(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Iraq War 20 years : 12 लाखांवर निष्पाप जीवांचे रक्त सांडून अमेरिकेनं इराकमध्ये कोणती लोकशाही आणली?
मानवी इतिहासाच्या कालखंडात क्रौर्याची परिसीमा गाठल्या गेलेल्या इराकमधील युद्धाला (Iraq War 20 years) आज 20 वर्ष पूर्ण झाली. बरोबर याच दिवशी 20 मार्च 2003 मध्ये अमेरिकेनं इराकमध्ये युद्धाची ठिणगी टाकली होती जी आज 12 लाखांवर जीव घेऊन बसली आहे. या 20 वर्षांमध्ये अमेरिकेनं इराकमध्ये काय गमावलं आणि काय कमावलं? याच उत्तर अजून देता आलेलं नाही. स्वत:च्या 7 हजारांवर सैन्याचा युद्धखोर राष्ट्राध्यक्ष जाॅर्ज बुश यांच्या अघोरी राजकारणाने आणि स्वार्थीपणाने बळी गेला. आजही अमेरिकेकडून तसेच पाश्चिमात्य या युद्धाचे समर्थन करताना तेलसंपन्न देश नासवल्याची कोणतीही खंत वाटत नाही. दोन दशकांचा काळ लोटूनही इराकमधील अंतर्गत यादवी व इसिसचा रक्तपात थोपवता आला नाही.
पाश्चिमात्य राष्ट्रांच्या खुनशी व आपमतलबी राजकारणाने इराक व सिरियामध्ये गेल्या दोन दशकांत निष्पाप जीव कीड्या मुंग्यांप्रमाणे चिरडले गेले आहेत. या दोन्ही देशांतील रक्तरंजित घनघोर संघर्षामध्ये 18 लाखांहून अधिकांचा बळी घेतला व किती परागंदा झाले याचा थांगपत्ता लागलेला नाही. अमेरिकेने सद्दामचा पाडाव केल्यानंतर इराकवासियांना प्रगल्भ लोकशाहीची स्वप्ने पडू लागली होती, पण सद्यस्थितीत जो काही विनाश झाला आहे तो पाहून सद्दामचीच राजवट बरी होती असा सूर इराकी जनतेचा आहे.
सात हजारांवर अमेरिकन सैनिक मारले गेले
इराकमध्ये हुकुमशहा सद्दाम हुसेनचा खात्मा करण्यासाठी अमेरिकेने इराकविरोधात युद्ध पुकारले. सद्दामचा खात्मा होऊन 20 वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र, अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाची शोकांतिकाच इराकमध्ये झाली आहे. रक्तपिपासू इसिस व अल कायदाला नेस्तनाबूत करण्यासाठी नाटोच्या मदतीने अमेरिकेने जंग जंग पछाडले पण अजूनही इराक होरपळतो आहे. तब्बल 12 लाख लोकांनी आतापर्यंत प्राण गमावला आहे. त्याचबरोबर जवळपास सात हजारांवर अमेरिकन सैनिक मारले गेले आहेत.
खनिज तेलाने समृद्ध असलेल्या इराकची पुनर्वसन करण्यासाठी किती काळ लागेल यासाठी विचार जरी करायचा म्हटले तरी अंगावर शहारे येतात. अमेरिकेतून लष्कर माघारी घेऊन 12 वर्ष लोटली आहेत. युद्धपिपासू अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जाॅर्ज बुश यांच्या तत्कालीन इराकविरुद्ध युद्धाच्या निर्णयाला अमेरिकन लोकांनीच चुकीचे ठरवले आहे.
काय सांगून अमेरिकेचा इराकमध्ये रक्तपात?
अमेरिकेनं 20 मार्च 2003 रोजी अमेरिकेनं ब्रिटनने दिलेल्या पाठिंब्याच्या बळावर इराकमध्ये युद्धास सुरुवात केली होती. तेल संपन्न इराकवर आक्रमण तीन मूलभूत गोष्टींवरून झाले होते. यामध्ये सद्दाम हुसेनच्या राजवटीत सामूहिक विनाशाची शस्त्रे होती weapons of mass destruction (WMD) तसेच ती शस्त्रे दहशतवादी गटांच्या संभाव्य फायद्यासाठी अधिक विकसित करत होते आणि तिसरं म्हणजे एक मैत्रीपूर्ण आणि लोकशाही असलेला इराक तयार करणे जो या अरब जगतात उदाहरण असेल. मात्र, ऑपरेशन इराकी फ्रीडम सुरू झाल्यानंतर तब्बल 20 वर्षानंतरही इराकवरील आक्रमण ही फसवणूक होती का? हा प्रश्न अजूनही चर्चेचा विषय आहे. इराकच्या युद्धाने अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणांवर आजपर्यंत विपरित परिणाम केला आहे.
सामूहिक संहाराची शस्त्रे खरंच होती का?
इराकमध्ये नरसंहार करताना सामूहिक संहाराची शस्त्रे असल्याचा दावा केला होता तो पूर्णत: फोल ठरला आहे. अनेक तज्ज्ञांनी त्याकडे लक्ष वेधले आहे. "कॉन्फ्रंटिंग सद्दाम हुसेन" या पुस्तकाचे लेखक मेल्विन लेफ्लर यांच्या मते, आक्रमणाच्या अगोदरच्या महिन्यांत अनिश्चितता हा एक निर्णायक घटक होता. काही निरीक्षकांनी ISG ला सक्रिय WMD कार्यक्रम सापडला नसल्याकडे लक्ष वेधले आहे. परंतु इराकवरील आंतरराष्ट्रीय निर्बंध उठवल्यानंतर सद्दाम हुसेन हा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याचा विचार करत असल्याचे पुरावे गोळा केले.
सद्दामला फासावर कसे लटकवले?
अमेरिकेनं कुवेतमधून इराकवर आक्रमण केले होते. पाहता पाहता इराकी सैन्याला चिरडून सद्दामला सत्तेतून खेचले. त्यानंतर तीन आठवड्यांनी 9 एप्रिल रोजी अमेरिकन सैन्याने बगदादवर ताबा मिळवला. इराकी नागरिकांसह त्यांनी बगदादच्या फिरदोस स्क्वेअरमध्ये सद्दामचा भव्य पुतळा जमीनदोस्त केला. पुतळा जमीनदोस्त करणे हा अमेरिकेच्या विजयाचे प्रतीक मानला गेला. यानंतर तत्कालिन राष्ट्राध्यक्ष जाॅर्ज बुश यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. 1 मे रोजी 2003 रोजी बुश यांनी यूएसएस अब्राहम लिंकन विमानवाहू जहाजावर "मिशन पूर्ण झाले" असे घोषित केले आणि इराकमधील प्रमुख लढाऊ ऑपरेशन्स समाप्त केले.
मात्र, इराकमध्ये सुव्यवस्था आणण्यात यूएस सैन्याच्या अपयशावर प्रकाश टाकणारी अराजकता, जी झपाट्याने देशभर पसरली होती, ती अमेरिकन सरकारी अधिकाऱ्यांनी गंभीर नाही म्हणून फेटाळून लावली. 2003 च्या अखेरला अमेरिकन सैन्याने सद्दामला पकडले, जो तिक्रितमध्ये त्याच्या बालपणीच्या घराजवळील एका भुयारामध्ये लपला होता. नंतर त्याच्यावर इराकी न्यायालयाने खटला चालवला आणि सामूहिक हत्या आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये फाशीची शिक्षा दिली. त्याच्या फाशीसाठी निवडलेली तारीख 30 डिसेंबर 2006 होती. जो दिवस ईद या मुस्लिम सणाचा पहिला दिवस देखील होता.
सध्या इराकमध्ये काय स्थिती?
ऑक्टोबर 2019 मध्ये, 2003 नंतरच्या नरसंहारानंतर इराकमधील सर्वात मोठ्या निषेधाच्या आंदोलनाने सरकारची सत्ता बाजूला करून संसदेला नवीन निवडणूक कायदा स्वीकारण्यास भाग पाडले गेले. या आंदोलनात सुरक्षा दल आणि निमलष्करी गटांनी 600 हून अधिक आंदोलकांना ठार केले आणि तेव्हापासून कार्यकर्त्यांना लक्ष्य करणे सुरूच ठेवले आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये कोरोना व्हायरस निर्बंध लागू होईपर्यंत अनेक महिने आंदोलन सुरुच होते. तथापि, आजच्या इराकमध्ये, आघाडीने सरकार स्थापन केले आहे ज्याने फक्त 15 टक्क्यांपेक्षा कमी मतदारांची मते मिळविली आहेत.
यामुळे अनेक इराकींनी शिया नेता अल-सद्र या स्व-घोषित इराकी राष्ट्रवादी नेत्याला पाठिंबा दिला आहे, ज्यांच्या सैन्यावर 2003 नंतरच्या इराकी गृहयुद्धात सर्वात वाईट हिंसाचार केल्याचा आरोप आहे. गेल्या ऑगस्टमध्ये त्यांचे समर्थक आणि प्रतिस्पर्धी शिया गटांमधील हिंसाचारात 30 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे लोकशाही आणण्यासाठी केलेल्या आक्रमणापासून दोन दशकांनंतरही इराक अस्थिर आहे.