बीडच्या तहसीलदारांना धमकी, व्हायरल ऑडिओ क्लिवर आमदार संदीप क्षीरसागरांची पहिली प्रतिक्रिया
कार्यकर्त्यांवर अन्याय होतं असेल, पण आमदार म्हणून अनेक तक्रारी करुन देखील दखल घेतली जात नसेल तर आक्रमक पवित्रा घ्यावाच लागेल.

बीड : सध्या बीड जिल्ह्यातील नेतेमंडळींचे एकामागोमाग एक कारनामे समोर येत असून काही नेत्यांच्या तर काही कार्यकर्त्यांच्या ऑडिओ, व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेल्या धनंजय मुंडेंना अखेर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. वाल्मिक कराडशी असलेली जवळीक धनजंय मुंडेंना भोवली असून संतोष देशमुख हत्याप्रकरणात त्यांना सहआरोपी करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. दुसरीकडे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेला खोक्या सध्या चर्चेत आहे. त्यातच, आमदार संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल (Viral) झाली असून नायब तहसीलदारांना ते फोनवरुन धमकी देत असल्याचं ऐकायला मिळत आहे. आता, आमदार क्षीरसागर यांनी या व्हायरल क्लिपवर आपली प्रतिक्रिया दिली असून ही क्लिप दीड वर्षांपूर्वीची आहे. ही क्लिप आत्ताच समोर का आली? असा सवाल देखील क्षीरसागर यांनी उपस्थित केला आहे.
कार्यकर्त्यांवर अन्याय होतं असेल, पण आमदार म्हणून अनेक तक्रारी करुन देखील दखल घेतली जात नसेल तर आक्रमक पवित्रा घ्यावाच लागेल. ही ऑडिओ क्लिप आजची नाही, दीड वर्षापूर्वीच आहे ती आजचं का समोर आली? तर दुसरया प्रकरणावरून फोकस हटवण्यासाठी असे विषय हाती घेतले जात आहेत, अशी प्रतिक्रिया आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिली आहे. आमदार क्षीरसागर यांनी व्हायरल ऑडिओ क्लिपवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी हत्येवेळी हसत आहेत, कारण त्यांना माहिती होतं, काही होणार नाही. हे असे भ्रष्ट अधिकारीच त्यांना आतापर्यंत पाठिशी घालत होते. बीडची परिस्थिती इतकीही बेकार नाही. नवीन एसपी आल्यामुळे 2 नंबरचे धंदे बंद झाले आहेत. खोक्याबद्ल सांगायचं झालं तर धसं यांनी यापूर्वीच चुकीचं असेल त्यावर कारवाई करा, असे माध्यमांना सांगितलं आहे. चुकीचं असेल तर त्यावर पोलिसांनी कारवाई करावी, अशी आपली भूमिका असल्याचे संदीप क्षीरसागर यांनी म्हटले.
व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये काय?
दरम्यान, व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये बीडचे नायब तहसीलदार सुरेंद्र डोके यांना ग्रामरोजगार सेवकाबद्दल तक्रार करू नको.. म्हणून आमदार संदीप क्षीरसागर बोलत आहेत. 2023 च्या जुलै महिन्यात हा प्रकार घडल्याची माहिती असून ही ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. तहसीलदार महोदयांना आमदार संदीप क्षीरसागर यांनी फोनवरुन चांगलाच दम भरल्याचं ऐकायला मिळत आहे. क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांने केलेल्या चुकीच्या कामाबद्दल विचारणा करत क्षीरसागर यांनी थेट धमकी दिल्याचं ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे. मतदारसंघाचा चार्ज तुम्ही मला न विचारता घेतला, माझ्या मतदारसंघात तमाशा करू नका, तुम्हाला सांगतोय, अशी धमकी क्षीरसागर यांनी दिल्याचे ऐकायला मिळते.
हेही वाचा
मटणासाठी मल्हार सर्टिफिकेट;नितेश राणेंच्या निर्धावर आव्हाड संतापले, म्हणाले, मग मच्छी कशी कापणार?























