India Weather Update: उत्तराखंडसह दिल्ली, जम्मू काश्मीर आणि हिमाचलमध्ये पावसाचा अंदाज, तर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता
उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. तर महारष्ट्रातही 7 ते 10 मार्चदरम्यान गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
India Weather Update : उत्तर भारतात पुन्हा एकदा हवामानात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तराखंड, दिल्ली, जम्मू काश्मीरसह हिमाचल प्रदेशमध्ये पाऊस पडण्याच अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात सध्या उन्हाचा चटका जावत आहे. काही जिल्ह्यात तापमानाचा परा 35 अंशाच्या पुढे गेला आहे. मात्र, 7 ते 10 मार्चदरम्यान, राज्यात काही ठिकाणी गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 8 आणि 9 मार्चला पावसाचा प्रभाव जास्त असण्याची
शक्यता आहे. तर कोकणात ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे.
दिल्ली
दिल्लीच्या हवामानात सातत्याने बदल होत आहेत. मध्यम गतीने वारे वाहत असल्याने सकाळ व संध्याकाळच्या वेळी थंडीचा कडाका जाणवत आहे. भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, आज दिल्लीत आकाश ढगाळ राहू शकते आणि रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यामुळे 9 मार्च रोजीही हलका पाऊस पडू शकतो. दुसरीकडे, आजच्या तापमानाबद्दल बोलायचे झाल्यास, कमाल तापमान 29 अंश, तर किमान तापमान 16 अंश राहण्याची शक्यता आहे.
राजस्थान
आजपासून राजस्थानच्या हवामानात मोठा बदल होणार आहे. भारतीय हवामान खात्यानुसार, 7 ते 9 मार्चपर्यंत आकाश ढगाळ राहील आणि मधूनमधून पाऊस पडण्याची शक्यता आहे. सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात हा बदल होत आहे. दुसरीकडे, राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 18 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते.
पंजाब
पुढील काही दिवस पंजाबमध्ये पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज ढगाळ वातावरण राहील. आज आणि उद्या हलक्या पावसाची शक्यता आहे. यानंतर 9, 10 आणि 11 मार्च रोजीही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, वारे मध्यम गतीने वाहत असून, त्यामुळे सकाळ-संध्याकाळ थंडीचा कडाका जाणवत आहे. दरम्यान, आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस राहील तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस राहील.
जम्मू आणि काश्मीर
जम्मू-काश्मीरमध्ये आज पावसाचा पूर्ण अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडेल. आज श्रीनगर, काश्मीरमध्ये कमाल तापमान 3 आणि किमान तापमान -4 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आज जम्मूमध्ये कमाल तापमान 21 आणि किमान तापमान 12 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
उत्तराखंड
आज उत्तराखंडच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. आजच्या दिवशी सूर्याचे दर्शन होणार नाही. राज्यातील बहुतांश भागात आज किमान तापमान 6 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 16 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
हिमाचल प्रदेश
हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी आणि पावसामुळे किमान तापमानात घट झाली आहे. आजही तिथे ढगाळ वातावरण राहील. राज्यातील जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 14 अंश, तर किमान तापमान 3 अंश राहणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: