Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Vikroli Vidhansabha Election : विक्रोळीचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुनील राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी महायुतीच्या सुवर्णा करंजे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली होती.
मुंबई : विक्रोळी विधानसभेतील महायुतीच्या उमेदवार सुवर्णा करंजे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊत यांना महागात पडण्याची शक्यता आहे. सुनील राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील राऊत हे खासदार संजय राऊत यांचे भाऊ आहेत.
विक्रोळी पोलीस ठाण्यात या बाबत कलम 79, 351(2), 356(2) बीएनएस अंतर्गत रात्री उशिरा सुवर्णा करंजे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 27 ऑक्टोंबर रोजी सुनील राऊत यांनी टागोरनगर मध्ये आयोजित एका कार्यक्रमात महायुतीच्या उमेदवार करंजे यांच्या बद्दल आक्षेपार्ह्य वक्तव्य केले होते.
कार्यकर्त्यांना हिंदीमध्ये संबोधित करताना सुनील राऊत म्हणाले होते की, 'जब बकरा बनाना ही था, तो बकरी को मेरे गले मे डाल दी, अभी 20 तारीख को काटेंगे बकरी को'. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर या विक्रोळी पोलिसांनी करंजे यांच्या तक्रारीवरून रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास विक्रोळी पोलीस करीत आहेत.
विक्रोळी मतदारसंघातून सुनील राऊत हे दोनदा आमदार झाले असून तिसऱ्यांदा ते निवडणुकीसाठी उभे आहेत.
2019 च्या निवडणुकीत काय झालं?
2019 विधानसभा निवडणुकीत विक्रोळी मतदारसंघातून सुनील राऊत यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला. 2019 मधील विधानसभा निवडणुकीत सुनील राऊत यांनी राष्ट्रवादीचे धनंजय पिसाळ यांचा पराभव केला. राऊत यांना 62,794 मते मिळाली. तर, पिसाळ यांना 34,953 मते मिळाली. मनसेचे विनोद शिंदे यांना 16,042 मते मिळाली.
सुनील राऊत यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. सुनील राऊत यांनी मनसेचे आमदार मंगेश सांगळे यांचा पराभव करत शिवसेनेकडे ही जागा खेचून आणली. 2014 च्या निवडणुकीत सुनील राऊत यांना 58,556 मते मिळाली. तर, मंगेश सांगळे यांना 24,963 मते मिळाली. राष्ट्रवादीचे संजय दीना पाटील यांना 20,233 मते मिळाली. तर काँग्रेसच्या संदेश म्हात्रे यांना 18,046 मते मिळाली होती.