Sanjay Raut : शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला हे गरिबांचं लक्षण नाही; नरहरी झिरवाळांना राऊतांनी डिवचलं
Sanjay Raut on Narhari Zirwal : मी गरीब असल्याने मला गरीब जिल्ह्याचे पालकमंत्रिपद दिले, असे वक्तव्य नरहरी झिरवाळ यांनी केले होते. यावरून संजय राऊत यांनी नरहरी झिरवाळ यांना डिवचलंय.
Sanjay Raut on Narhari Zirwal : राज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची यादी (Maharashtra Guardian Ministers List) जाहीर होताच महायुतीचा वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरु असतानाच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी मनातील खदखद बोलावून दाखवली. नरहरी झिरवाळ यांना हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. यावरून मी गरीब असल्याने गरीब जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मला दिले. मुंबईला गेल्यानंतर वरिष्ठांना विचारणार आहे, असे त्यांनी म्हटले. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नरहरी झिरवाळ यांच्यावर हल्लाबोल केलाय.
नाशिक राऊत आज नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. संजय राऊत म्हणाले की, आज प्रजासत्ताक दिन आहे. राष्ट्रपतींचे भाषण ऐकले. संविधान हा शब्द उरला आहे का समता बंधुता हे शब्द फक्त राष्ट्रपतींच्या भाषणात आहेत. निवडणुकीच्या काळात संविधानावर हल्ला होतोय. राज्याचा निकाल आजही मान्य नाही. मतदान आणि निकाल यात मोठी तफावत आहे. मतदान वाढले त्याची नोंदणी कुठे आहे. निवडणूक आयोग बोलत नाही. संविधान कुठे आहे? निवडणूक पारदर्शक होत नाही. आम्ही संविधान बचावासाठी प्रयत्न करत आहोत, असे त्यांनी म्हटले.
शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला हे गरिबांचे लक्षण नाही
नरहरी झिरवाळ यांनी हिंगोलीतील एका कार्यक्रमात बोलताना माझ्यासारख्या गरिबाला हिंगोली सारख्या गरीब जिल्ह्याचे पालकमंत्री केले आहे, असे वक्तव्य केले. याबाबत संजय राऊत यांना विचारले असता नरहरी झिरवाळ यांना गरीब म्हणणे हा गौतम अदानींचा अपमान आहे. शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसला हे गरिबांचे लक्षण नाही, असे टीका त्यांनी नरहरी झिरवाळ यांच्यावर केली आहे.
जरांगेंना मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला असावा
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. याबाबत विचारले असता मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला असावा, म्हणून ते काही काळ शांत आहे, असे आम्ही मानत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.
हा मुख्यमंत्र्यांचा अपमान
महायुतीतील पालकमंत्रिपदाच्या वादावरून संजय राऊत म्हणाले की, पालकमंत्री पदासाठी लढाई हे बिनडोकपणाचे लक्षण आहे. मुख्यमंत्री हतबल आहेत. मुख्यमंत्री परदेशात असताना दिल्लीतून दबाव आणून पालकमंत्रीपदाला स्थगिती आणली. हा मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे. पालकमंत्री पदासाठी टायर जाळले गेले हे धमक्या देणे सुरू आहे, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा