(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Puntamba Protest : कृषीमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर पुणतांब्यातील शेतकऱ्यांचं आंदोलन 2 दिवसांसाठी स्थगित
कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पुणतांबामधील शेतकऱ्यांचं आंदोलन 2 दिवसांसाठी स्थगित करण्यात आलं आहे.
Puntamba Protest : कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पुणतांबामधील शेतकऱ्यांचं आंदोलन 2 दिवसांसाठी स्थगित करण्यात आलं आहे. गेल्या 4 दिवसापासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात पुणतांबा याठिकाणी आंदोलन सुरु करण्यात आलं होत. आज अखेर कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी या आंदोलनाची दखल घेतली. त्यांनी आज बंद दाराआड आंदोलकांशी चर्चा केली. त्यानंतर २ दिवसांसाठी आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे.
दरम्यान, कृषीमंत्री दादा भुसे यांची शेतकरी नेत्यांशी बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेला किसान क्रांती संघटनेचे नेते तसेच कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित आहेत. कृषीमंत्री दादाजी भुसे यांची प्रसारमाध्यमांसमोर चर्चा करण्याची तयारी असताना कोअर कमिटीनं मात्र प्रसारमाध्यमांसमोर चर्चा करण्यास नकार दिला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सध्या बंद दाराआड चर्चा झाली. कृषीमंत्र्याबरोबर चर्चेसाठी कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते. यामध्ये डॉ.धनंजय धनवटे, धनंजय जाधव, बाळासाहेब चव्हाण, सुहास वहाडणे, सुभाष कुलकर्णी, सुभाष वहाडणे, निकीता जाधव, अमोल सराळकर, सर्जेराव जाधव, चंद्रकांत डोखे, गणेश बनकर,नामदेव धनवटे, मुरलीधर थोरात, दत्तात्रय धनवटे उपस्थित होते.
या सदस्यांबरोबर दादाजी भुसे यांची चर्चा झाली. हे सर्व सदस्य पुणतांबा गावचे आहेत. यासह विविध विभागाचे शासकीय अधिकारी सुद्धा बैठकीला उपस्थित होते. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे, शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांची देखील बैठकीला उपस्थित होते.
या मागण्यांसाठी आंदोलन सुरु होतं
1) ऊसाला एकरी एक हजार रूपये अनुदान द्यावे
2) शिल्लक ऊसाला हेक्टरी दोन लाख रूपये द्यावे
3) कांद्यासह सर्व पिकांना हमीभाव द्यावा
4) कांद्याला प्रती क्विंटल 500 रूपये अनुदान द्यावे
5) शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण आणि सुरळीतपणे वीज मिळावी
6) थकित विजबिल माफ झाले पाहिजे
7) कांदा आणि गव्हाची निर्यात बंदी उठवावी
8)सर्व पिकांना आधारभूत किंमत दिली जावी त्यासाठी आयोगाची स्थापना करून निर्णय घ्यावा
9) 2017 साली केलेल्या कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी
10) नियमित कर्ज भरणारांचे अनुदान दिले जावे
11) दुधाला ऊसाप्रमाणे एआरपी लागू केला जावा
12) दुधाला कमीतकमी चाळीस रूपये दर दिला जावा
13) खाजगी दूध संकलन केंद्रात होणारी लूट थांबवावी
14) वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाल्यास भरपाई दिली जावी
15) शेतकरी आंदोलनात दाखल गुन्हे मागे घेतले जावे
16) वन हक्क कायद्यानुसार आदिवासींच्या जमिनी त्यांच्या नावावर केल्या जाव्या