(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पंकजा मुंडे आज पुणे दौऱ्यावर होत्या, त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना पंकजा मुंडेंनी पुण्यात महायुतीला मोठा विजय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुकांचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. यंदा प्रथमच महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना होत आहे. त्यामुळे, दोन्ही आघाडी व युतींमधील तिन्ही पक्षांची मोठी डोकेदुखी वाढली होती. कारण, जागावाटप आणि त्यानंतर इच्छुक उमेदवारांचे बंड, यामुळे नेतेमंडळींना बंडखोरांचे समाधान करताना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. अखेर, आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्यादिवशी राज्यातील 288 मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात अर्ज माघारी घेण्यात आले आहेत. त्यामध्ये, पुणे जिल्ह्यातील काही मतदारसंघातही बंडखोरी रोखण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले आहे. त्यात, मावळ आणि पिंपरी चिंचवड मतदारसंघातील उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, पुणे (Pune) जिल्ह्यात 21 मतदारसंघ असून या 21 जागांवर महायुतीला विजय मिळेल, असा विश्वास भाजप नेत्या आणि आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी व्यक्त केला आहे.
पंकजा मुंडे आज पुणे दौऱ्यावर होत्या, त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना पंकजा मुंडेंनी पुण्यात महायुतीला मोठा विजय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. आम्ही सर्वजण विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसून कामाला लागलो आहोत. सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यातील 21 मतादारसंघांपैकी 18 जागा महायुतीकडे आहेत. मात्र, यावेळी 21 पैकी 21 जागा महायुतीकडे ठेवायच्या आहेत, लोकसभा निवडणुकीत आम्हाला थोडंसं यश कमी मिळालं आहे. मात्र, विधानसभेला 21 जागांवर यश मिळेल, असा विश्वास पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवला. हरियाणाच्या निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं आहे, आता महाराष्ट्रातही भाजप महायुतीला मोठं यश मिळेल. त्यानुसार, पुण्यातील 8 च्या 8 जागा आम्ही जिंकणार असेही पंकजा यांनी म्हटले. एखादा निर्णय होत नाही, तोपर्यंत मागणी करू शकतात, तो भाजप कार्यकर्त्यांचा डीएन आहे. मात्र, निर्णय झाल्यावर ते पक्षासोबत असतात, असे म्हणत महायुती म्हणून सर्वच उमेदवारांना निवडून आणण्यासाठी भाजप कार्यकर्ते काम करणार असल्याचंही पंकजा यांनी सूचवलं आहे.
पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघात एकूण 304 उमेदवार
482 उमेदवारांनी आत्तापर्यंत पुणे जिल्ह्यात उमेदवारी अर्ज भरला होता, त्यापैकी 178 उमेदवारांनी आज दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील 21 मतदारसंघात एकूण 304 उमेदवार रिंगणात आहेत.
पुणे शहर आणि जिल्हानिहाय उमेदवार
जुन्नर: ११ उमेदवार
आंबेगाव: १० उमेदवार
खेड: १३ उमेदवार
शिरूर: ११ उमेदवार
दौंड: १४ उमेदवार
इंदापूर: २४ उमेदवार
बारामती: २३ उमेदवार
पुरंदर: १६ उमेदवार
भोर: ६ उमेदवार
मावळ: ६ उमेदवार
चिंचवड: २१ उमेदवार
पिंपरी: १५ उमेदवार
भोसरी: ११ उमेदवार
वडगाव शेरी: १६ उमेदवार
शिवाजीनगर: १३ उमेदवार
कोथरूड: १२ उमेदवार
खडकवासला: १४ उमेदवार
पर्वती: १५ उमेदवार
हडपसर: १९ उमेदवार
कॅन्टोन्मेंट: २० उमेदवार
कसबा: १२ उमेदवार
पुणे जिल्ह्यातील एकूण मतदार
पुरुष: ४५ लाख ७९ हजार २१६
महिला: ४२ लाख ७९ हजार ५७०
तृतीयपंथी: ८०५
एकूण मतदार: ८८ लाख ५९ हजार ५९१
सर्वाधिक मतदार चिंचवड विधानसभा मतदारसंघात: ६ लाख ६३ हजार
पुणे जिल्ह्यात आत्तापर्यंत ९ कोटी १ लाख रुपये रोकड जप्त केली आहे
पुणे जिल्ह्यात ४ लाख ६५ हजार लिटर दारू जप्त ज्याची किंमत ३ कोटी ५ लाख रुपये
कसबा विधानसभेतील अपक्षा उमेदवाराला ट्रंपेट चिन्ह
कसबा विधानसभा मतदारसंघातील एका अपक्ष उमेदवाराला आता "ट्रंपेट" चिन्ह मिळाले आहे. अरविंद वलेकर असं या उमेदवाराचं नाव असून त्यांना "ट्रंपेट" चिन्ह देण्यात आलं आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी ज्या उमेदवारांनी अर्ज कायम ठेवला, त्यांना आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून चिन्हांचंही वाटप करण्यात आलंय. अरविंद वलेकर यांनी कसबा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता, आज दुपारी ३ वाजता त्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून हे चिन्ह देण्यात आले
हेही वाचा
धक्कादायक! उमेदवाराकडूनच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची गाडी पेटविण्याचा प्रयत्न; समोर आलं कारण