगण सोहळे पार पडतात. यातील तीन रिंगण हे उभे असतात तर चार गोल रिंगण पार पडतात. एकूण मार्गातील पहिले गोल रिंगण सदाशिवनगरमध्ये झाले असते. त्यानंतर खडूस फाटा, मग ठाकूर बुवाची समाधी आणि सगळ्यात शेवटचे गोल रिंगण हे पंढरपूरजवळ वाखरीला बाजीराव विहीर येथे पार पडले असते.
आज बाजीराव विहीर परिसरात रिंगण सोहळ्याची पर्वणी मिळाली असती.
प्रथेप्रमाणे आषाढी वारी निघाली असती तर माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्यातील आजचा दिवस सगळ्यात महत्त्वाचा ठरला असता. कारण आजच्याच दिवशी ऐतिहासिक बाजीराव विहीर परिसरामध्ये माऊलींच्या पालखी सोहळ्याचे उभे आणि गोल असे दोन्ही रिंगण पार पडले असते. एकूण पालखी मार्गामध्ये हे शेवटचे रिंगण ठरले असते. विशेष म्हणजे आता माऊली आणि तुकोबांच्या पालखी एकाच मार्गावरुन पंढरपूरमध्ये पोहोचल्या असत्या. भंडीशेगावचा शेवटचा मुक्काम करुन वाखरीला वारकरी पोहोचले की वारी पूर्ण झाल्याची अनुभूती वारकऱ्यांना आल्याचे पाहायला मिळाले असते.
ऐतहासिक बाजीराव विहीर..
पंढरपूरपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर पंढरपूर-पुणे मार्गावर बाजीराव विहीर आहे. पहिले बाजीराव पेशवे यांच्या स्मरणार्थ अहिल्यादेवी होळकर यांनी ही विहीर बांधल्याचे सांगितले जाते. पालखी सोहळ्यातील माऊली आणि तुकाराम यांच्या पालख्या या ठिकाणी रिंगण सोहळा दर वर्षे पूर्ण करतात म्हणून या वास्तूला आणखीच महत्त्व प्राप्त झाले आहे.
एरव्ही विहरीचा आकार हा गोलाकार असतो, मात्र बाजीराव विहीर ही गोलाकार नाही तर ती निमुळत्या आकाराची आहे. पहिल्या पेशवाईच्या काळामध्ये या विहिरीची निर्मिती झाली आहे. राज्यभरातील इतिहास तज्ञ आणि पर्यटक एरवी सुद्धा या विहिरीला भेट देत असतात. पंढरपूर पुणे हायवेवर अगदी रस्त्यालगत ही विहीर आहे. संपूर्ण काळ्या दगडांमध्ये बनवलेली ही विहीर वास्तूशिल्पाचा अजोड नमुना आहे. या ऐतिहासिक विहिरीला संरक्षण कडा नसल्यामुळे रिंगण सोहळा असलेल्या दिवशी या ठिकाणी वारकऱ्यांच्या संरक्षणाच्या हेतूने विहिरीचे प्रवेशद्वार बंद करण्यात आलेली असते.
प्रथेप्रमाणे वारी निघाली असती तर आज भंडीशेगावमधला शेवटचा मुक्काम आटोपून माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकरी हे बाजीराव विहिरीजवळ पोहोचले असते. पालखी पोहोचल्यानंतर पहिल्यांदा उभे रिंगण करण्याचे परंपरा आहे. खरंतर वारकरी या ठिकाणी पोहोचेपर्यंत सोपान काका तुकाराम महाराज आणि माऊली महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी हे आता एकत्रितपणे पंढरपूरमध्ये पोहोचत असतात. त्यामुळे या ठिकाणी एकदा पालख्या पोहोचल्या की कोणते वारकरी कोणत्या पालखी सोहळ्यातील आहेत हे ओळखणं सुद्धा कठीण झालं असतं.
पालखी सोहळा बाजीराव विहिरीजवळ पोहोचला की की मानाचा अश्व पालखी सोहळ्यातील पहिल्या वीस पालख्यापर्यंत एक दौड करत असे. गोल रिंगण पार पडले की लगेच माऊलींची पालखी ही खांद्यावरती घेऊन बाजूच्याच शेतामध्ये रिंगण स्थळी नेले जायचे आणि लागलीच याच ठिकाणी गोल रिंगणाला सुरुवात व्हायची. खरंतर आता दहा किलोमीटरवर पंढरपूर आले असल्याने मानाच्या दिंडीतील वारकरी तर सोडले इतर वारकरी मात्र पंढरपूरमध्ये पोहोचायला सुरुवात झालेली असते.
दुपारच्यावेळी माऊलींचा रिंगण सोहळा पार पडला की त्याच ठिकाणी पुन्हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे रिंगण पार पडत असे. तिकडे माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांचे गोल रिंगण पार पडले असते. तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बाजीराव विहिरीजवळ येऊन थांबायचा आणि मग सुरु व्हायचे उभे रिंगण.
प्रथेप्रमाणे वारी निघाली असती तर माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्याचे रिंगण होण्यापूर्वीच याच ठिकाणी संत सोपानकाकाच्या पालखी सोहळ्यातील उभे रिंगण पार पडले असते. इथून पालखी सोहळ्यातील आजचा शेवटचा मुक्काम वारकऱ्यांचा हा वाखरीमध्ये ठरलेला असतो. खरंतर पंढरपूरच्या वेशीवर येऊन वारकरी विसावले असते. संत सोपान काका, जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि माऊली महाराजांच्या पालखी सोहळे एकत्रितपणे वाखरीमध्ये पोहोचत असत.
क्रमशः
यापूर्वीच्या प्रवासाचे टप्पे
- आठवणीतील वारी.. वारीच्या आठवणी.. आज टप्प्यावर माऊली आणि सोपान काकांची बंधुभेट झाली असती...
- आठवणीतील वारी..वारीच्या आठवणी...| आज तुकोबांच्या पालखीचे इंदापुरात गोल रिंगण पार पडले असते!
- आठवणीतील वारी...वारीच्या आठवणी...| आज तुकोबांच्या पालखीचे पाहिले गोल रिंगण बेलवाडीमध्ये पार पडले असते!
- आठवणीतील वारी...वारीच्या आठवणी... | आज माऊलींच्या पालखीचे पाहिले उभे रिंगण पार पडले असते!
- आठवणीतील वारी...वारीच्या आठवणी...|आज तुकोबांची पालखी बारामतीमध्ये विसावली असती..
- आठवणीतील वारी...वारीच्या आठवणी...| आज वाल्मिकी ऋषींच्या वाल्ह्यात घरावर गुढ्या उभा राहिल्या असत्या!
- आठवणीतील वारी...वारीच्या आठवणी.. | आज जेजुरीत यळकोट यळकोट जय मल्हारचा जयघोष झाला असता!
- आठवणीतील वारी...वारीच्या आठवणी...| आज कऱ्हा काठ वारकऱ्यांनी फुलून गेला असता!
- आठवणीतील वारी...वारीच्या आठवणी...| आज तुकोबांच्या पालखीने रोटी घाट पार केला असता!