(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गुदमरलेल्या कोल्हापूरसाठी थेट बिंदू चौकात का एकत्र येत नाही? शहराचा कोंडलेला श्वास बंटी अन् मुन्ना ईर्ष्येने नक्की दूर करु शकतात!
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात सतेज पाटील आणि महाडिक गट निर्विवाद वर्चस्व राखून आहेत. अगदी कोल्हापूर शहरापासून ते सर्व तालुक्यापर्यंत ते गावागावात दोन्ही गटाचे निष्ठावंत समर्थकांची फळी आहे.
Kolhapur News : कोल्हापूरच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारा अन् राज्यासह देशपातळीवरील नेत्यांच्या पदस्पर्शाने आणि त्यांच्या धडाकेबाज भाषणांनी गाजलेला ऐतिहासिक बिंदू चौक महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनीच चर्चेत आला. अर्थातच, चर्चेला येण्यासाठी कोल्हापुरातील जिल्ह्यातील दोन मातब्बर राजकीय गटामधील नुरा कुस्तीचा संदर्भ होता. या नुरा कुस्तीला राजाराम साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा संदर्भ आहे. मात्र, कारखान्यातील नुरा कुस्ती थेट बिंदू चौकात येऊन धडकेल आणि काळजाचा ठोका चुकेल याची स्वप्नवत सुद्धा कोणी कल्पना केली नव्हती. एका कारखान्याच्या निवडणुकीसाठी लागलेली राजकीय ईर्ष्या आणि डाव प्रतिडाव पाहता ही कटूता आणखी कोणत्या वळणावर घेऊन जाणार आहे याचा मात्र अंदाज न केलेला बरा.
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात सतेज आणि महाडिक गट निर्विवाद वर्चस्व राखून आहेत. अगदी कोल्हापूर शहरापासून ते सर्व तालुक्यापर्यंत ते गावागावात दोन्ही गटाचे निष्ठावंत समर्थकांची फळी आहे. कधीकाळी हे दोन्ही गट कोल्हापूरच्या राजकारणात एकत्र होते. मात्र, आज ती जागा द्वेषाने आणि सुडाने घेतली आहे का? अशी शंका यावी इथंवर हा प्रवास झाला आहे. सतेज पाटील 2014 मध्ये कोल्हापूर दक्षिणमधून पराभूत झाल्यानंतर या संघर्षाला अधिक धार आली आहे. ती आजतागायत थांबलेली नाही. कारखाना हे आज निमित्त असलं तरी जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विधानसभा आणि लोकसभेची सुद्धा त्याला किनार आहे. या सर्व निवडणुकीमध्ये दोन्ही गट प्रबळ आणि निर्णायक राहणार आहेत यात शंका नाही.
कारखान्याची निवडणूक होईल, पण कोल्हापूरच्या ज्वलंत मुद्यांचे काय?
कारखान्याच्या निवडणुकीवरून दोन्ही गट उभे ठाकले असले, तरी सभासद जो काही कौल द्यायचा तो मायबाप सभासद 23 एप्रिल रोजी देतील. मात्र, ज्या पद्धतीने बिंदू चौकाचा मुद्दा उपस्थित झाला आणि अत्यंत तातडीने दोन्ही गट आमनेसामने आले ते पाहून गुदमरलेल्या कोल्हापूरसाठी दोन्ही गट ताकद लावतील का? असा भोळाभाबडा प्रश्न सर्वसामान्य कोल्हापुरकरांना पडला आहे.
कोल्हापूरची हद्दवाढ, खंडपीठ, गटारगंगा झालेली पंचगंगा, कोल्हापूर विमानतळाला वाढत चाललेली मुदत, अंबाबाई विकास आराखडा, शिवाजी विद्यापीठाचा विस्तार, शहरातील रस्त्यांची लागलेली वाट, समस्यांच्या गर्तेतील उपनगरे, मोडकळीस आलेली केएमटी, कोल्हापूर शहरात येण्यास होत असलेल्या गावांचा विरोध असे एक नव्हे, तर अनेक मुद्यावरून कोल्हापूरची कोंडी झाली आहे. त्यामुळे दोन्ही गटाचे प्राबल्य पाहिल्यास हे सगळेच प्रश्न तातडीने सुटतील असे नसले, तरी दिशा मात्र निश्चित दाखवू शकतात. दोन्ही नेत्यांचा धडाका आणि क्षमतेची कोल्हापूर जिल्ह्याला नक्की जाणीव आहे. त्यामुळे याच प्रश्नांवरून एबीपी माझाने कोल्हापूर लोकमतचे संपादक वसंत भोसले तसेच कारखान्याची निवडणूक कोणत्या मुद्यांवरून असावी? यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचे मत जाणून घेतले.
कोल्हापूर लोकमतचे संपादक वसंत भोसले म्हणतात...
कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय स्थितीवर एबीपी माझाने कोल्हापूर लोकमतचे संपादक वसंत भोसले यांचे मत जाणून घेतले. वसंत भोसले म्हणतात, कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण राज्यातील कोणत्याही जिल्ह्यापेक्षा सर्वाधिक ईर्ष्येवर चालते. याला कारण म्हणजे ईर्ष्येने खेळला जाणारा कुस्ती खेळ असेल. फुटबाॅल असेल, बैलगाडी शर्यत असेल, साठमारी असेल, शिकारीचा नाद असेल. याचे प्रतिबिंब राजकारणातही उमटले आहे. मात्र, हे करत असताना राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न दिसत आहे.
स्पर्धा लोकांच्या प्रश्नांसाठी होत नाही हे दुर्दैव
भोसले पुढे म्हणाले की, राजकीय स्पर्धा होत असली, तरी लोकांच्या प्रश्नांसाठी होत नाही हे दुर्दैव आहे. लोकांच्या प्रश्नांसाठी राज्य शासन तसेच केंद्र शासनाशी भांडावं लागतं. ती हिंमत कोणी दाखवत नाही हे अपयश आहे. अंतर्गत कुरघोड्या यांच्या चालत असतात. यामधून हौस, ईर्ष्या होऊन जाते पण लोकांचे प्रश्न सुटत नाहीत. परिणामत: पंचगंगा प्रदुषण, शाहू महाराज स्मारक, शिवाजी विद्यापीठ विस्तार, आरोग्य आणि शिक्षणासंदर्भात सुविधा निर्माण करणे असेल असे विषय हाताळले जात नाहीत. त्याच्यावर ईर्ष्या केली जात नाही. ईर्ष्या हौसेसाठी केली जाणारी गोष्ट आहे. प्रश्न सोडवण्यासाठी हौस करून चालत नाहीत, त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात आणि ते कष्ट घेण्याची कोणाची तयारी नाही.
लोकांची मानसिकता सुद्धा ईर्ष्येची
त्यांनी पुढे सांगतिले की, येथील जनभावना आणि मानसिकता सुद्धा ईर्ष्येची आहे. त्यामुळे फुटबाॅल सामने चालतात. कुस्ती परपंरा आहे हे वाईट नाही, पण राजकारण ईर्ष्येचे नाही ते कधीच होऊ शकत नाही. त्याचे ठोकताळे असतात. ते जनतेच्या प्रश्नांसाठी करायचे असतात, पण आपले नेते तेच विसरले आहेत आणि लोकही विसरले आहेत. लोक अपेक्षाही करत नाहीत. त्यामुळे नेत्यांनी तोच मार्ग पत्करल्याने त्याचाच हा परिपाक दिसून येत आहे.
एकही केंद्रीय मंत्री या जिल्ह्याने पाहिलेला नाही
हद्दवाढ होत नाही, खंडपीठ होत नाही कारण हा हौसेचा भाग नाही अशी स्थिती आहे. यांना ईर्ष्या करायची आहे. त्यामुळे त्याच पद्धतीने भाषा होत आहे. त्यांना राज्याचे नेतृत्व करायचे आहे, देशाचे नेतृत्व करायचे आहे असं स्वप्न त्यांना कधीच पडत नाही. त्यामुळे आजपर्यंत एकही केंद्रीय मंत्री या जिल्ह्याने पाहिलेला नाही. मुख्यमंत्री पाहिलेला नाही. या जिल्ह्याने विरोधी पक्षनेता पाहिलेला नाही, त्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. राजकारणातील प्रश्न न सोडवता हौस म्हणून चाललं आहे.
लढाऊ बाणा संपत चालला आहे
वसंत भोसले सामाजिक आंदोलनांबाबत आठवणी सांगताना म्हणाले की, मध्यंतरीच्या काळात धरणांसाठी आंदोलने झाली. त्यावेळी शेतकरी कामगार पक्षासारखा विरोधी पक्ष होता. शेतकरी, ऊसासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लढाऊ बाणा दाखवला. तो लढाऊ बाणा होता, पण आता तो लुप्त पावला आहे. थोड्या फरकाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रुपाने शिल्लक आहे. लढण्याची हिंमत शेतकरी कामगार पक्षांनी दाखवली, पण ती सुद्धा आता संपली आहे. त्यामध्ये राजकारण राहिलेलं नाही. पैसा आणि सत्तेचं राजकारण सुरु आहे.
साखर कारखान्यांची निवडणूक कोणत्या मुद्यावर व्हावी? राजू शेट्टी म्हणतात..
साखर कारखान्याची निवडणूक असेल, तर ती नेमक्या कोणत्या मुद्यावर असावी? याबाबत एबीपी माझाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्याशी एबीपी माझाने चर्चा केली. ते म्हणाले की, तो खासगी कारखाना सहकारी कारखाना केला आहे. सध्याच्या काळात त्याचे महत्व आहे. हा शेवटचा कारखाना आहे जो खासगी असून सहकारी झाला. तो एकमेव कारखाना आहे जो खासगीकरणातून सहकारात आला आहे. कारखान्याच्या निवडणूका या कारखाना कसा चालवावा? सभासदांना न्याय कसा मिळेल? ऊसाला अधिकाधिक दर कसा देता येईल? कारखान्याची कार्यक्षमता कशी वाढवता येईल? याच अनुषंगाने कोणत्याही कारखान्याची निवडणूक व्हायला हवी. ते पुढे म्हणाले की, बिंदू चौकात सभा झाल्या आहेत. एकाने सभा घ्यायची, मग दुसऱ्याने घ्यायची. मात्र, एकाचवेळी दोघांनी सभा घ्यायची असा कधी प्रसंग झालेला नाही. माझ्या कधी ऐकिवात नाही.
जिल्ह्यात काहीतरी आणा
दोन्ही गटांमध्ये झालेली नुराकुस्ती पाहून सोशल मीडियात उपहासात्मक पोस्टही व्हायरल होऊ लागल्या आहेत. कोल्हापूरच्या दोन नेत्यांनी 'चौकात या'चे गावठी प्रयोग थांबवून 'जिल्ह्यात काहीतरी आणा' असा कामाचा विषय घ्यावा, अशाही पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यामुळे दोन्ही गटाकडून एका कारखान्यावरून चाललेली हूल सर्वसामान्यांना सुद्धा रुचलेली नाही हे दिसून येत आहे.