Food Inflation: महागाईनं काळजाचा ठोका चुकवला; टॉमेटो, बटाटा, कांद्यानं वाढवलं टेन्शन, पुन्हा सर्वसामान्यांना रडवणार?
Food Inflation: ग्राहक व्यवहार विभागानं जाहीर केलेल्या जानेवारीच्या आकडेवारीनुसार, बटाट्याचा किरकोळ दर वार्षिक आधारावर 33 टक्क्यांनी वाढला आहे आणि सध्या तो 20 रुपये प्रति किलो दरानं विकला जात आहे.
![Food Inflation: महागाईनं काळजाचा ठोका चुकवला; टॉमेटो, बटाटा, कांद्यानं वाढवलं टेन्शन, पुन्हा सर्वसामान्यांना रडवणार? tomato onion potato prices are up in january cause inflation worries know details of it Maharashtra Marathi News Food Inflation: महागाईनं काळजाचा ठोका चुकवला; टॉमेटो, बटाटा, कांद्यानं वाढवलं टेन्शन, पुन्हा सर्वसामान्यांना रडवणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/12/04e105bef2c044735fa64bcdec4c32c21697074566569666_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Food Inflation: मुंबई : दिवसागणिक वाढणाऱ्या महागाईनं (Inflation) आधीपासूनच सर्वसामान्य माणूस पिचला आहे. अशातच बटाटा (Potato Prices), कांदा (Onion Prices), टोमॅटो (Tomato Prices) अशा प्रमुख भाज्यांचे भाव वाढले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अलिकडच्या आठवड्यात दररोजच्या जेवणात समावेश असणाऱ्या या प्रमुख भाज्यांचे भाव वाढले आहेत, याचाच परिणाम अन्नधान्याच्या महागाई दरावर दिसून येतो. ग्राहक व्यवहार विभागानं जाहीर केलेल्या जानेवारीच्या आकडेवारीनुसार, बटाट्याचा किरकोळ दर वार्षिक आधारावर 33 टक्क्यांनी वाढला आहे आणि सध्या तो 20 रुपये प्रति किलो दरानं विकला जात आहे. तर कांद्याच्या किरकोळ भावात 20 टक्के वाढ होऊन ती 30 रुपये किलो झाली असून टोमॅटोच्या दरांत वार्षिक 50 टक्के वाढ झाली आहे, तर किरकोळ बाजारात 30 रुपये किलोनं विकली जात आहे.
महागाईत मोठी वाढ
फायनान्शिअल एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पुढील काही महिन्यांत टोमॅटो आणि बटाटा यांसारख्या भाज्यांच्या किमतीत आणखी वाढ होऊ शकते. गतवर्षी याच काळात टोमॅटो आणि बटाट्याच्या भावात 36 टक्के आणि 20 टक्क्यांनी घसरण झाली होती. जुलै 2023 मध्ये, पावसाळ्याच्या खराब परिस्थितीमुळे, टोमॅटोच्या किमती 202 टक्क्यांनी वाढल्या होत्या आणि देशाच्या अनेक भागांमध्ये ते 100 रुपये प्रति किलोपेक्षा जास्त विकले गेले होते. यानंतर सरकारनं बाजारपेठेत हस्तक्षेप करून पुरवठा साखळी सुरळीत करण्यासाठी अनेक ठिकाणी टोमॅटो 70 रुपयांनी विकले होते.
कांद्याच्या वाढत्या किमतींवर रोख लागणार?
किरकोळ बाजारात कांदा सध्या 30 रुपये किलो दरानं विकला जात आहे. गेल्या तीन महिन्यांत त्याच्या किरकोळ किमतींत 25 टक्क्यांची घसरण झाली आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये कांद्याच्या किमतींत 74 टक्क्यांची वाढ झाली होती, त्यानंतर केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. यासोबतच सरकारने 25 रुपये दराने कांदा विकण्याचा निर्णयही घेतला होता.
केंद्र सरकारच्या या प्रयत्नांमुळे नाशिकच्या बाजारातून कांद्याचा भाव आता एक हजार रुपये प्रति क्विंटलवर आला आहे, जो महिन्याच्या सुरुवातीला 2 हजार रुपये प्रति क्विंटल होता. टोमॅटो, बटाटा आणि कांद्याचा महागाई दरात 0.6 टक्के, 1 टक्के आणि 0.6 टक्के वाटा आहे. अशा परिस्थितीत या भाज्यांचे दर वाढले तर त्याचा परिणाम अन्नधान्य महागाईवर नक्कीच दिसून येईल.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)