घाटकोपरची भाषा गुजराती, मुंबईत येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही; मंत्र्यांसमोरच भैय्याजी जोशींचं वक्तव्य
मुंबईतील विद्याविहार येथील एका कार्यक्रमात भैय्याजी जोशी यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना मुंबईतील विविधतेतील एकतेवर भाष्य केलं

मुंबई : राजधानी मुंबईत (Mumbai) देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येतात, इथं आपलं बस्तान बसवतात, इथे पैसा कमावात आणि कर्मभूमि म्हणून मुंबईचा अभिमान बाळगतात. मुंबईत आल्यानंतर अनेकजण महाराष्ट्राची, मुंबईची मातृभाषा असलेली मराठी शिकतात, मराठी बोलतात. मात्र, काहीजण मराठी न शिकता हिंदीत, त्यांच्या प्रादेशिक भाषेतही संवाद साधतात. तर, काहीजण जाणीपूर्वक मराठी भाषा बोलण्याचे टाळतात. मात्र, मुंबईत येणाऱ्याला मराठी आलीच पाहिजे, मराठीत बोललचं पाहिजे, अशी भूमिका मनसे पक्षाकडून सातत्याने घेतली जाते. विशेष म्हणजे सरकारने देखील इंग्रजीसह राज्यातील प्रत्येक शाळेला मराठी (Marathi) सक्तीची केली आहे. त्यामुळे, माय मराठी बोलीचा वापर वाढला पाहिजे हीच मराठीजनांची भूमिका असते. मात्र, मुंबईच्या विविधतेतील एकता सांगताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी मुंबईत येणाऱ्याला मराठी शिकलं पाहिजे असं नाही, असे वक्तव्य केलं आहे. विशेष म्हणजे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासमक्ष उपस्थित कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
मुंबईतील विद्याविहार येथील एका कार्यक्रमात भैय्याजी जोशी यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना मुंबईतील विविधतेतील एकतेवर भाष्य केलं. मुंबईत विविध राज्य, प्रांत आणि भाषा बोलणारे नागरिक राहतात. मुंबईत अनेक भाषा आहेत आणि घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही, असे वक्तव्य भैय्याजी जोशी यांनी केले आहे. त्यामुळे, आता त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया उमटतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
चांगलं जीवन साधनेमधून प्राप्त होतं
मी मंगल प्रभात लोढा यांचे अभिनंदन करतो, आजच्या कार्यक्रमानंतर जाम साहेब यांचे सुद्धा नाव चर्चेत असेल. या ठिकाणी आल्यावर मला महाराणा प्रताप यांचे नाव डोळ्यासमोर आलं. महाराणा प्रताप आणि अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल आपण ऐकलं आहे. ज्यांच्याबद्दल आज आपण ऐकलं आहे, असे जाम साहेब सुद्धा आहेत. आपल्यातल्या अनेकांनी त्यांना पाहिलं आहे. मुंबई ते कन्याकुमारी त्यांनी काम केलं आहे. जामसाहेब यांचे नाव या संस्थेला आहे, हे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. बिर्ला मंदिर अनेक ठिकाणी आहेत, बिर्ला यांनी अनेक मंदिर बांधले पण आतमध्ये देवता कोण आहे, त्यात जाऊन पहावं लागतं. चांगलं जीवन साधनेमधूनच प्राप्त होतं. अशा प्रकारची मधुरता त्यांच्या बोलण्यात होती, असे म्हणत जाम यांच्या कार्याचं कौतुक केलं.
संघाच्या शाखेत काम करणारा प्रत्येकजण ईश्वरी कार्य करतो
ज्यांनी साधना फक्त भारत मातेसाठीच करण्याचा संकल्प केला, त्यांचा दायरा हा हिंदू धर्म आणि भारतमाताच राहिला आहे. हे कर्मशीलता फक्त एका कामासाठी नाही तर असे जाम साहेब योगी म्हणून असतात. छत्रपती शिवाजी महाराज असे एक मात्र राजा आहेत, ज्यांना श्रीमंत योगी म्हणतात. भारताच्या परंपरेत असे महापुरुष असतात असे महापुरुष स्वतःला अहंकारापासून मुक्त करण्यासाठी आपण जे कार्य करतो ते ईश्वराचा कार्य आहे असं म्हणतात. म्हणून हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, असं शिवाजी महाराज म्हणायचे, असा दाखला देखील भैय्याजी यांनी दिला. संघाच्या शाखेत काम करणारा प्रत्येकजण ईश्वरी कार्य करत आहे. स्वयंसेवक नावाची ही शक्ती आहे, त्या शक्तीच्या रूपाने प्रत्येकजण काम करतो. जे स्वतःसाठी जगतात ते पशु समान असतात आणि दुसऱ्यासाठी जगतात ते खरे आयुष्य जगतात आणि त्यांनाच मनुष्य म्हणावे, असेही भैय्याजी यांनी म्हटले.
























