PM Modi : नैसर्गिक शेतीचं 'सूरत मॉडेल' संपूर्ण देशासाठी आदर्श बनेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी
नैसर्गिक शेतीचे सूरत मॉडेल संपूर्ण देशासाठी आदर्श बनेल असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. प्रमाणित नैसर्गिक कृषी उत्पादनांची निर्यात केल्यास शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल असे ते म्हणाले

PM Modi : प्रत्येक ग्रामपंचायतीमधील 75 शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीशी जोडण्याचे सूरतचे यश संपूर्ण देशासाठी एक आदर्श ठरणार असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. यामध्ये सरपंचांची भूमिका महत्वाची असून, त्यांनी नैसर्गिक शेतीच्या दिशेनं शेतकऱ्यांना पुढे नेल्याबद्दल त्यांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले. प्रमाणित नैसर्गिक कृषी उत्पादनांची निर्यात केली तर त्याची शेतकऱ्यांना चांगली किंमत मिळत आहे. गावं केवळ बदल घडवत नाहीत तर बदलाचे नेतृत्व करतात हे आपल्या गावांनी दाखवून दिले असल्याचे मोदी म्हणाले. तसेच नैसर्गिक शेतीचे सूरत मॉडेल संपूर्ण देशासाठी आदर्श बनेल असेही पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैसर्गिक शेती परिसंवादामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त केले. गुजरातमध्ये सूरत येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये हजारो शेतकरी आणि सूरतमध्ये नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब करुन यशस्वी झालेले इतर सर्व हितधारक सहभागी झाले आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल देखील या परिसंवादात सहभागी झाले होते.
वंचितांच्या कल्याणाच्या योजनांमध्ये ग्रामपंचायतींना भूमिका महत्त्वाची
देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने देश अनेक लक्ष्ये साध्य करण्याच्या दिशेने काम करत आहे. येणाऱ्या काळात त्यामुळं खूप मोठे परिवर्तन घडून येईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. देशाच्या प्रगतीचा पाया आणि वेग यामागे 'सबका प्रयास' ची भावना आहे. आपल्या विकासाच्या यात्रेचे ती नेतृत्व करत आहे, असे ते म्हणाले. म्हणूनच गरिबांच्या आणि वंचितांच्या कल्याणाच्या योजनांमध्ये ग्रामपंचायतींना महत्त्वाची भूमिका सोपवली आहे, असे मोदींनी सांगितले.
नैसर्गिक शेतीचे हे सुरत मॉडेल आदर्श
स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रत्येक पंचायतीमधून 75 शेतकर्यांची निवड केली आहे. त्यांना प्रशिक्षण आणि इतर संसाधनांची मदत करत ठोस भूमिका बजावली. त्यामुळं 550 पंचायतींमधील 40 हजारांहून अधिक शेतकरी नैसर्गिक शेतीत गुंतले आहेत,असे चित्र सर्वत्र दिसू लागले आहे. ही एक उत्तम सुरुवात असून अतिशय उत्साहवर्धक आहे. नैसर्गिक शेतीचे हे सुरत मॉडेल संपूर्ण देशासाठी आदर्श ठरु शकते, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
नैसर्गिक शेतीबाबतच्या जनआंदोलनाला मोठं यश मिळेल
जेव्हा लोकसहभागाच्या बळावर मोठे प्रकल्प हाती घेतले जातात तेव्हा त्यांच्या यशाची खात्री देशातील जनताच घेते, असेही पंतप्रधान म्हणाले. यावेळी त्यांनी 'जल जीवन मिशन' प्रकल्पाचे उदाहरण दिले, जिथे लोकांना महत्त्वाची भूमिका देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे “डिजिटल इंडिया मिशनचे अभूतपूर्व यश हे खेडेगावात बदल घडवणे सोपे नाही असे म्हणणाऱ्यांना देशानेच दिलेले उत्तर आहे. आमच्या गावखेड्यांनी दाखवून दिले आहे की खेडी केवळ बदल घडवून आणू शकत नाहीत तर बदलाचे नेतृत्वही करू शकतात.” नैसर्गिक शेतीबाबतचे जनआंदोलन येत्या काळातही मोठे यश मिळवेल, असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. जे शेतकरी या आंदोलनात लवकर सहभागी होतील, त्यांना याचा विशेष लाभ होईल, असेही पंतप्रधान म्हणाले.
नैसर्गिक उत्पादनाची मागणीत वाढ
नैसर्गिक शेती उत्पादनाच्या प्रमाणीकरणासाठीच्या गुणवत्ता हमी प्रणालीबाबत देखील पंतप्रधानांनी माहिती दिली. प्रमाणीकरण केलेली उत्पादने शेतकरी निर्यात करतात तेव्हा त्याला चांगला भाव मिळतो असे देखील ते म्हणाले. भारतातील धर्मग्रंथ आणि लोकप्रिय संस्कृतीमध्ये दडलेल्या नैसर्गिक शेतीविषयक ज्ञानाचा उल्लेख करुन, संस्था, स्वयंसेवी संस्था आणि तज्ञांनी प्राचीन ज्ञानावर संशोधन करुन आधुनिक काळाच्या मागणीनुसार ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती पंतप्रधानांनी केली. रसायन-मुक्त नैसर्गिक उत्पादनाची मागणी वाढत जाणार असल्यामुळं प्रत्येक पंचायतीमधील 75 शेतकऱ्यांनी केलेली नैसर्गिक शेतीची सुरुवात पुढे अनेक पटींनी वाढेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
