Maharashtra Rain : राज्यात एकीकडे उन्हाचा कहर तर दुसरीकडे अवकाळीचा तडाखा; पिकांसह घरांचंही नुकसान
Maharashtra Weather Update : राज्यात एकीकडे अनेक जिल्ह्यामध्ये उन्हाचा तडाखा बसत असताना अनेक ठिकाणी अवकाळी वादळी पावसानं हजेरी लावत शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे.

Maharashtra Weather Update : राज्यात एकीकडे अनेक जिल्ह्यामध्ये उन्हाचा तडाखा बसत असताना अनेक ठिकाणी अवकाळी वादळी पावसानं हजेरी लावत शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. सोलापुरात पावसानं चांगलंच नुकसान केलं आहे. सांगोला तालुक्याला काल पुन्हा गारपीट आणि अवकाळीचा दणका बसला. यामुळं फळबागा आणि घरांचे मोठे नुकसान झाले.
ऐन उन्हाळ्यात काल सायंकाळी पुन्हा एकदा अवकाळी पावसाने सांगोला तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले असून अनेक ठिकाणी गारपीटही झाल्याने मोठे नुकसान झाले आहेत. वारंवार सांगोल्यात अवकाळीचा दणका बसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. काल झालेल्या वादळी वारा आणि गारपिटीमुळे द्राक्षे, आंबा, कलिंगड, डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले आहेत. या वादळी वाऱ्यात मेडशिंगे, अजनाळे, पारे, वाढेगाव परिसरातील अनेक घरांवरील पत्रे उडून गेले आहेत तर काही घरांवर झाडे पडल्यानेही मोठे नुकसान झाले आहे. या वादळी वाऱ्यात अनेक गावातील विजेचे खांब पडल्याने वीज गायब झाली असून सुदैवाने या अवकाळीत कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही.
पावसामुळे देवगड हापूस आंब्याला फटका
सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील तीन चार दिवसांआधी झालेल्या अवकाळी पावसामुळे देवगड हापूस आंब्याला फटका बसला आहे. वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे हापूसची झाडं कोसळून पडली तर आंबे झाडाखाली पडून बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. वातावरणात वारंवार होणारे बदल, अवकाळी पाऊस, थ्रीप्सचा प्रादुर्भाव यामुळे मेटाकुटीला आलेले आंबा बागायतदार चिंतेत सापडला होता. त्यात एप्रिल महिन्यात आंबा तयार होऊन मार्केटमध्ये पाठविण्यास सुरुवात झाली असताना वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसाने बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. याआधी झालेल्या अवकाळी पावसामुळे उत्पादनात झालेली घट, त्यात वारोवार हवामानात होणारे बदल त्यामुळे याचा मोठा फटका देवगड हापुसला बसला आहे. देवगड तालुक्यात अनेक ठिकाणी आंब्याच्या बागेत झाडं कोसळली आहेत तर मोठ्या प्रमाणात फळगळ झाली आहे.
सांगली जिल्ह्याला सलग अवकाळीचा तडाखा
सांगली जिल्ह्यात देखील दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह दमदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. मिरज शहरात जोरदार गारपीट झाली. अवकाळी पावसाने बेदाणा आणि घराचे मोठे नुकसान झाले आहे. जतमध्येही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसाने बेदाण्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
