मजूर महिलेच्या बाळाचं अपहरण, अवघ्या 8 तासांत चिमुकल्याची सुखरुप सुटका; आरोपी अटकेत
Palghar Crime News : अपहरण झालेल्या बाळाची अवघ्या आठ तासांत लोहमार्ग पोलिसांकडून सुटका करण्यात आली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
Palghar Crime News : पालघर बोईसर येथील अपहरणाच्या घटनेचा लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या आठ तासात छडा लावला आहे. बोईसर रेल्वे स्थानकावर झोका बांधून आठ महिन्याच्या बाळाला या झोक्यात झोपी घालून महिला मजूर रेल्वे ट्रॅकवर काम करत होती. तिच्या बाळाचं अपहरण करण्यात आलं ही घटना लक्षात आली तेव्हा या मोलमजुरी करणाऱ्या महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली. या महिलेने जोरात जोरात टाहो फोडला आणि याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. लोहमार्ग पोलिसांनी या बाळाचा तात्काळ शोध सुरू केला. सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले गेले. सर्व रेल्वे स्थानकांना सूचना दिल्या गेल्या आणि अवघ्या आठ तासांतच आरोपींच्या मुस्क्या आवळण्यात पोलिसांना यश आलं. आरोपीला पकडून बाळाची सुखरूप सुटका केली. आपल्या कुशीत बाळ आल्यानंतर या माऊलीच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
वर्षा कन्हैया डामोर ही रेल्वे मजूर आपल्या आठ महिन्यांच्या महिमा या मुलीला बोईसर रेल्वे स्टेशनवर झोळीत झोपून झोपवून पतीसोबत रेल्वे ट्रॅकवर काम करण्यासाठी गेली होती. या संधीचा फायदा घेत आरोपीनं या मुलीला झोळीतून उचलून तिथून पलायन केलं. वर्षा सोबत काम करणाऱ्या तिच्या सहकारी महिलेला झोळीत बाळ नसल्याचं समजल्यानंतर तिनं वर्षाकडे धाव घेतली आणि वर्षाला झोळीमध्ये बाळ नसल्याचं सांगितलं. वर्षानं हातातलं काम सोडून बाळाच्या झोळीकडे धाव घेतली तिथं आल्यानंतर तिला बाळ न दिसल्यानं ती कावरीबावरी झाली आणि जोराजोरानं टाहो फोडू लागली तातडीनं त्यांनी बोईसर लोहमार्ग पोलीस ठाणे गाठून बाळ पळवून नेल्याची तक्रार दिली.
पोलिसांनीही तत्परता दाखवून अज्ञातानं बाळ पळवून नेल्याचा गुन्हा तातडीनं दाखल केला. त्यानंतर पालघर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे नव्यानं रुजू झालेले पोलीस अधिकारी नरेश रणधीर यांनी तातडीनं आपली तपास चक्रं फिरवली. त्यानुसार त्यांनी अपहरणाची माहिती रेल्वे स्थानकावर हजर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह गृहरक्षक दलाच्या जवानांना दिली. याच वेळेस मुरबे येथून रेल्वे स्थानकाकडे कामासाठी येत असलेले गृहरक्षक दलाचे जवान योगेश तरे यांना एक जण बाळ घेऊन जात असल्याचे दिसले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता बाळाचा फोटो काढला आणि पोलीस ठाण्यात पाठवला. त्यानंतर हा फोटो त्या बाळाच्या आईला दाखवल्यानंतर हे बाळ आपलेच असल्याचे या महिलेनं ओळखलं आणि तातडीनं पोलिसांनी जवान योगेश तरे याला संपर्क साधला. त्यानंतर अतिरिक्त पोलीस बल पाठवून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. ही माहिती पालघर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांनी दिली.
अवघ्या आठ तासात ही कारवाई पालघर लोहमार्ग पोलिसांनी तातडीने केली. आरोपीला पालघर लोहमार्ग पोलीस ठाण्यात अटक करण्यात आली असून पोलीस अधिकारी नरेश रणधीर यांनी बाळाचा ताबा आई-वडिलांकडे दिला आहे. आपले बाळ मिळाल्यानं बाळाच्या आई-वडिलांनी आनंद व्यक्त करत लोहमार्ग पोलिसांचे आभार मानले आहेत. मुलांचे अपहरण करणाऱ्या आरोपीचे इतरही प्रकरणात काही संबंध आहेत का याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
पोटात दडवल्या ड्रग्जनं भरलेल्या तब्बल 20 कॅप्सूल, संशय आल्यानं झडती; महिला अटकेत