राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण ही ना त्या एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी आहे, ना त्या उद्धव ठाकरेंची, ती बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी आहे
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारतोफा धडाडायला आता सुरुवात झाली आहे. दिवाळीचे फटाके फुटल्यानंतर आजपासून बड्या नेत्यांनी प्रचारसभांसाठी मैदान गाजवायचं काम सुरू केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) आमदार राजू पाटील यांच्या मतदारसंघातून पहिली सभा घेत विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुकंलं. यावेळी, राज्यातील गत 5 वर्षात झालेल्या राजकारणावरुन त्यांनी सर्वच पक्षातील नेत्यांना टोला लगावला. तसेच, पक्ष फोडाफोडीच्या राजकारणावर भाष्य करताना पक्ष आणि चिन्ह पळवल्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवारांवर (Ajit pawar) जोरदार हल्लाबोल केला. तसेच, माझ्या पक्षाचा एकच आमदार आहेत, तोही निघून गेला असता माझा पक्ष घेऊन. पण, आमच्या विचारातही तसला प्रकार येत नाही, असे राज यांनी म्हटलं. तर, शिवसेना ही बाळासाहेबांची व राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच आहे, असेही ठामपणे सांगितलं.
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण ही ना त्या एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी आहे, ना त्या उद्धव ठाकरेंची, ती बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी आहे, असे म्हणत राज ठाकरेंनी शिवसेना पक्ष आणि चिन्ह पळवण्यावरुन दोन्ही पक्षाच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. तुम्हाला आमदार फोडाफोडीचं राजकारण करायचंय करा, शरद पवारांसोबत माझे कितीही मतभेद असतील पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे शरद पवारांचं अपत्य आहे, ते अजित पवाराचं अपत्य नाही, असे म्हणत राज ठाकरेंनी पक्ष फोडाफोडीच्या आणि चिन्ह पळवापळवीच्या राजकारणावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोला लगावला.
बाळासाहेबांच्या नावाअगोदरचं हिंदूह्रदयसम्राट गायब झालं
उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीसोबत गेल्यानंतर, काँग्रेससोबत आघाडी केल्यानंतर शिवसेनेच्या होर्डिंगवरती बाळासाहेबांचा फोटो असायचा पण हिंदूह्रदयसम्राट हे नाव नसायचं. मी काहीतरी उर्दू होर्डिंग्जही बघितले, ज्यावर उर्दू भाषेत बाळासाहेब ठाकरेंच्या नावाच्या अगोदर जनाब लिहिलेलं असायचं, असे म्हणत राज ठाकरेंनी बाळासाहेबांची हिंदुत्त्वाची ओळख पुसण्यात येत असल्याचं सूचवलं.
मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर बाई नाचते ही संस्कृती कुठली
पक्ष पळवत आहेत, निशाण्या पळवत आहेत, माणसं पळवली जात आहेत. महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश आणि बिहार करायचाय का तुम्हाला. आत्ताच मी एक व्हिडिओ क्लीप पाहिली मोबाईलवर, मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या व्यासपीठावर भोजपुरी गाण्यावर एक बाई नाचतेय. लोकांचं मनोरंजन करण्यासाठी एक बाई नाचते, ज्या व्यासपीठावर एकनाथ शिंदेंचा फोटो आहे, उमेदवारांचं नाव आहे, हीच का तुमची लाडकी बहीण योजना असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला. तसेच, हे सगळं युपी बिहारमध्ये चालायचं ते आता आपल्याकडे सुरू झालं का, असा सवालही राज ठाकरेंनी विचारला.