Happy Birthday Bharti Singh : मेहनत आणि जिद्दीचा प्रवास.. गावातील मुलगी ते टीव्हीची ‘लाफ्टर क्वीन’ बनण्यापर्यंतचा भारतीचा संघर्षमय प्रवास!
Bharti Singh Birthday : टीव्हीची ‘लाफ्टर क्वीन’ कॉमेडियन-अभिनेत्री भारती सिंह (Bharti Singh) आज (3 जुलै) आपला वाढदिवस साजरा करत आहे.
Bharti Singh Birthday : टीव्हीची ‘लाफ्टर क्वीन’ कॉमेडियन-अभिनेत्री भारती सिंह (Bharti Singh) आज (3 जुलै) आपला वाढदिवस साजरा करत आहे. पंजाबमधील अमृतसर येथे जन्मलेल्या भारती सिंहचे यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. तिच्या आईवडिलांनी तर तिला गर्भातच मारण्याचा निर्णय घेतला होता. एवढेच नाही, तर जेव्हा भारती सिंहने कॉमेडियन बनण्याचा निर्णय घेतला, तेव्हा देखील तिच्या कुटुंबीयांनी तिच्यावर बहिष्कार टाकला होता.
भारती सिंह नेहमीच तिच्या चाहत्यांना हसवण्यात यशस्वी ठरते. ‘लाफ्टर क्वीन’ म्हणून टीव्ही विश्वावर राज्य करणाऱ्या भारती सिंहचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. खुद्द भारती सिंहने एका मुलाखतीदरम्यान याबद्दल सांगितले होते.
आपल्यासारखे बालपण कुणाला मिळू नये!
भारतीचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. भारती दोन वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. तीन भावंडांमध्ये भारती सर्वात लहान होती. मात्र, गरिबीमुळे भारतीला लहानपणापासूनच नोकरी करावी लागली. वडिलांच्या निधनानंतर भारतीच्या आईने इतरांच्या घरी जेवण बनवून, त्यातून येणाऱ्या पैशांतून मुलांना वाढवले. भारती स्वतः म्हणते की, आपल्यासारखे बालपण कुणाला मिळू नये.
भारतीची आई इतरांच्या घरी जेवण बनवायला जायची, तेव्हा कधी-कधी भारतीही तिच्या आईसोबत जात असे. भारतीची आई जेवण बनवायची आणि भारती तिथेच बसायची. त्यावेळी स्वयंपाकघर आणि त्यात ठेवलेल्या वस्तू बघून आपलं घर असं कधी असेल का, असा प्रश्न तिला पडायचा.
आईची आज्ञा पाळली!
भारतीच्या आईने तिला आणि तिच्या भावंडांना कष्ट करायला शिकवले होते. त्यामुळे आज भारती तिच्या मेहनतीने आणि समर्पणाने कुठवर पोहोचली आहे, हे आपल्या सर्वांसमोर आहे. भारतीच्या आईने तिला सांगितले की, कठोर परिश्रम कधीही सोडू नका. आणि तिने आपल्या आईची आज्ञा पाळली आणि तशीच वागली. भारतीची मेहनत फळली आणि आज ती ‘लाफ्टर क्वीन’ बनून टीव्ही विश्वावर राज्य करते आहे.
नातेवाईकांनीही बहिष्कार टाकला!
एका मुलाखतीत भारती सिंह म्हणाली की, 'माझी रिअॅलिटी शोमध्ये निवड झाली होती आणि मी मुंबईत येण्याच्या तयारीत होते. मात्र, तिथे नातेवाईकांनी आमच्यावर बहिष्कार टाकला होता. ते म्हणायचे की, यांना वडील नाहीत आणि हे असली कामं काय करतात?’ बालपणापासून भारतीला प्रचंड उपेक्षा सहन करावी लागली होती. मात्र, आपल्या मेहनत, जिद्द आणि संघर्षाच्या जोरावर तिने आज मनोरंजन विश्वात स्वतःचे हक्काचे स्थान निर्माण केले आहे.
हेही वाचा :