हद्दच झाली राव! पोलीस कर्मचाऱ्याने जेवणासाठी चक्क 'फोन पे'वरून घेतली पंधराशे रुपयांची लाच
ACB News: मध्यस्थी करणाऱ्या पोलीस पाटील विरुद्ध देखील गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

Aurangabad Crime News: औरंगाबाद (Aurangabad) ग्रामीणच्या बिडकीन पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्यावर लाचलुचपत विभागाने ((Anti Corruption Bureau)) कारवाई केली आहे. तक्रारदाराविरोधात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात मदत करण्यासाठी या पोलीस कर्मचाऱ्याने लाच मागितली होती. तर लाचेच्या मागणीसोबतच जेवणासाठी दोन हजारांची लाच मागितली असता तडजोड अंती 'फोन पे'वरून (PhonePe) 1500 रुपये घेतांना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. विजय पवार (पोलीस नाईक ब.न. 450, नेमणूक बिडकीन पोलीस स्टेशन, औरंगाबाद ग्रामीण) असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर यासाठी मध्यस्थी करणारा डोंगरूनाईक तांडा गावाचा पोलीस पाटील (Police Patil) गुलाब छगन चव्हाण विरुद्ध देखील गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार यांचे विरुद्ध बिडकीन पोलीस स्टेशन येथे विनयभंगाचा (भा.द.वी. 354) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. त्यामुळे या गुन्ह्यात फिर्यादी यांना मॅनेज करणे व गुन्ह्यात मदत मिळवून देण्यासाठी पवार याने 80 हजार लाचेची मागणी केली होती. दरम्यान 50 हजार रुपये तडजोडी अंती पंच साक्षीदार समक्ष लाचेची त्याने मागणी केल्याचं स्पष्ट झाले होते. त्यानंतर जेवणासाठी देखील आणखी दोन हजार रुपये मागितले असता, फोन पे वरून तडजोडी अंती 1500 ची लाचेची मागणी पंच साक्षीदार समक्ष केली असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस पाटलावरही गुन्हा दाखल!
याप्रकरणात दाखल गुन्ह्याच्या तपासी अमलदार यांचे कडून दाखल गुन्हयात मदत मिळवून देण्यासाठी तडजोडीची लाचेची रक्कम ठरवण्यासाठी डोंगरूनाईक तांडा गावाचा पोलीस पाटील गुलाब छगन चव्हाण याने मध्यस्थी केली होती. पंच साक्षीदार समक्ष गुलाब चव्हाण याने मध्यस्थी केल्याचे निष्पन्न झाल्याने तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याला रंगेहात पकडलं!
दरम्यान दुसऱ्या एका घटनेत औरंगाबाद एसीबीच्या पथकाने महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या एका अधिकाऱ्याला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अर्जुन वसराम राठोड ( वय 57 वर्ष) असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. यातील तक्रारदार यांचे उस्मानाबाद येथे शिवछत्रपती फायर वर्क्स नावाच्या फटाक्याचा कारखाना आहे. त्यासाठी संमती पत्र देण्याकरिता राठोड याने पंच साक्षीदारा समक्ष एकुण 60 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. यावेळी एसीबीच्या पथकाने सापळा लावत लाचेची रक्कम स्वीकारताना त्याला रंगेहात पकडलं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
