Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
Nilanga Vidhansabha Election : निलंगा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार अशोक पाटील निलंगेकर यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला आहे.
लातूर : काका-पुतण्याच्या लढतीमुळे कायम चर्चेत असणाऱ्या निलंगा विधानसभा मतदारसंघात यावेळेस काका पुतण्याची लढत दिसणार नाही. अशोक पाटील निलंगेकर यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंडखोरी केली होती. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेत निवडणूक रिंगणातून त्यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि काँग्रेसचे उमेदवार अभय साळुंखे यांच्यामध्ये लढत होणार आहे.
भाजपा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे काका आणि राजकीय प्रतिस्पर्धी अशोक पाटील निलंगेकर यांना काँग्रेसने यावेळेस उमेदवारी नाकारली होती. अभय साळुंखे यांना काँग्रेसने इथून उमेदवारी जाहीर केली होती. अशोक पाटील निलंगेकर यांनी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र शेवटच्या दिवशी उमेदवारी मागे घेत निवडणूक रिंगणातून ते बाहेर पडले आहेत.
अशोक पाटील निलंगेकर काँग्रेसशी एकनिष्ठ राहतील का की काही वेगळी भूमिका घेतील याबाबत उत्सुकता मात्र शिगेला पोहोचली आहे.
निलंगा विधानसभा मतदारसंघात भाजपाचे विद्यमान आमदार आणि उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर यांची थेट लढत आता काँग्रेसचे उमेदवार अभय साळुंखे यांच्याशी होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या स्पष्ट भूमिकेनंतर मतदार कोणाच्या बाजूने कल देतात यावरच निलंग्याचे भवितव्य अवलंबून आहे.
गेल्या वेळच्या निवडणुकीत निलंगा विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने जिंकला होता. या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे संभाजी दिलीपराव पाटील निलंगेकर हे विजयी झाले होते. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा 32131 मतांनी पराभव केला होता.
ही बातमी वाचा: