Ashok Hande Beaten Up Over Parking Issue: 'मराठी बाणा' फेम अशोक हांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला; पार्किंगचा वाद विकोपाला, आरोपीची ऑफिसमध्ये घुसून बॅटनं मारहाण
Ashok Hande Beaten Up Over Parking Issue: पार्किंगच्या शुल्लक वादातून एका 53 वर्षीय व्यक्तीनं हांडे यांना बॅटनं मारहाण केली. या घटनेत अशोक हांडे यांना दुखापत झाली आहे.

Ashok Hande Beaten Up Over Parking Issue: 'मराठी बाणा' (Marathi Bana) सुप्रसिद्ध कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी संस्कृती जगभरात पोहोचली. याच जगप्रसिद्ध कार्यक्रमाचे सर्वेसर्वा आणि लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक अशोक हांडे (Ashok Hande) यांच्यासोबत भीषण घटना घडल्याची माहिती मिळतेय. अशोक हांडे यांना पार्किंगच्या मुद्द्यावरून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पार्किंगच्या शुल्लक वादातून एका 53 वर्षीय व्यक्तीनं हांडे यांना बॅटनं मारहाण केली. या घटनेत अशोक हांडे यांना दुखापत झाली आहे. या प्रकरणी माहीम पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपीला अटक केली आहे.
अशोक हांडे यांच्या मारहाण प्रकरणाबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, मारहाणीची घटना 1 मार्च रोजी घडली. अशोक हांडे हे मुंबईतील माटुंगा पश्चिमेकडील मनमाला टँक रोडवरील युनायटेड हाऊसच्या तळ मजल्यावरच्या कार्यालयात बसले होते. याच परिसरात राहणारा आरोपी प्रथमेश पांडुरंग उनफोडे उर्फ बंटी हा त्यांच्या कार्यालयात बॅट घेऊन आला. सर्वात आधी त्यानं बॅटनं कार्यालयाच्या काचेवर प्रहार केला. त्यानंतर आवाज ऐकून अशोक हांडे कार्यालयाबाहेर आले.
आरोपी प्रथमेश उनफोडेनं 'मराठी बाणा'च्या गाड्यांसाठी पार्किंगचे पैसे अशोक हांडेंकडे मागायला सुरुवात केली. गाड्या ज्या ठिकाणी पार्क केल्या जातात, त्या जागेचा आणि संबंधित व्यक्तीचा कोणताही संबंध नसल्यानं अशोक हांडेंनी पैसे द्यायला नकार दिला. यावेळी मात्र आरोपीला राग अनावर झाला. आरोपीनं शिवीगाळ करत बॅटनं अशोक हांडेंवरच हल्ला केला. या हल्ल्यात अशोक हांडेंना दुखापत झाली. सगळा प्रकार पाहून अशोक हांडेंच्या कार्यालयातील कर्मचारी मधे पडले आणि आरोपीला समजावण्याचा प्रयत्न केला. पण, आरोपी अधिकच आक्रमक झाला. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना घडल्या प्रकाराची माहिती दिली.
माहीम पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आश्चर्याची बाब म्हणजे, आरोपीनं पोलिसांनाही जुमानलं नाही. त्यानं पोलिसांशीही हुज्जत घालायला सुरुवात केली. एवढ्यावरच तो थांबला नाहीतर, त्यानं पोलिसांनाही अपशब्द वापरले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी प्रथमेश उनफोडे याला ताब्यात घेऊन त्याच्यावर मारहाण, धमकी आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :





















