(Source: Poll of Polls)
इस्रायल-इराण युद्धाच्या स्फोटात भारतीय शेअर बाजार होरपळला, कंपन्यांच्या भांडवलात तब्बल 4.98 लाख कोटींची घट!
इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा जागतिक पातळीवर परिणाम पडताना दिसतोय. भारतीय शेअर बाजारावरही या युद्धाचा नकारात्मक परिणाम होत आहे.
मुंबई : इराण-इस्रायल यांच्यातील युद्धाचा संपूर्ण जगाने धास्ती घेतली आहे. याच युद्धाचा परिणाम आता भारतीय शेअर बाजारावरही पडला (Stock Market Crash) आहे. या युद्धामुळे मुंबई शेअर बाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअर बाजारावरील (NSE) निर्देशांक चांगलेच गडगडताना दिसतायत. आजदेखील आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बीएसई आणि एनएसईच्या निर्देशांकात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. आज (15 एप्रिल) सकाळी 10 वाजता बीएसई सेन्सेक्स 727 अंकांच्या पडझडीसह 73,531.14 अंकांपर्यंत घसरला.
बाजाराच्या सुरुवातालीच पडझड
तर राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजेच निफ्टी 200 अंकांच्या पडझडीसह 22,315.20 पर्यंत पोहोचला होता. इराण आणि इस्रायल युद्धामुळे सध्या भांडवली बाजारात अशी पडझड पाहायला मिळाली आहे. या पडझडीचा आजचा दुसरा दिवस आहे. भांडवली बाजारातील या घसरणीमुळे मुंबई शेअर बाजारावरील कंपन्याच्या बाजारभांडवलात तब्बल 4.98 लाख कोटी रुपयांपर्यंत घट झाली. याआधी शुक्रवारी मुंबई शेअर बाजार 74,244.90 तर राष्ट्रीय शेअर बाजार 22,519.40 अंकांवर बंद झाला होता.
30 पैकी फक्त 2 कंपन्यांंचा शेअरला ग्रीन कॅन्डल
आजदेखील सेन्सेक्सवर लिस्टेड 30 कंपन्यांपैकी फक्त दोन कंपन्यांच्या शेअर्सचे मूल्य वाढल्याचे दिसत आहे. उर्वरित सर्वच कंपन्यांच्या शेअर्सचे मूल्य कमी झाले आहे. टाटा मोटर्स, टाटा स्टील, एनटीपीसी या तीन कंपन्यांच्या समभागांचे मूल्य सर्वाधिक कमी झाले आहे.
गेल्या आठवड्यात काय स्थिती होती?
शेयर बाजारात गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारीदेखील शेअर बाजार गडगडला होता. या दिवशी बीएसई सेन्सेक्स 793.25 अंकांनी म्हणजेच 1.06 टक्के घसरून 74,244.90 अंकांवर बंद झाला होता. तर नॅशनल स्टॉक एक्सजेंच अर्थात एनएसई निर्देशांकातही 234.40 अंकानी म्हणजेच 1.03 टक्क्यांनी घसरण झाली होती. शुक्रवारी एनएसई 22,519.40 अंकांवर बंद झाला होता. या दिवशी निफ्टीमध्ये 50 पैकी एकूण 45 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली होती.
गेल्या आठवड्यात या कंपन्यांचे शेअर्स घसरले
गेल्या आठवड्यात सन फार्मा, मारुती सुझुकी, पॉवर ग्रीड, टायटन,जेएसडब्ल्यू स्टील, टेक महिंद्रा, लार्सन अँड टुब्रो, भारतीय स्टे बँके या कंपन्यांचे शेअर्स घसरले होते. तर दुसरीकडे टाटा मोटर्स, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, नेस्ले या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. गेल्या आठवड्यात गुरुवारी ईद-उल-फित्रमुळे शेअर बाजार बंद होता.
हेही वाचा :
हो खरंय! सरकारची 'ही' योजना महिलांना दोन वर्षांत श्रीमंत करणार, करही वाचणार; एकदा वाचाच!
दिवसाची रात्र अन् रात्रीचा केला दिवस, पठ्ठ्या वडापाव विकून झाला कोट्यधीश, वाचा संघर्षमय कहाणी!
तयारीला लागा! या आठवड्यात येणार 'हे' दोन जबरदस्त IPO, मालामाल होण्याची नामी संधी!