Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sada Sarvankar Vs Amit Thackeray : माहीममधून माघार घ्यावी यासाठी महायुतीतल्या ज्येष्ठ नेत्यांनी सदा सरवणकरांची अनेकदा मनधरणी केली. पण त्यांना यश आलं नाही.
मुंबई : माहीम विधानसभा मतदारसंघात राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंची वाट बिकट झालीय का? हा प्रश्न निर्माण होण्यामागचं कारण म्हणजे सदा सरवणकरांचा माहीममधून माघार न घेण्याचा निर्णय. सदा सरवणकरांच्या उमेदवारीमुळं आता माहीम मतदारसंघात जबरदस्त ट्विस्ट निर्माण झालाय. अमित ठाकरे, सदा सरवणकर आणि महेश सावंत यांच्यातल्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता ताणली गेलीय.
माहीममध्ये तिरंगी लढत
माहीम विधानसभेत आता तिरंगी लढत निश्चित झालीय. मनसेचे अमित ठाकरे, शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत हे एकमेकांना भिडणार आहेत. माहीममधून माघार घ्यावी यासाठी महायुतीतल्या ज्येष्ठ नेत्यांनी सदा सरवणकरांची अनेकदा मनधरणी केली. भाजपनंही सदा सरवणकर यांच्याऐवजी मनसेच्या अमित ठाकरेंची जाहीर पाठराखण केली. पण सदा सरवणकर लढण्यावर ठाम होते.
राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर शिंदेंचा सूर बदलला
सदा सरवणकरांची मनधरणी चालू असतानाच राज ठाकरेंनी एबीपी माझाच्या माझा व्हिजन कार्यक्रमात एक मोठं वक्तव्य केलं. ज्यामुळं शिंदेंची शिवसेना आणि मनसेमधलं अंतर वाढल्याचा राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. निवडणुकीनंतर भाजपचा मुख्यमंत्री होईल आणि मनसे भाजपसोबत जाईल असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंच्या त्या वक्तव्यानंतर दुसऱ्याच दिवशीपासून एकनाथ शिंदेंनीही सदा सरवणकरांची जाहीर पाठराखण करायला सुरुवात केली.
राज ठाकरेंनी सरवणकरांना भेट नाकारली
शिवसेनेतल्या बंडावेळी सरवणकरांनी शिंदेंना साथ दिली. त्यामुळं सरवणकरांना दुखावणं शिंदेंसाठी अवघड होतं. अखेर आज सरवणकरच राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले. पण राज ठाकरेंनी आपल्याला भेट नाकारली असा दावा सरवणकरांनी केला.
भाजपची साथ कुणाला?
भाजपच्या आशिष शेलारांनी आपण अमित ठाकरेंना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करु असं म्हटलंय. तर नारायण राणेंनी महायुतीच्या उमेदवारालाच निवडून आणू असं सांगितलंय. त्यामुळं माहीममध्ये काय होणार? भाजप अधिकृतरित्या कोणाला पाठिंबा देणार? भाजपचे नेते नेमकं कोणाच्या प्रचारसभेत दिसणार? हेच पाहावं लागणार आहे.
ही बातमी वाचा: