दिवाळीच्या 5 दिवसांसाठी घरची लक्ष्मी 2 महिने राबते!
तिच्याशिवाय तुम्ही दिवाळीची कल्पना करु शकता का? उत्तर कदाचित नाही असंच असेल. दिवाळी हा सर्वांसाठी ५ दिवसांचा सण असला तरी तिच्यासाठी हा सण म्हणजे किमान १-२ महिन्याचा तरी आहेच. वर्षाचे १२ महिने ती घरासाठीच झटत असते मात्र सणवार आले आणि त्यात दिवाळी म्हटलं की, दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा.. असं म्हणत तिचं नियोजन किमान २ महिन्यांआधीपासूनच सुरु होतं.
अहो, पुढच्या महिन्याच्या अखेरीस दिवाळी आहे. आता आपण महिन्याचं सामान भरायला बाजारात जात आहोत. तर जरा डाळी एखाद किलोनं जास्त घेऊयात. पुढच्या महिन्यात मुलांच्या कपड्यांचाही खर्च आहेच, त्यात वंसनाही भेटवस्तू द्यायच्या आहेत. हे दोन महिने जरा पगार जपूनच वापरावा लागेल. अहो.. गेल्या वर्षीचे दिवे आणि कंदील कपाटाच्या वरच्या बॅगेत भरुन ठेवलेत. जरा बाहेर काढून ठेवा. पणत्या स्वच्छ करेन. मुलांच्या परीक्षा झाल्या की जरा हौस म्हणून आपल्या चिऊलाच कलाकारी करायला सांगेन. ऑफिसमध्ये विचारते आणि जरा या महिनाअखेरीस आठवड्याच्या सुट्टीला लागून एखाद दुसरी जास्त रजा मागते. पाहते.. मिळतेय का, २ दिवसात किचनची साफसफाई करुन घेते. जेणेकरुन पुढच्या महिन्यातल्या २ रविवारी फराळाचं थोडं उरकून घेईल. मुलांच्या परीक्षा संपल्या की जरा हॉल आणि बेडरुम आवारायला मदत कराल. पंखे आणि बाथरुमच्या टाईल्स घासून पुसून घेऊयात. कामवाल्या ताईंना विचारलं तर त्या म्हणाल्या थोडा अधिकचा वेळ देणं त्यांना शक्य़ नाही. सर्वच घरात जास्त कामं. त्यात त्यांनी एक्स्ट्रा पैसेही मागितलेत...हा ही अधिकचा खर्च आहे. दिवाळीची भेटवस्तू म्हणून त्यांना पैसेच देऊ. त्यांनाही सोयीचं पडेल. पाहुयात वेळेचं नियोजन कसं करायचं ते... मुलांची शॉपिंग त्यांच्या परीक्षेनंतरच उरकू. पण, आधी घराची साफसफाई होऊन जाऊ देत. आताच नियोजन करा.. कुणाला काय भेटवस्तू द्यायच्या त्या. तुम्ही यंदा कुर्ता नको हं.. काही तरी वेगळं ट्राय करा. किती ट्रेंडी कपडे बाजारात आलेत.
एका सणाचं काऊंटडाऊन सुरु झालं आणि तिच्या डोक्यात ए टू झेड नियोजनाचा आराखडाही तयार झाला. हे नियोजन आर्थिक गणितापासून कामाचा उरक आणि कुटुंबियांचा आनंद द्विगुणीत कसा करायचा इथपर्यंतचं असतं.
काहींना ही साधी सरळ गोष्ट वाटेल. या बायका किती ते टेन्शन घेतात, असं काहींना वाटेल. मात्र हे असंच आहे. सोशल मीडियावर सणावारांच्या तोंडावर त्यांच्या पाककलेपासून ते काम करुन घेण्याच्या कसबपर्यंतचे टिंगलटवाळीची जोक्स सातत्याने वायरल होत असतात. मात्र हे जोक्स वाचले की मला त्या संबंधित क्रिएटरच्या थिंकींग प्रोसेसच्या निरीक्षणावरच हसू येतं.
आता ऑफिसमधून निघून ट्रॅफिकमध्ये अडकले नाही तर ७ पर्यंत घरी पोहोचेन. जेवण जरा लवकरच उरकते. आणि किचनची खिडकी आणि कोपऱ्याकडच्या कपाटाची सफाई करते. आज रात्रीतच कपाटातले डब्बे मोकळे करते. म्हणजे उद्या सकाळी ताईंना हेच डब्बे घासून ठेवायला सांगेन. एक कोपरा उद्या रात्री उरकते. म्हणजे परवा सुट्टीच्या दिवशी गॅसक़डच्या भिंतीवरचा चिकट झालेला भाग घासून पुसून काढता येईल. हेच काम थोडं वेळखाऊ आहे. सुट्टीच्या दिवशीच उरकेन.......... हे असं तिचं नियोजन ऑफिसचं काम सुरु असतानाच सुरु होतं.
फराळ करतानाही तारेवरची कसरत तर असतेच. सगळा फराळ बाहेरुन नको असं म्हणणाऱ्या कुटुंबासाठी एखाद फराळाचा प्रकार ती घरी तयार करते. पण, यातही तिचं नियोजन हे पक्कं असतं आणि तितकंच वेळखाऊ.
ही तर झाली दिवाळीच्या पूर्वीची तयारी.. दिवाळीचे ते ५ दिवस मित्र, नातेवाईकांच्या रेलचेलीमुळे अधिक थकवणारे ठरतात. मात्र याचा लवलेषही तिच्या चेहऱ्यावर दिसत नाही. हसऱ्या चेहऱ्याने प्रत्येकाचं आदरातिथ्य ती करते. तुम्ही कधी विचार केला आहे का, जेव्हा घरातली ती.. इतकं शारीरिक आणि मानसिक नियोजन करते तेव्हा दिवाळीचे हे ५ दिवस संपूर्ण कुटुंबाचे आनंदाचे जातात. घर स्वच्छ, सुंदर, चमकतं आणि कुटुंबियांच्या चेहऱ्यावरच्या आनंदाने खुलून जातं. वाह! वहिनी किंवा ताई किंवा आई (तिची रुपं अनेक आहेत) मजा आली. यंदा घर तुम्ही छान सजवलं. तुम्हाला भेटून आनंद झाला. तुमच्या हातच्या जेवणाची, फराळाची बातच न्यारी.. ही कौतुकाची थाप जेव्हा तिच्या पाठीवर पडते तेव्हा तिला मेहनतीचं फळच मिळाल्यासारखं वाटतं. बँक हॉलिडेच्या या दिवसात थकले, दमले हा शब्दही तिच्या तोंडून तुम्ही कधी ऐकलाय का?
दिवाळीची सुट्टी संपते, मुलांची मजा होते, नवऱ्याचा आराम होतो, सासू सासऱ्यांना मुली, जावई, नातवंडांना भेटल्याचा आनंद मिळतो आणि घरातली लक्ष्मी पुन्हा रुटीनमध्ये रुळते. या दिवाळीच्या दिवसात आई बाबांची धावती भेट घेऊन, त्यांना शुभेच्छा घेऊन दिवेलागणीच्या आधी घरी परतणारी ती.. तिच्या कुटुंबाच्या आनंदातच स्वतःचा आनंद मानत असते. कारण ती फक्त आणि फक्त तिच्या संसारासाठी, घरासाठी झटत असते.
ती गृहिणी असो किंवा घर, ऑफिसमधली तारांबळ सांभाळणारी. तिच्या कौतुकासाठी निबंध वाचायची गरज नाही. फक्त तिला पाठबळाची गरज आहे. हे पाठबळ फक्त मानसिक हवं. तिला घरची लक्ष्मी मानणाऱ्यांनी हे ही समजून घ्यावं की तिच्याशिवाय तुमचं अस्तित्व हे शून्य आहे. ती आहे म्हणून तुम्ही आहात आणि तुमच्या आयुष्यात सणांचा आनंद! पाहा पटतंय का?