हिरो बनण्यासाठी सोडलं घर, सेटवर कलाकारांना पाजायचा चहा, 1200 कोटींचा चित्रपट देणाऱ्या 'या' सुपरस्टारची कहाणी वाचा...
Entertainment News : अभिनेता बनण्यासाठी घरातून पळून गेलेला मुलगा संघर्ष करुन भारतीय फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार ठरतो, त्याच्या संघर्षाची कहाणी जाणून घ्या.

KGF Fame Superstar Yash : 'केजीएफ' चित्रपटाने अभिनेता यशला संपूर्ण भारतात सुपरस्टारचा दर्जा मिळवून दिला. इतकंच नाही तर विदेशातही त्याची फॅन फॉलोईंग पाहायला मिळत आहे. केजीएफ चित्रपटाने अभिनेता यशला प्रसिद्धी दिली आणि केजीएफ चॅप्टर 2 मुळे त्याच्या स्टारडममध्ये भर पडली. केजीएफ आणि केजीएफ 2 चित्रपटाने एकून 1500 कोटींहून अधिक कमाई केली. हा चित्रपट आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा कन्नड चित्रपट बनला. पण, तुम्हाला माहित आहे की, अभिनेता यशचा सुपरस्टार होण्यापर्यंतचा प्रवास इतका सोपा मुळीच नव्हता. त्याच्या संघर्षाची कहाणी जाणून घ्या.
अभिनेता बनण्यासाठी घरातून पळून गेलेला 'हा' अभिनेता
अभिनेता यशचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला. यशचे वडिल बस कंडक्टर होते. बस ड्रायव्हरच्या घरी जन्मलेल्या यशने आता यशाचा खूप मोठा पल्ला गाठला आहे. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या यश खूप लहान वयातच त्याच्या स्वप्नासाठी घरं सोडलं. यश फक्त 16 वर्षांचा असताना, त्याने अभिनेता होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आईवडिलांचं घर सोडलं. यशला एका चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शकाचं काम मिळालं, त्यासाठी तो घरदार सोडून बंगळुरुला पोहोचला. पण, अवघ्या 2 दिवसातच तो प्रोजेक्ट बंद पडला.
अभिनेत्याच्या संघर्षाची कहाणी पाहून थक्क व्हाल...
घरातून पळून जाण्याच्या अनुभवाबद्दल सांगताना यशने सांगितलं होतं की, "मी माझ्या घरातून पळून गेलो होतो. मी बंगळुरूला आलो, तेव्हा पोहोचताच मला खूप भीती वाटली. एवढं मोठं, भीतीदायक शहर, पण माझ्या आत्मविश्वास होता, त्यामुळे मला संघर्ष करायला भीती वाटली नाही. मी बंगळुरूला पोहोचलो, तेव्हा माझ्या खिशात फक्त 300 रुपये होते. मला माहित होतं की, जर मी परत गेलो तर, माझे आईवडील मला इथे परत येऊ देणार नाहीत".
1200 कोटींचा चित्रपट देणारा 'हा' सुपरस्टार सेटवर पाजायचा चहा
सहाय्यक दिग्दर्शकाचा प्रोजेक्ट हातून गेल्यावर यश बेनाका नाटक मंडळात सामील झाला. तिथे त्याने बॅकस्टेज हँड म्हणून काम केलं. तिथे तो सेटवर चहा पाजण्यासारखी छोटी-मोठी कामे करायचा, त्यासाठी त्याला दररोज 50 रुपये मोबदला मिळायचा. सेटवर बॅकस्टेज काम करता-करता, त्याने शिक्षण पूर्ण करत कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. त्यानंतर नाट्यकौशल्याच्या जोरावर त्याला 'नंदा गोकुळ' या टीव्ही मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. याच सेटवर त्याची ओळख अभिनेत्री राधिका पंडितशी झाली, जी आता त्याची पत्नी आहे.
पहिला चित्रपट ते स्टारडमपर्यंतचा प्रवास
अभिनेता यशने 2008 मध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं. रॉकी हा त्याचा मुख्य भूमिका असलेला पहिला चित्रपट होता. यापूर्वी त्याने 'जांबाडा हुडुगी' या चित्रपटातून सहाय्यक भूमिका साकारली होती. पण, 2008 साली त्याला पहिला मोठा ब्रेक मिळाला. 'मोदलसाला' या रोमँटिक कॉमेडी चित्रपटातून यशला खरी ओळख मिळाली. त्यानंतर 'किराटक' चित्रपटातील अभिनयाने त्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. यानंतर यशने 'मोगीना मानसू', 'ड्रामा', 'गुगली', 'मिस्टर अँड मिसेस रामाचारी' आणि 'मास्टरपीस' असे अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
'या' चित्रपटामुळे मिळालं स्टारडम
यशने 2018 मध्ये 'केजीएफ : चॅप्टर 1' मध्ये दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 250 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आणि अनेक नवे विक्रम रचले. हा त्या काळातील सर्वाधिक कमाई करणारा कन्नड चित्रपट होता. हा विक्रम चार वर्षे टिकला. त्यानंतर 'केजीएफ: चॅप्टर 2' ने 1250 कोटी रुपयांची कमाई करून हा विक्रम मोडला. केजीएफ चॅप्टर 2 हा चित्रपट आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांपैकी एक आहे आणि 1000 कोटींपेक्षा जास्त कमाई करणारा एकमेव कन्नड चित्रपट आहे.
'या' चित्रपटांमध्ये दिसणार यश
केजीएफ चित्रपटानंतर, यशच्या चाहत्यांची संख्या देशभरात वाढलेली पाहायला मिळाली. आता तो फक्त कन्नड चित्रपटांपुरता मर्यादित नाही, संपूर्ण भारतातील सुपरस्टारचा झाला आहे. याशिवाय तो 'टॉक्सिक' या पॅन इंडिया चित्रपटातही दिसणार आहे. 'टॉक्सिक' हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट 10 एप्रिल 2025 रोजी प्रदर्शित होत आहे. याशिवाय, अभिनेता यश नितेश तिवारीच्या 'रामायण' चित्रपटामध्ये रावणाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
