Nashik Crime : जाधव बंधू हत्या प्रकरण : कोयते, रक्ताने माखलेले कपडे अन् मोबाईल पोलिसांकडून जप्त, संशयितांचा एसआयटीकडे ताबा, तपासाला वेग
Nashik Crime : नाशिकच्या बोधलेनगर येथील प्रशांत जाधव आणि उमेश जाधव या दोघांची रंगपंचमीच्या दिवशी हत्या करण्यात आली होती.

Nashik Crime : नाशिकच्या बोधले नगर येथील प्रशांत जाधव (Prashant Jadhav) आणि उमेश जाधव (Umesh Jadhav) या दोघांचा रंगपंचमीच्या दिवशी खून करण्यात आला होता. जाधव बंधू खून प्रकरणी पाच जणांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, उपनगर पोलिसांनी (Upnagar Police) तपासात संशयितांना वाचवण्याचा आणि हलगर्जीपणा केल्याचा स्थानिकांनी आरोप केला होता. यानंतर शहरात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात मोर्चा देखील काढण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या विशेष पथकाची स्थापना करून या गुन्ह्याचा तपास नव्याने सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
आता संशयित आरोपींचा एसआयटीने ताबा घेतला आहे. जाधव खून प्रकरणी सागर गरड, अनिल रेडेकर, सचिन रेडेकर, अविनाश उशिरे आणि योगेश रोकडे या पाच संशयीतांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील कोयते, रक्ताने माखलेले कपडे आणि मोबाईल जप्त करून खून केल्यानंतर ते कुठे पळून गेले? या प्रकरणात आणखी कोणकोणत्या बाबींचा समावेश आहे? याचा सखोल तपास नाशिक पोलिसांच्या विशेष पथकाकडून सुरू आहे.
दरम्यान, बुधवार दि. 19 मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोधलेनगरमधील आंबेडकरवाडी परिसरात उमेश भगवान जाधव (32) आणि त्याचा भाऊ प्रशांत भगवान जाधव (30) यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. सार्वजनिक शौचालयाजवळ झालेल्या या हल्ल्यात लोखंडी रॉडचा वापर करण्यात आला होता.
जाधव बंधू अजित पवार गटाचे पदाधिकारी
ही हत्या पूर्व वैमनस्य आणि परिसरातील वर्चस्व कायम राखण्यासाठी करण्यात आली होती. या घटनेला पंधरा दिवस उलटूनही आरोपींना अटक झाली नाही आणि तपासात दिरंगाई झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात होता. मृत उमेश जाधव उर्फ बंपू हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी होते. त्यांचा एक भाऊ पक्षाचा शहर उपाध्यक्ष होता.
संशयित आरोपींचा एसआयटीकडे ताबा
शहरात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात मोर्चा काढल्यानंतर घटनेची दखल घेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले होते. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांना या समितीचे प्रमुखपद देण्यात आले. आता संशयित आरोपींचा एसआयटीने ताबा घेतला आहे. जाधव बंधू खून प्रकरणी नाशिक पोलिसांकडून सखोल तपास केला जात आहे.
आणखी वाचा























