Nashik Accident : नाशिक अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून आर्थिक मदत; गिरीश महाजनांनी धनादेश सुपूर्द करताच कुटूंबियांना अश्रू अनावर
Nashik Accident : नाशिक अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
नाशिक : येथील उड्डाणपुलावर द्वारका परिसरात (Nashik Dwarka Flyover Accident) रविवारी (दि. 12) भीषण अपघात झाला. एक पिकअप ट्रक लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रकवर जाऊन आदळला. यानंतर मागून येणाऱ्या वाहनाने पिकअपला जोरदार धडक दिल्याने पिकअप दोन्ही वाहनांमध्ये चिरडला गेला. यावेळी ट्रकमधील लोखंडी सळ्या पिकअपच्या काचा फोडून आतमध्ये शिरल्या आणि तरुण मुलांच्या शरीरात घुसल्या. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. आज प्रजासत्ताक दिनी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या हस्ते मृतांच्या नातेवाईकांना धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी मृतांच्या नातेवाईकांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
राज्य सरकारकडून मागील आठवड्यात रविवारी (दि. 18) सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. पालकमंत्र्यांची यादी जाहीर होताच महायुतीतील वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले. नाशिकमधून गिरीश महाजन यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती. मंत्री दादा भुसे यांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय स्थगित करण्यात आला होता. मात्र, प्रजासत्ताक दिनी गिरीश महाजन हेच झेंडावंदन करतील, असे परिपत्रक शासनाकडून जारी करण्यात आले.
मृतांच्या नातेवाईकांना अश्रू अनावर
त्यामुळे गिरीश महाजन यांनी नाशिकच्या पोलीस परेड ग्राउंडवर झेंडावंदन केले. पोलीस परेड ग्राउंड येथे जिल्ह्यातील सर्व पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील पुरस्कारार्थींचा सन्मान करण्यात आला. यानंतर नाशिक येथील द्वारका परिसरातील झालेल्या भीषण अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आले. यावेळी मृतांच्या नातेवाईकांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.
कुंभमेळ्याच्या कामांसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज : गिरीश महाजन
दरम्यान, मंत्री गिरीश महाजन भाषणात बोलताना म्हणाले की, सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. विकशित राष्ट्राचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे. शेतकरी हा राज्याचा मुख्य कणा आहे. नदी जोड प्रकल्पांना सिंचनाचे जाळे तयार करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विमा योजनेत मोठा सहभाग नोंदवला आहे. लाडकी बहीण योजनेचा मोठा फायदा महिलांना होत आहे. आदर्श शाळा योजना कार्यान्वित केली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न बघता मोठे निर्णय आम्ही घेत आहोत. नाशिक जिल्ह्यात एमबीबीएस विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत आहे. नाशिक जिल्ह्यातील सत्तर हजार महिलांना मागच्या वर्षाअखेर लखपती करण्यात आले याचा मला अभिमान आहे. कुंभमेळ्याच्या कामांसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. आपण नाशिककर कुंभमेळ्याच्या स्वागतासाठी, भक्तगणांच्या स्वागतासाठी सज्ज झालो पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनातील विकसित राष्ट्र बनविण्यासाठी आपल्या सर्वांचा सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा