एक्स्प्लोर
Advertisement
BLOG | वारी जनातली...मनातली
वारकरी आणि विठ्ठल भेटीतला हा दुरावा आपण दूर बसून फक्त समजू शकतो. पण समजणं आणि जाणवणं यातला फरक आणि त्यातलं दुःख वारकरी अनुभवतायत. पण ही वेळ सुद्धा जाईल.
दिवाळी - मे महिन्याच्या सुट्टीत आपण गावी जातो. एक सवयच पडून जाते. त्यामुळे आजी-आजोबाही त्या दरम्यान आस लावून बसलेले असतात...
आता माझी लेकरं येणार...
अंगण कसं भरभरून जाणार...
विठ्ठल पण आपल्या भक्तांची अशीच वाट बघत असेल का???
अजून कसं कोणी नाही आलं???
दरवर्षी या वेळेपर्यंत तर माझं अंगण उत्साहाने, वारकऱ्यांनी, त्यांच्या आनंदाने ओसंडून वाहत असतं.
मग आज इतकी शांतता???
महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून संतांच्या पालख्या पंढरपूरला येत आणि सोबत लाखोंच्या संख्येने वारकरी. फक्त पंढरपुरच नाही तर आसपासच्या कित्येक किलोमीटरच्या परिसरामध्ये लोकांची वर्दळ, खाऊच्या गाड्या, खेळण्यांची दुकांनं सगळं कसं अगदी ओसंडून वाहात असतं.
हरिनामाच्या गजराने आसमंत दुमदुमून जातो. सगळं वातावरण हरीमय झालेलं असत. हे लिहितानाही अगदी माझे कान वाजतायत. जसं की मी वारकऱ्यांच्या गर्दीतच आहे.
टाळ्यांच्या गजरात सगळे गातायत....
ज्ञानोबा माऊली
ज्ञानराज माऊली तुकाराम...
मागच्या वर्षी पहिल्यांदाच वारीला गेलेले. तीसुद्धा अगदी कालचीच गोष्ट वाटतेय.
सगळ्याच गोष्टी अगदी स्पष्टपणे आठवतायत.
वारकऱ्यांसोबत केलेला तो पायी प्रवास. गप्पा. दिंड्या-पताका-पालखीसोबत पंढरपूरची वाटचाल, टाळ, मृदुंग, हरिनामाचा गजर आणि ओव्या अभंगांची बरसात यात वेळ कधी जातो तेच नाही कळत.
रिंगण सोहळा...
अश्वाचं रिंगण पार पडण्याआधी पताकाधारी, मृदुंगवाले, विणेकरी माऊलींची दिंड्यांसोबतची प्रदक्षिणा पार पडते. .
मग अश्वाचं रिंगण...
डोळ्यांचे पारणे फेडणारे रिंगण...
हा सोहळा संपन्न होताच अश्वाच्या पायाखालची माती भाळी लावण्यासाठी भाविकांनी केलेली गर्दी...एक जनसागरच उसळतो.
सगळं कसं रंगीबेरंगी असतं... नऊवारी, सहावारी साड्यांमधल्या त्या माऊली, डोक्यावर पदर, काहींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन.
पुरुषांचे बहुतेक पांढरे धोतर, पायजमा-झब्बा. सगळ्यांच्या माथी चंदनाचा टिळा. डोक्यावर पांढरी टोपी किंवा मग आजोबांचा फेटा. गळ्यातली तुळशीमाळ विसरून कसं चालेल?
सोबतीला पारंपरिक खेळ, फुगड्या आणि अखंड जयघोष.
खरी माणुसकी तुम्हाला इथे कळते. साधेपणा म्हणजे नक्की काय, त्यातलं सौंदर्य इथे उमगतं.
मुक्कामाच्या ठिकाणी होणारी कामाची लगबग. एकीकडे स्वयंपाकाची तयारी, तर दुसरीकडे हरिपाठ, मग चालून चालून दमल्यामुळे लागणारी सुखाची झोप.
सकाळी सूर्य उगवण्याआधी आवरून होणारी पुढची वाटचाल...
विठ्ठल आणि आपल्यातील अंतर कमी होतंय ही भावनाच पुरेशी असते.
पण कोरोनाने 2020 कडून खूप काही हिरावून घेतलंय असंच वाटतं.
दरवर्षी 300-400 हुन अधिक पालख्या आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहोचतात.
आणि सोबत लाखो लाखो लाखो वारकरी.
पण यावर्षी फक्त दहाच पालख्यांना परवानगी मिळाली. आणि प्रत्येक पालखी सोबत फक्त 20 वारकरी.
दहा पालख्या कोणत्या?
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या भावंडांच्या चार पालख्या.
संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम यांची पालखी
विदर्भातून रुक्मिणी मातेची पालखी
सासवडहुन चांगा वाटेश्वर आणि नगर जिल्ह्याच्या पिंपळणेरमधून निळोबाराय महाराजांची पालखी.
या दहा पालख्यांनाच परवानगी देण्यात आली.
इथेच हा गर्दीचा फरक लक्षात येतो आणि नेहमी जाणाऱ्यांचं दुःख लक्षात येतं.
माझ्या नात्यातल्या छाया मावशी दरवर्षी वारीला जातात. वारी काय हे मला कळायच्या आधीपासून मी त्यांना वारीला जाताना शुभेच्छा द्यायचे.
त्यामुळे आवर्जून त्यांना फोन केला...
त्या म्हणाल्या, 'अक्षु आता फक्त रडायचं राहिलंय बघ. मला माझ्या विठ्ठलाकडे नाही जाता येणार यावर्षी.'
त्यांच्या आवाजावरून ती भेटीची कळवळ लक्षात येत होती. दुरावा म्हणजे काय ते जाणवत होतं.
वारकरी आणि विठ्ठल भेटीतला हा दुरावा आपण दूर बसून फक्त समजू शकतो. पण समजणं आणि जाणवणं यातला फरक आणि त्यातलं दुःख वारकरी अनुभवतायत.
पण ही वेळ सुद्धा जाईल.
पुढच्या वर्षी नक्कीच हरिनामाने अवकाश दुमदुमून जाईल, विठ्ठल रुक्मिणीचं अंगण आनंदाने ओसंडून वाहील हीच अपेक्षा...
बोला...
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय...!!!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
निवडणूक
कोल्हापूर
Advertisement