कमाईची संधी! महाराष्ट्रातील लहान मुलांच्या वस्तू विकणारी 'फर्स्ट क्राय' आणणार आयपीओ
महाराष्ट्रातील लहान मुलांच्या वस्तूंची विक्री करणारी 'फर्स्ट क्राय' (firstcry ) कंपणी आपला आयपीओ (IPO) आणणार आहे.
firstcry IPO : लहान मुलांच्या वस्तूंचे विक्रेते म्हणून बाजारात ओळख असलेली कंपनी 'फर्स्ट क्राय' आपला आयपीओ लॉन्च करण्याची योजना आखत आहे. मनीकंट्रोल या अर्थविषयक घडामोडींच्या वेबसाईटने याबाबत वृत्त दिले आहे. कंपनीची आयपीओद्वारे सुमारे 700 कोटी रुपये उभारण्याची योजना आहे. आयपीओबाबत गुंतवणूक बँकर्सशी बोलणी सुरू झाल्याचे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कोटक महिंद्रा आणि मॉर्गन स्टॅनले देखील या आयपीओसाठी गुंतवणूक बँकर म्हणून कंपनीत सामील झाले आहेत. याआधी लहान मुलांच्या कपड्यांचे ब्रँड जिनी अँड जॉनी आणि लिलीपुट यांचे देखील आयपीओ बाजारात दाखल झाले होते. परंतू काही कारणाने ते अयशस्वी ठरले होते.
फर्स्ट क्राय कंपनी त्यांच्या आयपीओसाठी पुढील महिन्यात सेबीकडे कागदपत्रे सादर करू शकते. यात, कंपनीने स्वतःला खासगी कंपनीतून सार्वजनिक कंपनीत रूपांतरित करण्यासाठी मंडळाकडून मान्यता मिळण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण केली आहे. सेबीच्या नियमांनुसार, हा आयपीओ आणण्यापूर्वी कंपनीला ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
गुंतवणूकदारांना अर्धवट बाहेर पडण्याची संधी
हा आयपीओ प्राथमिक शेअर्स आणि गुंतवणूकदारांद्वारे विक्रीसाठी ऑफर यांचे मिश्रण असेल. यामध्ये अनेक गुंतवणूकदारांना अर्धवट बाहेर पडण्याची संधीही मिळणार आहे. काही बातम्यांनुसार, गुंतवणूकदारांद्वारे विक्रीसाठी ऑफर एकूण आयपीओ आकाराच्या 75 टक्के म्हणजेच सुमारे 250 दशलक्ष डॉलर असेल. चार ऑफर मधून मिळणारी कमाई कंपनीकडे जाणार नाही असं मत तज्ज्ञांनी मांडलं आहे.
काय आहे फर्स्ट क्राय कंपनी?
फर्स्ट क्रायची स्थापना 2010 मध्ये सुपम माहेश्वरी आणि अमित्वा साहा यांनी केली होती. दोघेही पुण्यातील रहिवासी आहेत. कंपनीचे 7.5 दशलक्ष नोंदणीकृत ग्राहक आहेत. याशिवाय त्यांच्याकडे 2 लाखांहून अधिक उत्पादने आहेत. त्यामध्ये कपडे, पादत्राणे, उपकरणे, खेळणी, टॉयलेटशी संबंधित वस्तू आणि इतर गोष्टींचा समावेश आहे. कंपनीचे 6,000 ब्रँड आणि 400 हून अधिक स्टोअर्स आहेत. 2016 मध्ये First Cry ने महिंद्रा अँड महिंद्राची उपकंपनी BabyOA 362 कोटी रुपयांना विकत घेतली. 2020 मध्ये 296 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक प्राप्त करून कंपनी युनिकॉर्न बनली. ही गुंतवणूक त्यांच्या मोठ्या गुंतवणूकदार सॉफ्टबँकेकडून मिळाली आहे.