Aurangabad News: औरंगाबाद पोलिसांची नजर लय भारी! चालण्याची लकब हेरली अन् घरफोडी करणाऱ्यावर केली कारवाई
Aurangabad Crime News: आरोपीची चालण्याची लकब एका पोलिसाने हेरली आणि त्यानंतर काही वेळातच आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले.

Aurangabad Crime News: पोलिसांनी ठरवलं तर आरोपीला शोधणं कठीण नसते. मग तो आरोपी कितीही चाणाक्ष असला तरीही त्याला पोलीस आपल्या कुशल कामगिरीने शोधून काढतातच. आता अशीच काही घटना औरंगाबादमध्ये (Aurangabad) समोर आली आहे. घरफोडी झाल्यावर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात आरोपी कैद झाला होता, पण फुटेज अंधूक असल्याने आरोपी निष्पन्न करण्यात अडथळे आले. मात्र याचवेळी आरोपीची चालण्याची लकब एका पोलिसाने हेरली आणि त्यानंतर काही वेळातच आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले. विशेष म्हणजे या आरोपीकडून चोरीचा पाच तोळे सोने व 30 तोळे चांदी, असा सर्व ऐवज जप्त करण्यात आला. सय्यद सरताज ऊर्फ गोंमडा सय्यद सिकंदर ( वय 33 वर्षे, रा. अबरार कॉलनी, मिसारवाडी) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहंमद नवीन चांदपाशा शेख (वय 32 वर्षे, रा. गल्ली न. 17, बायजीपुरा) हे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. दरम्यान पहाटे जाधववाडीत जाऊन भाजीपाला खरेदी करायचा आणि तेथेच विक्री करून दुपारपर्यंत ते घरी येतात. त्याच्या मुलीची प्रकृती बरी नसल्यामुळे पत्नी तिला घेऊन माहेरी गेली होती. त्यामुळे 29 जानेवारीच्या पहाटे ते एकटेच घरी होते. पहाटे साडेचार वाजता मोहंमद चांदपाशा शेख हे जाधववाडी मोंढ्यात गेले होते. त्यानंतर घरी कोणीही नव्हते. त्याचवेळी आरोपी सय्यद सरताज ऊर्फ गोंमडा हा कुलूप तोडून घरात घुसला.
घरात कोणीच नसल्याची संधी साधून मोहंमद चांदपाशा यांच्या घरात घुसलेल्या सय्यद सरताजने कपाटातील 15 ग्रॅम सोन्याच्या कानातील रिंग, 15 ग्रॅम सोन्याचे गंठण, 8 ग्रॅम सोन्याचा हार, 3 ग्रॅम सोन्याच्या मनगट्या, 7 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, 30 तोळे चांदीचे पैंजन, अशा ऐवजावर डल्ला मारला. दरम्यान मोहंमद नवीन चांदपाशा शेख हे साडेदहा वाजता घरी परतले तेव्हा घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी जिन्सी पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली होती.
चालण्याची लकब हेरली अन् अडकला...
घटनेची माहिती मिळताच जिन्सी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. ज्यात सय्यद सरताज ऊर्फ गोंमडा हा सीसीटीव्हीत कैद झाला होता. मात्र, फुटेज प्रचंड अंधूक असल्याने लवकर आरोपी निष्पन्न करता आला नाही. वारंवार फुटेज पाहिल्यानंतर एका पोलिसाने चालण्याची लकब व त्याच्या दाढीची रचना हेरली आणि तो गोंमडा असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांनी गोंमडाला शोधण्याचे आदेश दिले.
विशेष पथकाचे उपनिरीक्षक अनंता तांगडे, उपनिरीक्षक रावसाहेब काकड यांच्यासह हवालदार शेख जफर, नंदलाल चव्हाण, संतोष शंकपाळ, संतोष बमनात यांच्या पथकाने सिकंदर हॉलच्या बाजूला उभ्या असलेल्या गोंमडाला पकडले. त्याला खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्याच्या ताब्यातून चोरीला गेलेला मुद्देमाल देखील ताब्यात घेण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
ABP Majha Impact: तीस-तीस घोटाळ्यातील आरोपी संतोष राठोड फोन संभाषण प्रकरणी चौकशी सुरू
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
