अभिनेता अरमान कोहलीला अवैध दारु बाळगल्याप्रकरणी अटक
नियमानुसार कोणताही व्यक्ती 12 बाटल्यांहून अधिक दारु स्वत: जवळ ठेवू शकत नाही. तर प्रवासादरम्यान दारुच्या केवळ दोन बाटल्या सोबत ठेवू शकतो.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अरमान कोहलीला अवैध दारु बाळगल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी रात्री पोलिसांनी अरमानला अटक केली. आरोप सिद्ध झाल्यास अरमानला तीन महिन्यांचा कारावासही होऊ शकतो.
उत्पादन शुल्क विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अरमानजवळ 41 पेक्षा जास्त स्कॉचच्या बाटल्या सापडल्या आहेत. त्यापैकी 35 बाटल्या खासगी पार्ट्यांमध्ये वापरल्या होत्या. बॉम्बे लिकर प्रोहिबिशन अॅक्ट 1949 च्या कलम 63 (ई) नुसार अरमान दोषी आढळल्यास त्याला तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.
नियमानुसार कोणताही व्यक्ती 12 बाटल्यांहून अधिक दारु स्वत: जवळ ठेवू शकत नाही. तर प्रवासादरम्यान दारुच्या केवळ दोन बाटल्या सोबत ठेवू शकतो.
अरमान कोहली याआधीही वादात सापडला होता. काही दिवसांपूर्वी अरमानने मारहाण केल्याचा आरोप गर्लफ्रेन्ड नीरु रंधावाने त्याच्यावर केला होता. गेल्या तीन वर्षांपासून अरमान नीरुसोबत लिव्ह इनमध्ये राहत होता. नीरुने मारहाणीनतंरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपल्यावर ओढावलेला प्रसंग सर्वांना सांगितला होता.
अरमान कोहली बिग बॉस सीझन 7 चा स्पर्धक होता. या सीझनमध्ये अरमान आणि काजोलची बहीण तनिषाच्या अफेअरची मोठी चर्चा रंगली होती. अरमानने 1992 मध्ये 'विरोधी' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर दुश्मन जमाना, अनाम, कोयल, कोहरा, औलाद के दुश्मन, जुआरी, वीर, कहर, दुश्मनी या सिनेमांमध्ये काम केलं आहे. मात्र म्हणावं तेवढं यश अरमानला मिळालं नाही.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
